आपल्या महाराष्ट्राचे पर्यटन वैभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2019
Total Views |



महाराष्ट्र! ज्याच्या नावातच 'राष्ट्र' आहे. अशा महाराष्ट्राने 'राष्ट्र' निर्माण करण्याची ताकद असलेले महायोद्धे याच मातीत निर्माण केले आणि म्हणूनच नावाला जागणाऱ्या महाराष्ट्राचे पर्यटन बाकी राज्यांपेक्षा वेगळे ठरते. भौगोलिक दृष्ट्या विचार करता, निसर्गाने इथे मुक्तहस्त उधळण केली आहे. तब्बल ७२० किमींचा समुद्रकिनारा इथे लाभला असून गर्द वनराईचे वस्त्र लपेटून स्थितप्रज्ञ सह्याद्री मनसोक्त बागडला आहे. सह्याद्रीच्या शिखरांवर मुकुट म्हणून गडकिल्ले आहेत, तर आभूषणं म्हणून इथे लेणी आहेत तर त्याच्या पायथ्याला दऱ्या-खोऱ्यांमध्ये प्राचीन मंदिरं आजही तग धरून आहेत. सह्याद्री महाराष्ट्राचा निर्माता व हिंदुस्थानाचा मूलाधार आहे. एकंदरीत काय तर महाराष्ट्रातील पर्यटन म्हणजे एक परिपूर्ण पॅकेज आहे. चला तर मग 'सैर करूया या पराक्रमी भूमीची!'


रामायण व महाभारत या पौराणिक महाकाव्यांमध्ये महाराष्ट्राचे नाव 'दंडकारण्य' व 'दक्षिणापथ' असे आले आहे. बऱ्याच प्राचीन ग्रंथात महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख आहे. सातवाहनांच्या काळात हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने नावारूपाला आला. कारण, थेट मध्य आशियांतील देशांमध्ये याच पश्चिम किनारपट्टीवरून व्यापारी जहाजे रवाना झाली आणि इथे आर्थिक सुबत्ता नांदायला लागली. बंदरांपासून सातवाहनांची राजधानी असलेले प्रतिष्ठान म्हणजेच आजच्या पैठणपर्यंत दऱ्याखोऱ्यांतून घाटवाटा तयार झाल्या आणि प्राचीन महाराष्ट्रात या घाटवाटांतील विश्रांतीची ठिकाणं म्हणा की कलाकृतीची नांदी म्हणा पण सुबक लेणी तयार झाल्या. त्या काळातील व्यापारांच्या देणगीतून हा आविष्कार साकारण्यात आला. आज पर्यटनात यांचे स्थान अगदी सर्वोच्चआहे. बौद्ध, हिंदू आणि जैन अशा तिन्ही प्रकारच्या लेणी महाराष्ट्रात आहेत. आपल्या देशात एकूण १२०० लेणी आहेत, त्यातील ८०० लेणी या आपल्या महाराष्ट्रात आहेत, यावरून कल्पना करता येईल. इसवी सन पूर्वच्या दुसऱ्या शतकात म्हणजे आज पासून २००० वर्षे जुन्या असलेल्या या लेणी पाहणे म्हणजे पर्वणी असते. सह्याद्रीतील पहिली लेणी म्हणून लोणावळ्याजवळील 'भाजे लेणी'ला मान आहे, तर समकालीन म्हणून कर्जत तालुक्यातील 'कोंडाणे लेणी' आहे. 'भाजे लेणी'तील 'सूर्य लेणी' जशी खास आहे तसा 'कोंडाणे लेणी'तील यक्ष आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातो. या सर्वांचा कळस म्हणजे 'कार्ले लेणी' अहाहा, अफाट कलाकृतींचा साज! आणि त्याहून भन्नाट पाहायचे असेल तर अजिंठा व वेरूळ यांना नाकारता येणार नाही. अजिंठ्यात असलेली अनेक रंगीत चित्रं आठवण करून देतात जीवंतपणाची, तर वेरूळमधील मंदिरं 'आधी कळस मग पाया रे' याप्रमाणे कोरलेले आहे. कळसापासून खाली कोरत आलेल्या या वास्तूचे शब्दांत वर्णन करता येणार नाही, अशी ही कलाकृती जगात एकमेव आहे. त्याचबरोबर कान्हेरी, कुडा, घारापुरी, पितळखोरा, नाशिक, जुन्नर अशा कित्येक लेणी डोळ्यांचे पारणे फेडतात. इतकी जबदस्त लेणी पर्यटन महाराष्ट्राशिवाय दुसरे कुठेही मिळणार नाही.

 

सातवाहनांची राजसत्ता सरली आणि गुप्त, वाकाटक, कदंब आणि आभीर या राजसत्ता उदयास आल्या आणि आता सजायची वेळ होती सपाट भूमीची अथवा पठारांची! दगड कोरून लेण्यांचा जन्म होतो, हे आपण पाहिले. मात्र, हेच दगड एकावर एक रचून वास्तू तयार होते आणि त्यातही वैशिष्ट्यपूर्ण शैलीत रचलेल्या शिल्पात कलाकृती जन्माला येतात, हेच आपल्याला दिसून येते प्राचीन मंदिरात! ही मंदिरं थेट मध्ययुगापर्यंत बांधली जात होती. प्राचीन काळात शैव, वैष्णव, शाक्त आणि गाणपत्य हे प्रमुख पंथ होते आणि त्यातही प्रत्येक देवाची खासियत वेगळी मग देवालय खास असणारंच की! या सर्वांचा विचार करून मंदिरं साकारताना प्रत्येक वेळी एक वेगळाच आविष्कार साकारला गेला मग उगवत्या सूर्याला वंदन करायला बाराव्या शतकात जळगाव जिल्ह्यातील वाघळी या गावात मुधईदेवीचे मंदिर उभे राहिले जे आपल्या महाराष्ट्रातील स्थापत्याच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण असे एकमेव ऐतिहासिक सूर्य मंदिर आहे, तर मावळत्या सूर्याचा साष्टांग नमस्कार झेलायला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात ठराविक दिवसांमध्ये संध्याकाळी किरणांचा उत्सव रंगतो. विविध मंदिरांवरील शिल्प पाहताना पौराणिक गोष्टी शिल्पांमार्फत स्मरण केल्या आहेत आणि म्हणूनच मंदिरं संस्कृती जोपासणारी कलाकेंद्रं आहेत. कृष्णेच्या काठी असलेले खिद्रापुरातील कोपेश्वराचे मंदिर असंच भन्नाट आहे. नवव्या शतकात पुलकेशी राजाने उभे केलेल्या मंदिराला मध्य आशियातून विविध राजांनी मदत पाठवली आणि तेव्हा आलेल्या प्रवाशांचे शिल्प व शृंगारिक सुरसुंदरी त्याच काळात कोरलेल्या आहेत. ते पाहताना आजच्या यंत्रालाही लाजवेल असे कोरीवकाम आहे. तसेच पंचतंत्रातील गोष्टी प्रत्येक खांबावर कोरून स्तंभशिल्पात वेगळंच वैभव चितारलेले आहेत. इथे असलेल्या गोल रंगशिलेभोवती छत नसलेला गोल मंडप आहे. त्याला 'स्वर्ग मंडप' म्हणतात. पाहताक्षणीच एका अजोड वास्तूत आपण उभे आहोत असे वाटते. याची खासियत म्हणजे खालील रंगशिला व वरील गोल दोघांचा व्यास १३ फुटांचा आहे. भोवती असलेल्या स्तंभांवर आठही बाजूंना पत्नीबरोबर आपल्या वाहनांवर बसलेले दिक्पाल (दिशांचे देव) आहेत. अहाहा! अफाट कलाकृती आहे. महाराष्ट्रातील एकमेव अशी हातात कलश घेतलेली धन्वंतरीची दुर्मीळ मूर्ती इथेच पाहावयास मिळते. जसे मंदिर तसे येथील परिसराचीसुद्धा वेगळी खासियत आहे. इथे बरीच वडाची झाडे आहेत, मग तुम्ही म्हणाल यात खास काय? तर खास हे आहे की, एका वेळी फक्त एकाच झाडाला फळं येतात आणि म्हणूनच वर्षभर येथे एक एक करून वडांना फळं लागतात. त्यामुळे सतत विविध पक्ष्यांचा थवा इथे किलबिल करत असतो. त्या काळात कसं काय हे ठिकाण शोधले असे? कमाल आहे ना, आपला महाराष्ट्र !

 

महाराष्ट्राच्या मध्ययुगीन कालखंडात अंबरनाथमधील शिवमंदिर हे शिल्पपरंपरेचे आरंभस्थान मानण्यात येते. इ. स. १०३० ते १०४० साली शिलाहार राजवटीत बांधलेले मराठा शैलीत महाराष्ट्राचे प्रतिबिंब दर्शवणारे हे मंदिर विलक्षण आहे. महाराष्ट्राचा वारसा, संस्कृतीची ओळख सांगणारा आणि मानबिंदू जपणारा व आपण आपल्या आयुष्यात एकदातरी पहावा, असा हा ठेवा आहे. चौलचे रामेश्वर मंदिर, जेजुरीचा व पालीचा खंडोबा, पंढरपूरचा विठोबा, देहू-आळंदी आणि पैठण येथील मंदिरं, म्हणजे गरिबांच्या हक्काची श्रद्धास्थानं! जेजुरीच्या खंडोबाचा गोंधळ, नवरात्रातील कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे तेज, अंबेजोगाईच्या मंदिरांतील स्फूर्ती, तुळजापूरच्या भवानी आईला साकडं, पंढरीची दुमदुमणारी ती आषाढी कार्तिकेची वारी म्हणजे थोरा-मोठ्यांना, बाळ-गोपाळांना आणि वयोवृद्धांना एकत्र नांदायला लावणारी आणि जय हरी विठ्ठलाच्या गजरात न थकता मैलोन्मैल पावले चालत चालत पंढरपुरात दाखल करणारी, ही अद्भूत व उत्स्फूर्त वारी फक्त महाराष्ट्रातच पाहता येते आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन देशी-विदेशी पर्यटकांना पुन्हा होते. ही वारी पाहण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी जगभरातील पर्यटक खास येत असतात. महाराष्ट्र अद्भूत आहे, अगाध आहे आणि महाराष्ट्राचं पर्यटन म्हणजे अनुभवांची अखंड शिदोरी आहे.

 

ओबडधोबड दगडात शिल्प कोरून त्या काळातील कलाकारांनी पराक्रम तर केलाच पण म्हणतात ना, चांगल्या कामाला दृष्ट लागते आणि झालेही तसेच या आपल्या महाराष्ट्रावर मुघलांच्या आक्रमक वावटळी आल्या आणि मग देव, देश आणि धर्म सर्वच संकटात आले. इथून महाराष्ट्र झुंजायला लागला. आक्रमणांना थोपवायला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मराठ्यांना बरोबर घेऊन त्यांनी सह्याद्रीच्या साक्षीने देव, देश आणि धर्म वाचवला व हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि म्हणूनच आजची स्फूर्तिस्थानं आणि सह्याद्रीचे मुकुटमणी म्हणजेच विविध गडकिल्ले उभे राहिले. शिवनेरी, राजगड, श्रीमद् रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, पन्हाळा असे बलाढ्य गडकिल्ले पाहताक्षणी त्यांचा पराक्रम डोळ्यांपुढे तरळतो. सागरावर व्यापारी सत्ता असावी म्हणून शिवछत्रपतींनी दुर्ग उभे केले. त्याचे बांधकाम पाहताना आपण आश्चर्यचकित होतो. कारण, उसळणाऱ्या लाटांना आणि न थांबणाऱ्या वाऱ्याला महाराजांनी थोपवले आहे. पराक्रमाची प्रतीकं आहेत त्या वास्तू ! 'जंजिरा' अजिंक्य राहिला म्हणून त्यावर वचक ठेवायला अप्रतिम असा 'पद्मदुर्ग' उभा केला. त्याच्या कमळाच्या पाकळीसारखा असलेला बुरुज आपल्या महाराष्ट्रात एकमेव स्थापत्त्य असलेला बुरुज आहे. खांदेरी, विजयदुर्ग, कुलाबा, सुवर्णदुर्ग, जयगड असे भन्नाट दुर्ग पाहताना पर्यटक इतिहासात हरवून जातात. सिंधुदुर्ग पाहताना तर निव्वळ तोंडात बोटे जातात. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत! महाराष्ट्राची ताकद जरी म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही असा राजा! आपल्या हिंदुस्थानातील सर्वात जास्त गड-किल्ले महाराष्ट्रात आहेत. म्हणजे लेण्यांमध्ये सरस असलेले आपले राज्य गड-किल्ल्यांमध्येसुद्धा सरसच आहे. जगण्याची ताकद आम्हाला या गडांमार्फत मिळत असते. अनेक देशी-विदेशी पर्यटक या गडांवर कधी अभ्यासासाठी, तर कधी पर्यटनासाठी हजेरी लावत असतात. महाराष्ट्र पर्यटनातील एक परिपूर्ण राज्य आहे. छत्रपती शिवरायांच्या नंतर मराठेशाहीत पेशव्यांनी राज्य केले तेव्हा त्यांनी जीर्णोद्धार केलेली मंदिरं व वाडे आज पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यात अष्टविनायक खास आहेत, तसेच डोंगरदऱ्यांमध्ये असलेली शिवशंकराची मंदिरं आज अप्रूप शांतता जपून असतात. या भूमीवर पसरलेला हा महाराष्ट्र पाहताना अथांग समुद्रातील दुर्ग पाहून झाले की, किनाऱ्यावरून मनापासून प्रेमळ साद ऐकू येते ती म्हणजे, 'येवा, कोकण आपलोच असा' आणि आपल्या कोकणातील निसर्ग मनात घर करून राहतो. चौल, चिपळूण, गणपतीपुळे, रत्नागिरी, साखरपा, सिंधुदुर्ग, मालवण, कणकवली, कुडाळ अशी टुमदार गावं नारळी-पोफळींच्या बागेत हळुवार डोकं बाहेर काढत असतात. महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणजे कोकणभूमी! याला कदापि तोड नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्यटक जिथे आकृष्ट होतात तो भाग म्हणजे कोकण! समुद्री पर्यटन करताना तिथल्या निसर्गाची भुरळ पडते. तारकर्लीला तर समुद्राच्या पोटात जाऊन तो न्याहाळणे म्हणजे एक हटके अनुभव! येथील आंबा आणि माणूस म्हणजे दोन्ही माधुर्याने काठोकाठ! महाराष्ट्राचे पर्यटन कोकण पाहिल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यावर इंग्रजांची सत्ता आली. तेव्हा इंग्रजांनी काही वास्तू उभ्या केल्या त्यासुद्धा आज पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. खास करून मुंबई यामध्ये अव्वल आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिकेची इमारत व बाकी त्या काळातील वास्तू तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी किनाऱ्यावरील काही दुर्ग आजही लक्ष वेधून घेतात. ही भूमी जशी गड-किल्ल्यांची, लेण्यांची तशी ही भूमी आहे वैविध्यपूर्ण सणांची! या महाराष्ट्रात सर्व सण जोमाने आणि एकीने साजरे होतात. यातील प्रमुख सण आणि पर्यटक जिथे खास करून हजेरी लावतात तो म्हणजे गणेशोत्सव! यामध्ये मात्र पुण्याचे मानाचे गणपती बाजी मारतात. लाखो पर्यटक हा सोहळा याची डोळा पाहण्यासाठी पुण्यात दाखल होतात. येथील गणपती पाहताना रात्रीलासुद्धा इथे विसर पडलेला असतो. दिवस-रात्र पर्यटकांनी आणि भक्तांनी फुलून गेलेले असते पुणे! महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणं आजही अव्वल आहे. परंतु, आर्थिक राजधानी मुंबई इथेसुद्धा मागे नाही. गिरणगावचा राजा, लालबागचा राजा व सिद्धिविनायक मंदिर इथेसुद्धा गर्दी असतेच. जसा गणेशोत्सव तशी दहीहंडी! यामध्ये मात्र मुंबईत प्रचंड जोश संचारलेला असतो. 'बोल बजरंग बली की जय' अशा घोषणा देत एकावर एक उभे राहून मानवी मनोरा रचून थरारक थरांची सलामी देऊन हजारो हंड्या इथे फुटतात. हा साहसी सण पाहायला आजवर कित्येक पर्यटक हजेरी लावत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात हे सण जोशात साजरे केले जातात. राष्ट्र निर्माण करण्याची ताकद असलेले हे भारतातील एकमेव राज्य आहे. गड, पुरातन मंदिरे, लेण्यांनी सजलेला हा महाराष्ट्र पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेलेले महाराष्ट्राला दिशा देणारे महापुरुषांची कीर्ती विदेशातसुद्धा आहे आणि म्हणूनच असंख्य विदेशी पर्यटक इथे नेहमीच येत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉय बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक अशी कित्येक बलाढ्य महापुरुष या महाराष्ट्रात घडले. हा आहे महाराष्ट्राच्या पवित्र मातीचा गुण! ही शिकवण आहे महाराष्ट्राची! इथे होणाऱ्या आदरातिथ्याच्या प्रेमाचे गोडवे सातासमुद्रापार नक्कीच गायले जातात तर असे आहे महाराष्ट्राचे सर्वगुणसंपन्न पर्यटन!

- सागर माधुरी मधुकर सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@