समुद्रात 'काळ्या माशा'ची दहशत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019   
Total Views |


 
 

राज्याच्या सागरी परिक्षेत्रात 'ट्रीगर फिश'चे आगमन 

 

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - सुरमई, बांगडा अशा चविष्ट मासळीचा कर्दनकाळ ठरणाऱ्या 'ट्रीगर फिश' म्हणजेच काळ्या माशाचे महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात पुन्हा एकदा आगमन झाले आहे. गेल्यावर्षी या माशाच्या झुंडींनी राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. मात्र, काही दिवसांपासून या माशाच्या दोन प्रजाती जाळ्यात सापडत असल्याची तक्रार मच्छीमारांनी केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थेकडे (सीएमएफआरआय) केली आहे. सागरातील अंतर्गत प्रवाह (करन्ट वेव) बदलांमुळे यंदाही हा मासा राज्यात दाखल झाल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
 
 

 
 
 
 

प्रामुख्याने सागरी प्रवाळ क्षेत्रात आढळणारा काळा मासा राज्याच्या सागरी परिक्षेत्रात दाखल झाला आहे. गेल्या वर्षी या माशांच्या झुंडींनी पश्चिम किनारपट्टीवरील गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यातील सागरी क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. 'ट्रीगर फीश' हा आक्रमक मासा आहे. त्यामुळे तो सुरमई, बांगडा, स्क्विड यासारख्या मोठी मागणी असलेल्या माशांना फस्त करतो. परिणामी त्याचा मासेमारीवर प्रभाव पडत असल्याच्या तक्रारी, त्यावेळी मच्छीमारांनी केल्या होत्या. आता पुन्हा एकदा या माशाचे आगमन राज्याच्या किनारपट्टीक्षेत्रात झाले आहे. साधारण ३० ते ४० मीटर खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या पर्ससीन आणि ट्रॉलर बोटींच्या जाळ्यात हे मासे सापडत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून छोट्या आकाराचा काळा मासा ससून बंदरावर येत असल्याची माहिती 'आॅल इंडिया पर्ससीन वेलफेअर फिशरमन असोसिएशन'चे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठ्या आकाराच्या काळ्या माशाची प्रजात बंदरावर येत असल्याने त्याचा नमुना 'सीएमएफआरआय'कडे तपासणीकरिता पाठविल्याचे त्यांनी सांगितले. तीन ते चार दिवसांमध्ये सुमारे १,३०० किलो मोठा आकाराचा काळा मासा पकडला गेल्याचे नाखवा म्हणाले.

 
 

 
 
 

मुंबईखेरीस मोठ्या व छोट्या आकाराचा काळा मासा तळकोकणातील सागरी पट्टयातही आढळून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये सुमारे १,५०० किलो वजनाचा छोट्या आकाराचा काळा मासा जाळ्यात सापडल्याची माहिती देवगड येथील ट्राॅलर मच्छीमार अक्षय हरम यांनी दिली. जाळ्यात सापडल्यानंतर हा मासा त्यामधील इतर माशांना खात असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रिगरफिशखाण्यायोग्य नसल्याने त्यांना बाजारात भाव मिळत नाही. मात्र, तो फिशमिलसाठी १५ रुपये किलो दराने विकला जात असून हा व्यवहार तोट्याचा असल्याचे, हरम म्हणाले. सध्या सापडत असलेल्या दोन्ही प्रजाती 'रेडटूथेड ट्रीगरफिश' (छोटा आकार) आणि 'स्पाॅटेड ओशेनिक ट्रीगरफिश' (मोठा आकार) असल्याचे 'वाईल्डलाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया'चे सागरी संशोधक स्वप्निल तांडेल यांनी सांगितले. या दोन्ही प्रजाती प्रामुख्याने लक्षव्दीप सारख्या सागरी प्रवाळ असणाऱ्या क्षेत्रात आढळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 
 
 

शास्त्रज्ञांच्या मते...

गेल्या वर्षी पश्चिम किनारपट्टीच्या सागरातील अंतर्गत प्रवाह उत्तरेकडे सरकल्याने या प्रवाहाबरोबर काळा माशाच्या झुंडीच्या झुंडी राज्याच्या सागरी क्षेत्रात दाखल झाल्या होत्या. यंदाही त्या पुन्हा दाखल झाल्या आहेत. मात्र, यामध्ये मोठ्या आकाराची 'स्पाॅटेड ओशेनिक ट्रीगरफिश'चाही समावेश आहे. त्याचा नमुना तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. या तपासणीअंतर्गत हा मासा नेमके काय खातो आहे, याचा अभ्यास करण्यात येत असल्याची माहिती 'सीएमएफआरआय'चे शास्त्रज्ञ डाॅ. अजय नाखवा यांनी दिली. वर्षातील विशिष्ट कालावधीमध्येच हा मासा राज्याच्या सागरी क्षेत्रात दिसत असल्याने अंतर्गत प्रवाहात नक्कीच काही बदल होत असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.

 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@