'चित्रभारती' चित्रपट महोत्सवाचे पोस्टर अनावरण संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |




मुंबई, दि. ४ ऑक्टोबर (वृत्तसंस्था) –
इराणी चित्रपटांत इराणी संस्कृती, तेथील वातावरण प्रकट होते. जपानी चित्रपटांत जपानी तर कोरियन सिनेमांमध्ये त्यांची संस्कृती दिसून येते. भारतीय सिनेमांमध्ये मात्र पाश्चात्य अंधानुकरण, तेथील वातावरण दिसून येते. येथील चित्रपटात भारतीयत्व उमटणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले. फेब्रुवारीत अहमदाबाद येथे होणाऱ्या चित्रभारती चित्रपट महोत्सवाच्या पोस्टर अनावरण समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ संगीतकार-गायक कौशल इनामदार, चित्रपट दिग्दर्शक–अभिनेते संचित यादव व अभिनेत्री पूर्णिमा वाव्हळ-यादव आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी रुईया महाविद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रमोद बापट म्हणाले की, चित्रपट तुमच्या मनावर खोल परिणाम करतात. आजवर एका विशिष्ट विचारधारेची अभिव्यक्ती भारतीय चित्रपटांतून केली गेली. समाजातील दुफळी, शोषक-शोषित संघर्ष, सदोष व्यवस्था, बंडखोरी, अस्थिरता, व्यवस्थेविरोधात बंड करून उठणारे नायक असेच चित्र चित्रपटांच्या माध्यमातून उभे करण्यात आले. समाजातील नकारात्मकतेचे चित्रण करणारे चित्रपटच चांगले आणि प्रभावी असतात असा प्रेक्षकांचा समज तयार झाला. हे वातावरण बदलणे आवश्यक आहे. भारतीय चित्रसाधनेला हे चित्र बदलायचे आहे. भारतीय वातावरण, मूल्ये, नातेसंबंध, भारतीय स्त्रीजीवन अशा नऊ विषयांवर आधारित अशा चित्रपटांचा समावेश या चित्रपट महोत्सवात करण्यात येणार आहे.

कौशल इनामदार म्हणाले की, इंटरनेटमुळे माध्यमांचे लोकशाहीकरण झाले आणि चित्र झपाट्याने बदलले. भारतातील प्रसिद्ध प्रशिक्षण केंद्रांमधून शिक्षण घेतल्यानंतर चित्रपट क्षेत्रात स्थिरावण्याचा काळ आता मागे पडला आहे. चांगला कॅमेरा असणाऱ्या मोबाईलच्या आधारे चित्रिकरण करून आपण एखादी भूमिका मांडू शकतो. एखाद्या चुकीच्या भूमिकेला योग्य पर्याय देऊ शकतो. याची जाणीव झाल्यामुळे प्रस्थापितांच्या सत्तेला हादरे बसू लागले आहेत. हीच या माध्यमाची शक्ती आहे, फक्त ती शक्ती योग्य प्रकारे वापरली गेली पाहिजे.



आपल्याला अनेक गोष्टींमध्ये सुधार होणे आवश्यक असल्याचे वाटत असते, याकरिता दुसऱ्यांना उपदेश देण्याऐवजी आपण काय करु शकतो, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे दिग्दर्शक, अभिनेता संचित यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. या क्षेत्रात मोठे होण्याकरिता लघुपटापासून सुरुवात करावी, लघुपटातूनच आपल्याला आपल्या लहान लहान चुका निदर्शनास येतात. हे सर्व करीत असताना आपल्याला अनेक अडचणी येतील, त्यांना सामोरे जाऊन पुढे जात राहावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भारतीय चित्र साधनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रभारती चित्रपट महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. अहमदाबाद येथे २१, २२ व २३ फेब्रुवारी या काळात हा महोत्सव होणार असून यात सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे चित्रभारतीच्या वतीने ज्योत्स्ना गर्ग यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री अभिजीत गोखले, कोकण प्रांत प्रचारक विपीनकुमार, शिक्षण प्रसारक मंडळीचे संचालक सुरेश देवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@