महासत्तेच्या दिशेने...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |



भारत देश जगात महासत्ता बनेल, असे भाकीत व्यक्त करण्यात येत होते आणि तशी पावले पडत आहेत, असे आता प्रत्येक भारतीयाला वाटायला लागले आहे. कारण, आपल्या देशाची कामगिरीही जगातल्या बलाढ्य देशांच्या बरोबरीने होऊ लागली आहे. काश्मीरमधून ३७० आणि ३५ अ कलम रद्द होताच, या देशातील परिस्थिती बिघडेल, असे आजूबाजूच्या देशांना वाटत होते. पण, तसे काही घडले नाही. त्यामुळे, आपल्या देशाची प्रतिमा उंचावली आणि बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही आपल्या पंतप्रधानांना बरोबरीने वागवू लागले. यामागे आर्थिक सुधारणा हे कारण आहे असे नाही, तर सर्वच बाबतीत आपण प्रगत होत चाललो आहोत आणि त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जात आहे. आर्थिक दारिद्य्र संपविले तर आपली देशांतर्गतच प्रगती होते, पण तांत्रिक दारिद्य्र, ज्ञानाचे दारिद्य्र आणि वैचारिक दारिद्य्र घालविले तर आपली मान आंतरराष्ट्रीय स्तरावरही उंचावते, इतर देश आपल्याकडे सन्मानाने बघायला शिकतात, हे 'चांद्रयान-२' मोहिमेमुळे सिद्ध झाले. चंद्रापासून केवळ दोन किमी. अंतरावर असतानाच चांद्रयानाचा (विक्रमचा) संपर्क तुटल्यामुळे हे अभियान अयशस्वी झाल्याचा आनंद पाकिस्तानने व्यक्त केला, तर भारतासारख्या गरीब देशाला एवढा मोठा खर्च परवडणारा आहे का, असा विचार आर्थिक दारिद्य्राची चिंता करणाऱ्या भारतीयांनीही व्यक्त केला. पण चंद्रावर पोहोचण्यात अपयश आले असले तरी भारतीय शास्त्रज्ञांनी मोठी झेप घेतली होती. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना दिलासा दिला. भारताचे 'स्वदेशी तंत्रज्ञान' चंद्रापर्यंत जाण्यात यशस्वी झाले होते, याचा त्यांना आनंद होता. कारण भांडवल म्हणून भारताला तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आपले तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि त्यासाठी देश किंमत मोजत आहे. अशावेळी केवळ आर्थिक विचार करून चालत नाही. 'चांद्रयान-२' मोहिमेतील विक्रम लँडरची पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येईल, असे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी जाहीर केले आहे. तांत्रिक ज्ञानवृद्धीचे हे द्योतक आहे. तांत्रिक ज्ञान आणि वैचारिक ज्ञानात वृद्धी झाली तरच महासत्ता म्हणून भारताचे नाव सर्वतोमुखी होईल.

 

शाश्वत विकासाचा महामार्ग

 

मुंबई मेट्रो रेल ही विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरली आहे. कधी तांत्रिक ज्ञानावर आधारित असलेल्या कामामुळे, कधी मुंबईभर विणण्यात येत असलेल्या जाळ्यामुळे, कधी भुयारी मार्गामुळे, तर कधी कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे सातत्याने मेट्रो हा चर्चेचा विषय झाला आहे. गेली तीन वर्षे मेट्रोचे काम चालू असून त्यातून उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करत पुढे जात असल्याने मुंबईकरांच्या ते अंगवळणी पडले आहे. मात्र, गुरुवारी १९ व्या भुयाराचे खोदकाम पूर्ण झाले आणि शुक्रवारी आरे विरोधातील सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या. आरेमधील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे भुयारी मेट्रोचे काम पुन्हा चर्चेत आले. मुंबईच्या भूगर्भातून जाणारी मुंबई मेट्रो-३ ही देशातील पहिली मार्गिका आहे. ५२ किमी.च्या मार्गावर एकूण ३२ भुयारे आहेत आणि दोन ते तीन मजल्यांची २६ स्थानके आहेत. हे काम करतात कसे, भुयार खोदणारे ७०० टन वजनाचे टीबीएम यंत्र खाली सोडतात कसे, असा प्रश्न अऩेकांना पडतो. टीबीएम यंत्र भुयारात सोडण्यात येत नसून त्याचे सुटे भाग भुयारात सोडून नंतर त्याची जोडणी करण्यात येते. त्यानंतर ते कार्यरत होते. खोदकामासाठी वापरण्यात येणारे 'सूर्या-१' हे टीबीएम यंत्र. विधानभवन ते चर्चगेट हे ४९९ मीटरचे भुयार पूर्ण करून ते ९० दिवसांनी गुरुवारी बाहेर आले. त्यामुळे येथेही तंत्रज्ञांचे कौशल्य पणाला लागते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ५५ लाख झाडे, तर आरे कॉलनीत ३४ लाख झाडे आहेत, तरीही मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त आहे. आज झाडांमुळे जेवढे प्रदूषण शोषले जाते, ते सर्व प्रदूषण मेट्रो ४ दिवसांत शोषून घेणार आहे. मेट्रोतून भविष्यात १ कोटी लोक सुरक्षित प्रवास करणार आहेत. तसेच कुलाबा ते सिप्झमार्गे वांद्रे अशी धावणारी मेट्रो सात ठिकाणची व्यावसायिक केंद्रे एकमेकांशी जोडणार आहे. त्यामुळे मेट्रो ही पर्यावरण, मनुष्यवहन आणि आर्थिक सुबत्ता यामुळे विकासाचा शाश्वत महामार्ग ठरणार, हे नक्की!

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@