विक्रमी यश मिळेल : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |



मुंबई : भाजप, शिवसेना, रिपब्लिकन, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती यांच्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत व्यक्त केला. भाजप-शिवसेनेतर्फे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले. भाजप-शिवसेना युती ही हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष व्यापक वैचारिक भूमिकेतून एकत्र आले आहेत."

 

"विधानसभा निवडणुकीचे जागावाटप करताना आम्ही सर्व घटक पक्षांनी तडजोड केली आहे. भाजप १५९, शिवसेना १२४ तर अन्य घटक पक्ष १४ जागा लढविणार आहेत. जागावाटपावरून काही ठिकाणी नाराजी असली तरी दोन दिवसांत सर्व बंडखोरांची समजूत काढण्यात यश मिळेल."

 

"आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्याच्या विकासाला गती दिली. पुन्हा सत्तेवर आल्यावर आम्हाला राज्यातील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करून सुजलाम् सुफलाम् करायचे आहे. आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला अभूतपूर्व यश मिळेल," असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

महायुतीत बंडखोरी नाही

 

"महायुतीतून बंडखोरी होणार नाही," असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. "नाराज नेत्यांना दोन दिवसांत समजावले जाईल," असे ते म्हणाले. "मात्र, तरीही कोणी बंडखोरी केलीच तर त्यांना त्यांची जागा जनताच दाखवून देईल," असा इशाराही त्यांनी दिला. "पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली नाही, त्यांचे तिकीट कापले, हा शब्दप्रयोग बरोबर नाही तर त्या कार्यकर्त्याची जबाबदारी बदलली आहे, त्याला विधानसभेऐवजी विधानसभेबाहेरची जबाबदारी दिली आहे, असे म्हटले पाहिजे," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@