शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019
Total Views |
 
 


 

मुंबई : शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला असता सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व आमदार व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

 

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शिंदे म्हणाले, “युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेबांनी गटनेतेपदासाठी माझे नाव सुचवणे हा माझा बहुमान आहे. विधिमंडळ हे लोकशाहीचे पवित्र मंदिर असून या मंदिराचे पावित्र्य राखून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग शिवसेनेचे आमदार पूर्ण क्षमतेने करतील. उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि सर्व सहकारी आमदारांनी दाखवलेल्या विश्वासाला पूर्णतः पात्र ठरण्याचा प्रयत्न मी करेन.
 
 

शिवसेना सत्तेत असली वा नसली तरी नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी लढत असते. दुष्काळाशी सामना करत असताना सरकार काही करेल याची वाट न बघता उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेबांनी दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. शिवजलक्रांती योजना, बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना यांसारख्या उपक्रमांमधून दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी पावले उचलली. त्यामुळेच जनतेला शिवसेनेचा आधार वाटतो. शिवसेना खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची प्रतिनिधी आहे,” असेही शिंदे म्हणाले.

 
 

२०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद भूषवताना अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत शिंदे यांनी दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नावरून सरकारला सळो की पळो करून सोडले होते. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) या नात्याने एमएसआरडीसीचा संपूर्ण कायापालट करण्याची करामत श्री. शिंदे यांनी करून दाखवली. कार्यभार हाती घेतला त्यावेळी मरणप्राय अवस्थेत असलेल्या एमएसआरडीसीच्या माध्यमातून आज नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, वाशी येथील तिसरा खाडी पुल, मुंबई-पुणे दृतगती महामार्गाचा क्षमता विस्तार (खालापूर ते लोणावळा टनेल मार्ग), शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण, विदर्भातील रेल्वेवरील २७ उड्डाणपुल अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत.

 
 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजनाही त्यांनी राबवल्या. परिणामी अपघातांमध्ये बळी जाण्याचे प्रमाण कमी झाले. हे प्रमाण शून्यावर यावं यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने झिरो फटॅलिटी कॉरिडॉर योजनेची अमलबजावणी सुरू आहे. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यावर त्यांनी अवघ्या आठ महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आशा सेविकांची पगारवाढ, वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने दुर्गम भागात काम करणाऱ्या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना सेवेत कायम करणे, एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदांची भरती, राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्या सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय, असे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले.

 
 

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ठाणे शहर व जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. धोकादायक अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेला मंजुरी मिळवून या योजनेसमोरील सर्व अडचणी दूर केल्या. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून लाखो नागरिकांना मालकी हक्काचे सुरक्षित घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ठाणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून ठाणे व मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे.

 

शिवसेना नव्या सरकारमध्ये सामील होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व नेत्यांची बैठक गुरुवारी सकाळी मातोश्रीवर सुरू आहे, दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांसह प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मान्य असेल, अशी प्रतिक्रीया बैठकीला जाण्यापूर्वी दिली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, शिवसेनेचे सर्व आमदार आता राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार आहेत.  

@@AUTHORINFO_V1@@