नवतेला वाव आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019
Total Views |




एकीकडे देशातील स्वयंघोषित अर्थतज्ज्ञ मंदीच्या परिस्थितीचा कांगावा करून मोदींविरोधात मांड ठोकत असताना, वाहन उद्योगांनी चोखाळलेली नवतेची वाट आशेचे किरण दाखवणारी आहे.


देशातील मंदीच्या चर्चेलाच मुळी तोंड फोडले ते वाहन उद्योगातील अस्वस्थतेने
. मालकांनी सुरुवातीला फॅक्टरीतील कामांचे कमी केलेले तास, पर्यायाने आवरते घेतलेले उत्पादन आणि कर्मचारी कपातीच्या अनुषंगाने वाहन उद्योगावरील संकटांची मालिका एकामागून एक रंगवली गेली. या मंदीसदृश्य परिस्थितीमुळे जणू आपला देश देशोधडीलाच लागल्याच्या ‘अन्’अर्थपूर्ण चर्चांनाही उधाण आले. वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने, वृत्तवाहिन्यांवरील तोंडदेखल्या चर्चांमध्येही एकाएकी मंदीचे काळे सावट पसरू लागले. देशाच्या पंतप्रधानांपासून ते अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्रातले कसे अपुरे ज्ञान आहे, त्याचे दाखले ही मंडळी आकडेवारीची पारायणे करून पटवून देऊ लागली.



बाजार कसा बसलाय
, तरुणांच्या हाताला कसा रोजगार नाही, यांसारख्या नकारात्मक मुद्द्यांवरच या महाभागांनी प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. पण, मंदीसदृश्य ही परिस्थिती एकट्या भारतातच नाही, तर जगभरातील विकसनशील, विकसित देशांनाही भेडसावत असल्याच्या तथ्याकडे मात्र त्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्षित केले. जगभरातील अर्थव्यवस्था या एकखांबी नाहीत. जागतिकीकरणामुळे आज प्रत्येक देश एकमेकांशी आणि पर्यायाने वैश्विक अर्थचक्राशी जोडले गेले आहेत. त्यामुळे देशोदेशीच्या अर्थव्यवस्थेवर होणारे बरेवाईट परिणाम हे केवळ त्या देशापुरतेच मर्यादित नसून, त्याचे फायदे किंवा त्याची झळ सर्वांनाच सोसावी लागते. सौदी अरेबियाच्या ‘अरामको’ या तेलशुद्धीकरण कंपनीवर झालेला हल्ला असो अथवा अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध, त्याचे दुष्परिणाम त्या दोन देशांसह भारतासारख्या तेल आयात करणार्‍या देशांनाही भोगावे लागले, हे सत्य नाकारता येणार नाही.



भारत सरकारनेही या आर्थिक परिस्थितीची उचित दखल घेत कॉर्पोरेट कर कमी करण्यासारख्या कित्येक उपाययोजनाही त्वरित राबविल्या
. उद्योगजगतानेही त्याचे स्वागत केले. अमेरिकेनेही या आर्थिक मरगळीच्या परिस्थितीची उचित दखल घेत, त्यांच्या फेडरल बँकेने रेपोरेटमध्ये कपात केली. अशा एकूणच विपरीत परिस्थितीवर भारत यशस्वीपणे मात करत असताना, काही अग्रलेखांवर अग्रलेख खरडणार्‍या बृहस्पतींना मात्र मोदींवर खापर फोडण्याची वाईट सवय जडली आहे. पण, बाजारात नेमके काय चालले आहे, याचा नवतेच्या माध्यमातून कानोसा घेतला नक्कीच तर एक सकारात्मक चित्र दिसू शकते.मग तो मुंबई महानगरपालिकेने ‘बेस्ट’च्या ताफ्यात नवीन सहा हजार बसेस खरेदी करण्याचा घेतलेला महत्त्वाकांक्षी निर्णय असो वा मोठ्या वाहन कंपन्यांची डिजिटल झेप.



वाहनउद्योगातही असेच एका वेगळ्या प्रयोगाचे
, सकारात्मक चित्र दिसून आले. मारुती, ह्युंदाई, रॉयल एनफिल्ड यांसारख्या वाहन उद्योगातील अग्रणी कंपन्यांनी फेसबुकसोबत भागीदारी केली आहे. ही गुंतवणुकीसंबंधी व्यावसायिक भागीदारी नसून या कंपन्यांनी वाहनांची विक्री फेसबुकच्या माध्यमातून कशी वाढेल, यावर या कंपन्यांनी भर दिला. फेसबुक आणि वाहनविक्रीचा सकृतदर्शनी फारसा संबंध दिसत नसला तरी फेसबुकसह इतर समाजमाध्यमे आज ग्राहकांच्या गरजा निर्धारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. अगदी साधे उदाहरण घेऊया. अ‍ॅमेझॉनवर खरेदी करताना ज्या वस्तू आपण शोधतो, खरेदी करतो, त्या आपल्याला आपसूकच फेसबुक वॉलवरही दिसून येतात. ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या तंत्रज्ञानाची कमाल असून आज अशी शेकडो उदाहरणे देता येतील. त्यामुळे फेसबुक असो वा इतर समाजमाध्यमे, ग्राहकांच्या गरजा ओळखण्यापासून ते त्या गरजांची पूर्तता करणार्‍या वस्तूंची मागणी निर्माण करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण, काळाप्रमाणे जाहिरात आणि विपणनाच्या शास्त्रातही आमूलाग्र बदल झाले असून ‘गुडविल’ आणि ‘गुड प्रॉफिट’साठी डिजिटल माध्यमांची जोड आज प्रत्येक उद्योगधंद्याला आवश्यकच आहे.



नेमकी हीच बाब हेरून वाहन उद्योगातील कंपन्यांनीही फेसबुकचा
‘फेस’ वाहनविक्रीसाठी वापरण्याचे ठरवले. त्यांनी अवलंबलेल्या अशाच एका धोरणाला म्हणतात ‘झिरो फ्रिक्शन फ्युचर.’ ग्राहकांची खरेदी सुलभ करणे आणि उद्योगांची व्यावसायिक वाढ हाच यामागील उद्देश. ‘फ्रिक्शन’ म्हणजे अडथळा. संभाव्य ग्राहकांना खरेदी करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास, खरेदी-विक्रीची ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामध्ये त्या उत्पादनातील दोष, माध्यमांनी रंगवलेली त्या उत्पादनाची नकारात्मक प्रतिमा अशा माध्यमांशी निगडित असलेल्या आणि नसलेल्या अनेक कारणांचाही समावेश होतो. तेव्हा, अशाप्रकारे संभाव्य ग्राहक आणि त्याची वाहनखरेदी यामध्ये कोणत्याही प्रकारचे ‘फ्रिक्शन’ निर्माण होऊ नये, यासाठी काही बड्या वाहन उद्योगांनी फेसबुकशी हातमिळवणी केली. चारचाकी आणि दुचाकींच्या खरेदींमध्ये तीनपैकी एक व्यक्ती ही फेसबुकमुळे प्रभावित होत असल्याची बाब त्यांच्या संशोधनाअंती अहवालातून समोर आली. मग काय, या कंपन्यांनी फेसबुक तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपले संभाव्य ग्राहक शोधण्यापासून, बाजारपेठांचा विस्तार ते त्यांना वाहन खरेदीसाठी उद्युक्त करण्यापर्यंत पद्धतशीरपणे डिजिटल विक्रीची रणनीतीच आखली आणि ते यशस्वीही झाले.



वाहनउद्योगांच्या या बदलत्या डिजिटल धोरणांतून धडा घेण्याची आज प्रत्येक उद्योगधंद्याला नितांत गरज आहे
. पारंपरिक विपणनाच्या, जाहिरातींच्या मार्गांबरोबरच डिजिटल माध्यमांतील ही नवता सर्वार्थाने मरगळलेल्या व्यवसायांना बळ देणारी आहे. जो उद्योग मंदीच्या या तंग परिस्थितीतही असे प्रयोग करण्याचे धाडस करतो, आपला ग्राहकवर्ग विस्तारण्याचे, बाजारपेठेची नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याचे ध्येय उराशी घेऊन वाटचाल करतो, त्यांच्या मनगटांना अधिक बळ दिले पाहिजे. मेंदूच्या एका बंद कोपर्‍यातून मंदीच्या ठोकळेबाज चर्चा न रंगवता, अशा प्रयोगांची यशस्विता उद्योजकांना समजून, पटवून द्यायला हवी. कारण, देशाच्या अर्थकारणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रत्येकाचे एक योगदान असते. माध्यमांना तर हे सपशेल लागू होते.



कारण
, जनमानसाची मतनिर्मिती, मतपरिवर्तन यामध्ये माध्यमांची भूमिका मोलाची ठरते. याची जाण आज माध्यमांबरोबरच केवळ परिस्थितीजन्य आकडेवारीचा जनतेवर मारा करणार्‍या पुरोगामी अर्थतज्ज्ञांनीही ठेवायलाच हवी. मंदीला केवळ चर्चांमध्ये कुरवाळत ‘फाईव्ह स्टार’ आयुष्य जगणार्‍या तथाकथित अर्थतज्ज्ञांनी त्यांच्या कोषातून बाहेर येऊन जरा आजूबाजूलाही पाहावे. यंदाची दिवाळी त्याची दीपवणारी साक्षीदारच म्हणावी लागेल. दीपोत्सवाच्या तेजाबरोबरच बाजारातील उलाढालीही रॉकेटसारख्या सुसाट होत्या. ग्राहकांबरोबरच व्यावसायिकांनीही दिवाळीत मंदी नाही, तर सुवर्णसंधीची अनुभूती घेतली. पण, ज्यांना मंदीच्या घुसमटवणार्‍या धुरात काहीच दिसत नाही, त्यांच्यापर्यंत नवतेची ही प्रकाशशलाका पोहोचणार तरी कशी? म्हणून उगाचच मंदीचे मापक म्हणून ‘अंडरवेअर इन्डेक्स’ आणि तत्सम अशास्त्रीय पद्धतींचा बोभाटा न करता, नवतेच्या या पाऊलखुणांच्या वाटांची दखल घेतली तर अर्थउन्नतीचा मार्ग अधिक सुकर होईल.

@@AUTHORINFO_V1@@