अब तक फक्त ‘५६’?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2019
Total Views |



१९९९ ते २०१ असे खालावणार्‍या संख्याबळाचे वास्तव आक्रमकपणाचा आव आणून फार काळ दडविता येणार नाही
. आधी भांडून नंतर अपमानास्पद पद्धतीने मिळविलेला राजकीय वाटा शिवसेनेची प्रतिमा खालावण्यास कारणीभूत नाही ना, याचा विचार केला पाहिजे.



दिवाळीचा सण संपवून महाराष्ट्राची जनता कामाला लागली
. पण, महाराष्ट्राच्या मंत्रालयात अद्याप काही सत्तेचा दिवा पेटायला तयार नाही. काळजीवाहू आणि पुढील पाच वर्षांसाठी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरीही सत्तेचा वाटेकरी असलेली शिवसेना अद्याप सुखाने नांदायला तयार नाही. शिवसेनेने ‘समसमान’चा शिमगा सुरू ठेवला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे, त्यात काही किंतु-परंतु नक्कीच आहेत. पण, सर्वात मोठा पक्ष मात्र भारतीय जनता पक्षच आहे. २१ ऑक्टोबर रोजी जे निकाल लागले, त्यात भारतीय जनता पक्षाला १०५, तर शिवसेनेला फक्त ५६ जागा जिंकता आल्या. जागा दोन्ही पक्षाच्या कमी झाल्या असल्या तरी राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला त्याचा किती फरक पडणार? जागा कितीही कमी झाल्या तरीही मुख्यमंत्रिपद भाजपकडेच आहे आणि त्याला न्याय देऊ शकेल, असा चेहराही भाजपकडेच आहे.



भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती केली
. युती हा राजकीय समझोताच असतो. कुठलाही समझोता हा जसा परस्परांच्या लाभासाठीच केला जातो, तसा युती हादेखील एक प्रकारचा समझोताच आहे. वाढीची संपूर्ण लक्षणे असलेल्या कुठल्याही पक्षाने युतीच्या निमित्ताने तडजोड करणे म्हणजे जितक्या जागा मित्रपक्षाला दिल्या तितक्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यासारखेच असते. यातून निर्माण होणारा अंतर्गत रोषही हे करणार्‍या मंडळींना भोगावा लागतो. आता हे सारे कशासाठी करायचे तर ते वाढीसाठी. आताचे हे आकडे पाहिले तर युतीचे आकडे युतीमुळे लाभ झाला, असे म्हणण्यासारखेच आहेत. पुन्हा मुद्दा येतो तो म्हणजे शिवसेना योग्य प्रकारे नांदली का? तर या प्रश्नांचे उत्तर खुद्द सेना नेतेही नकारात्मकच देतील. जरा या दोन्ही पक्षांचा गेल्या काही निवडणुका लढविण्याचा आणि जिंकण्याचा आकडा पाहिला तर कोण किती पाण्यात आहे हे सहज लक्षात येईल.



१९९० साली शिवसेना
-भाजपची युती झाली. शिवसेनेने १८३ जागा लढविल्या होत्या, तर त्यांच्या हाती ५२ जागा लागल्या होत्या. भाजपने १०४ जागा लढविल्या होत्या, त्यांना ४२ जागा मिळाल्या होत्या. १९९५ साली शिवसेनेने १६९ जागा लढविल्या होत्या, तर त्यांच्या हाती ७३ जागा लागल्या होत्या. भाजपने ११६ जागा लढविल्या होत्या, तर त्यांना ६५ जागा मिळाल्या होत्या. १९९९ साली शिवसेनेने १६१ जागा लढविल्या होत्या, तर त्यांच्या हाती ६९ जागा लागल्या होत्या. भाजपने ११७ जागा लढविल्या होत्या, तर त्यांना ५६ जागा मिळाल्या होत्या. २००४ साली शिवसेनेने १६३ जागा लढविल्या होत्या, तर त्यांच्या हाती ६२ जागा लागल्या होत्या. भाजपने १११ जागा लढविल्या होत्या, तर त्यांना ५४ जागा मिळाल्या होत्या. २००९ साली शिवसेनेने १६० जागा लढविल्या होत्या, तर त्यांच्या हाती ४४ जागा लागल्या होत्या. भाजपने ११९ जागा लढविल्या होत्या, तर त्यांना ४६ जागा मिळाल्या होत्या. २०१४ साली शिवसेेनेने २८२ जागा लढविल्या होत्या, तर त्यांच्या हाती ६३ जागा लागल्या होत्या. भाजपने २६० जागा लढविल्या होत्या, तर त्यांना १२२ जागा मिळाल्या होत्या. २०१९ ला हा आकडा भाजपच्या उंचावत्या कमानीला धरून नसला तरीही तो असमाधानकारक नक्कीच नाही.

कालच्या आपल्या माध्यमांशी संवादात संजय राऊत यांनी लोकशाहीत ‘एक’ला महत्त्व असल्याचे सांगितले होते. हाच ‘एक’ २००९ साली भाजप आणि शिवसेनेतला महत्त्वाचा फरक होता. आज ‘समसमान’चे तुणतुणे वाजविणार्‍या शिवसेनेने २००९ सालची ही स्थिती लक्षात घेतली नव्हती. राजकारण हा इतक्या धूर्तपणे खेळायचा खेळ असतो की, वास्तव काहीही असले तरीही त्याउपर उठून अधिकाधिक पदरात पाडून घ्यायचे असते. प्रशांत किशोर, संजय राऊत हे सध्याचे शिवसेनेचे शिलेदार आहेत. इतकी आपटी खाऊनही शिवसेना आत्मचिंतन करायला तयार नाही. याउलट सत्तेतला वाटा मिळविण्यासाठी हपापलेली आहे. भाजप सत्तेचा वाटा द्यायला तयार नाही असे मुळीच नाही. ५६ जागा मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला की, त्याचे आणि त्याच्या पक्षाचे काय होते ते कर्नाटकात कुमारस्वामींनी दाखवून दिले आहे. शिवसेनेचेही यापेक्षा काही वेगळे होणार नाही, ही काळ्या दगडवरची रेघ आहे. मुख्यमंत्रिपदाला पर्याय म्हणून उपमुख्यमंत्रिपदाची अपेक्षा शिवसेना धरून आहे.

उपमुख्यमंत्रिपद हा शिवसेनेसाठी नियतीने लावलेला सापळा आहे. आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री केले तर पुढचे ‘नारायण राणे’ शिवसेनेत तयार आहे. कुठलाही पक्ष एका निश्चित ताकदीशिवाय अस्तित्व टिकवून नसतो. तळागाळातून आलेले शिवसैनिक आणि त्यातून निर्माण झालेले दुसर्‍या क्रमांकाचे नेतृत्व हीच शिवसेनेची ताकद. त्याला हरताळ फासून घराण्याचा वारस डोक्यावर बसविण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेनेत बंड होईल. तसे बंड शिवसेनेत दोनदा झाले आहे. एकदा पवारांची फूस त्याला होती, तर दुसर्‍यांदा ‘उद्धव की राणे?’ या प्रश्नामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. खुद्द बाळासाहेबांच्या हयातीतच हे सारे घडले होते. आज आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघांत फुटून आलेल्या सचिन अहिर यांच्या कार्यालयात जाऊन बसतात.

सर्वसामान्य शिवसैनिकांनी इथे कडवा संघर्ष केला होता. हे सारे शिवसैनिक पाहत असतात. त्यांना गृहित धरून जे काही चालले आहे त्याची शिक्षा सेनेला गेल्या दहा वर्षांत मिळत आली आहे. उपमुख्यमंत्रिपदी आदित्य सोडून अन्य कुणाला बसविले तर सत्तेच्या बळाने तो मोठा होऊन जातो. इतका मोठा की, ‘ठाकरे मोठे की उपमुख्यमंत्री’ हा प्रश्न पडावा. म्हणूनच, नियतीचा सापळा शिवसेना कसा चुकवते की त्यात ती फसते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. संजय राऊत जे बोलतात त्याला उद्धव ठाकरेंचे ‘मम’ असते हे निराळे सांगायला नको. कजागपणाचे जे भांडण उद्धव ठाकरे भांडू शकत नाही, ते राऊत यांच्याकडून करून घेत असतात. वर उल्लेखलेल्या आकड्यांचा विचार केला तर शिवसेनेची स्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येईल. भांडून नंतर अपमानास्पद पद्धतीने मिळविलेला राजकीय वाटा शिवसेनेची प्रतिमा खालावण्यास कारणीभूत नाही ना, याचा विचार केला पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@