इमरान खान यांच्या ‘उम्मा’च्या नार्‍याला सौदीचा झटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० चे निष्प्रभीकरण व राज्याच्या पुनर्गठनावरून सौदी अरेबियाने भारताचे समर्थन केले आहे. काश्मीर प्रश्नावर बिथरल्याने इस्लामी ‘उम्मा’चा नारा देणार्‍या पाकिस्तानला यामुळे जोरदार झटका बसला आहे, तर जगभरातील प्रमुख इस्लामी ताकद मानल्या जाणार्‍या सौदी अरेबियाचे समर्थन मिळवून भारताने मुत्सद्देगिरीबाबत मोठे यश मिळवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सौदी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यात रियाध येथे चर्चा झाली, त्यावेळी सौदीने आपला पाठिंबा जाहीर केला.

 

मिळालेल्या माहितीनुसार या भेटीवेळी दोन्ही देशांमध्ये कितीतरी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. चर्चेवेळीच जम्मू-काश्मीरचा मुद्दाही उपस्थित झाला, त्यावर सौदी क्राऊन प्रिन्स म्हणाले की, "आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये भारताने उचललेल्या पावलाची माहिती आहे व ते आम्ही समजूही शकतो."

 

इमरान खान यांची सौदीवारी निरर्थक

नुकताच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. त्यानंतर सौदी अरेबियाकडून भारताचे समर्थन होणे, त्यांच्यासाठी मोठा झटका आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सौदी अरेबियाबरोबर संबंध सुधारण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. परिणामी, सौदी अरेबिया सुरक्षा आणि गुप्तवातसारख्या मुद्द्यांवरही भारताचा सहयोगी देश म्हणून समोर आला.पाकिस्तानच्या योजनांना विकासाचा सुरुंग!

 

जम्मू-काश्मीरवरून भारत व पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतून आश्वासक वक्तव्य केले आहे. अमेरिकेच्या तीन दिवसीय दौर्‍यावर असलेल्या एस. जयशंकर यांनी म्हटले की, "जम्मू-काश्मीर विकासाच्या मार्गावर चालू लागल्यावर तिथे अशांतता पसरविण्याच्या पाकिस्तानी योजना अपयशी ठरतील. जम्मू-काश्मीरमधील काही लोक आणि सीमेपलीकडच्यांच्या निहित स्वार्थामुळे मोदी सरकारने कठोर प्रतिक्रिया देण्याचे धोरण स्वीकारले आहे. गेल्या ७० वर्षांत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरला उद्ध्वस्त करण्याच्या योजना तयार केल्या, पण आता आम्ही विकासाच्या माध्यमातून त्यांच्या योजना विफल करण्याचे ध्येय निश्चित केले आहे."

 

भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ केल्याने व राज्य विभाजनामुळे पाकिस्तानातील दहशतवादी गट भारतात दहशतवादी हल्ला करू शकतात, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. पाकिस्तानने या दहशतवादी गटांना मोकळीक न देता नियंत्रणात ठेवल्यास हल्ला रोखता येणे शक्य असल्याचे अमेरिकेचे मत आहे. ‘’काश्मीरच्या निर्णयावरून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी हल्ले करू शकतात. अनेक देशांना याबद्दल चिंता आहे. पाकिस्तानने या दहशतवादी संघटनांना आवरले पाहिजे," असे मत इंडो-पॅसिफिक सुरक्षा विषयाचे सहायक सचिव शायवर यांनी व्यक्त केले. "चीनला भारत-पाकिस्तानमध्ये असा संघर्ष हवा आहे किंवा त्यांचे समर्थन आहे," असे मला वाटत नाही असे शायवर म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@