
गुजरात एक्सप्रेसमधून साडेसात कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासूनच राज्य निवडणूक आयोग व राज्य पोलिसांचे अनधिकृत पैशांच्या व्यवहारावर बारकाईने लक्ष आहे. या निवडणूक हंगामातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई रेल्वे पोलिसांकडून बोरिवली रेल्वे स्थानकावर करण्यात आली. तब्बल साडेसात कोटींचा ऐवज या कारवाईत बोरिवली स्थानकावर जप्त केला.
मुंबई सेंट्रल स्थानकावरून हा ऐवज घेऊन जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना कळताच रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचत ही कारवाई केली. गुजरात मेलमधील एस-५, एस-६ आणि एस-७ या डब्यांमध्ये तपासणी केली. तपासणीत तब्बल ३५ बॅगा भरून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यात १० लाखांच्या रोख रकमेसह हिऱ्यांचे हार, सोन्याचे दागिने यांचा समावेश होता, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. याप्रकरणी १९ जणांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. रात्री पावणे अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ही सगळी रक्कम व ऐवज सुरज कुरिअर कंपनीची असल्याची माहिती सध्या समोर येत आहे, पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.