तुमच्याकडून राष्ट्रवादाचे धडे नको!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2019
Total Views |




युरोपियन संघाचे प्रतिनिधी मंडळ काश्मीर दौर्‍यावर नुकतेच दाखल झाले. त्यावर 'बाहेरच्यांना काश्मिरात प्रवेश आणि येथील लोकप्रतिनिधींना का नाही,' असा सवाल प्रियांका गांधींनी उपस्थित केला. परंतु, भाजपचा हा अजब राष्ट्रवाद असल्याची टीका करणार्‍या प्रियांका गांधी आणि काँग्रेसने खरंतर राष्ट्रवादावर बोलण्याचा नैतिक अधिकार कधीच गमावला आहे.

एखादे विशिष्ट खेळणे लहान मुलाला आवडले नाही, तर ते तो सरळ झिडकारतो. प्रसंगी फेकूनही देतो. पण, मग तेच खेळणे इतर मुलाच्या हातात देताना पाहिले की जोरजोरात भोकाड पसरतो. ते खेळणे नावडते असले तरी ते दुसर्‍या मुलाच्या हाती सहन होत नाही. 'माझे ते माझेच, मग ते कसे का असेना,' ही साधारण वृत्ती. काँग्रेस पक्ष आणि विरोधकांचीही सध्या हीच अवस्था झालेली पाहायला मिळते. ज्या काश्मीर प्रश्नाकडे ७० वर्षांमध्ये कधी गांभीर्याने पाहण्याचे ज्यांनी स्वारस्यही दाखवले नाही, त्यांना आज काश्मीरमध्ये प्रवेश नाकारल्यावर मिरच्या झोंबत आहेत. 'युरोपियन संघाचे प्रतिनिधी मंडळ काश्मिरात प्रवेश करते, मग आम्ही लोकप्रतिनिधींनी काय पाप केले?' असा सवाल विचारण्यापूर्वी प्रियांका गांधींनी म्हणूनच जरा आत्मपरीक्षण केले असते, तर त्याचे उत्तर कदाचित त्यांना मिळालेही असते.

 

जम्मू-काश्मीरमधून 'कलम ३७०' हटविल्यानंतर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकारला निश्चितच काही कडक पावले उचलावी लागली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून संचारबंदी लादणे नैसर्गिकच. त्यातच दहशतवाद्यांनी काश्मीरमधील संवेदनशील परिस्थितीचा फायदा घेत, अराजकत्वाचे अवडंबर माजवू नये, याची पूर्ण खबरदारी सरकारने घेतली. या सगळ्याची पूर्वकल्पना असतानाही राहुल गांधींसह काही विरोधकांनी काश्मीरला भेट देण्याचा आक्रस्ताळेपणा केलाच. केंद्र सरकारने त्यांना श्रीनगर विमानतळावरून राजधानीत माघारीही पाठविले. खरंतर तेव्हाही विरोधकांचे मनसुबे काश्मिरींचे अश्रू पुसण्याचे नव्हते. त्यांना काश्मिरात घुसून फक्त मोदी सरकारविरोधात स्फोटक विधाने करून परिस्थिती चिघळवण्याचाच छुपा अजेंडा होता. पण, मोदी सरकारने विरोधकांची डाळ काही शिजू दिली नाही. म्हणूनच आता जेव्हा युरोपियन संघाचे २८ सदस्यांचे मंडळ काश्मीर दौर्‍यावर दाखल झाले असताना काँग्रेसने पुन्हा एकदा रडारड सुरू केलेली दिसते.

 

लोकशाहीत लोकप्रतिनिधींचे स्थान, अधिकार महत्त्वाचेच. पण, जर या लोकप्रतिनिधींना राष्ट्रसुरक्षेपेक्षा मतसुरक्षेची चिंता आणि मोेदींचीच निंदा करायचीच हौस अधिक असेल, तर ते देशासाठी घातकच म्हणावे लागेल. मग विषय काश्मीरचा असो वा सर्जिकल स्ट्राईकचा, विरोधकांनी सत्ताधार्‍यांना साथ न देता, उलट सरकारसह सैन्यालाही संशयाच्या फेर्‍यात अडकवले. त्यामुळे ज्यांना ७० वर्षं काश्मिरींचे दु:खाश्रू दिसलेच नाही, त्यांना असा अचानक काश्मीरप्रेमाचा उमाळा का फुटावा? संसदेत आणि संसदेबाहेरही 'कलम ३७०' वरून काँग्रेसमध्ये एकवाक्यता दिसली नाहीच, उलट काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत मुद्दा नसून तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय असल्याचे दुर्दैवी विधानही अधिररंजन चौधरी लोकसभेत करून मोकळे झाले. इतकेच नाही तर राहुल गांधींच्या 'कलम ३७०' संदर्भातील भूमिकेचे दाखले संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानने भारताविरोधात वापरले. आता अशा या गोंधळलेल्या काँग्रेसला युरोपियन संघाच्या प्रतिनिधींचा काश्मीर दौरा डोळ्यात खुपला तर त्याचे नवल ते काय?

 

युरोपियन संघाचे प्रतिनिधी काश्मीरचा फेरफटका मारायला आले नाहीत, हे आधी प्रियांका गांधींनी नीट समजून घ्यावे. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरबाबत जो अपप्रचार सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर वास्तव जाणून घेण्यासाठी हे प्रतिनिधीमंडळ काश्मिरात दाखल झाले. त्यांचा उद्देश हा पर्यटनाचा किंवा प्रियांका गांधी म्हणतात तसा हस्तक्षेपाचा मुळीच नाही. काश्मीरमधील परिस्थिती ते आपल्या डोळ्याने बघून त्याचे कथनही जगभर करतील. त्यामुळे मोदी सरकारच्या मनात किंचितही भयभावना असती, तर त्यांनी या प्रतिनिधी मंडळाला काश्मिरात प्रवेशच दिला नसता. मात्र, मोदींनी तसे काहीही केले नाही. कारण, सरकारकडे काश्मीर विषयावरून लपवाछपवीसारखे काही नाही. जे आहे, जसे आहे ते अगदी काश्मीरच्या बर्फासारखेच स्पष्ट. पण, पांढर्‍यामधूनही काळे शोेधून काढण्याची काँग्रेसींची जुनी खोड. याच अनुषंगाने प्रियांका गांधींनी 'हा कुठला अजब राष्ट्रवाद' अशी केंद्र सरकारवर केलेली टीका सर्वार्थाने हास्यास्पदच म्हणावी लागेल.

 

हास्यास्पद यासाठी की, काँग्रेसला आपण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, या योगदानापलीकडे 'राष्ट्रवादा'ची व्याख्याच आजवर करता आलेली नाही. काँग्रेसचा राष्ट्रवाद जागृत असता तर पाकिस्तानचे वेळीच त्यांना नाकतोंड दाबता आले असते. दहशतवाद्यांचा त्यांनी बेमालूमपणे सफाया केला असता. राष्ट्रवादाची निर्भेळ भावना मनात असती, तर भोपाळ गॅस कांडात हजारो देशवासीयांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या अँडरसनच्या पलायनात काँग्रेसने मदत केली नसती! राष्ट्रवादाची एवढीच चिंता असती तर ईशान्य भारतातील घुसखोरीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला असता.

 

राष्ट्रवादाची चिमूटभर भावनाही काँग्रेसमध्ये जीवंत असती तर सर्जिकल स्ट्राईकच्या शौर्ययशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा उद्दामपणा त्यांनी केला नसता. इतकेच नाही, तर जेएनयुच्या 'तुकडे तुकडे गँग'च्या 'आझादी'च्या नार्‍यांमध्ये काँग्रेसचा 'हात' उंचावला नसता. मोदींविरोधात काँग्रेसचे नेते जेव्हा शत्रुराष्ट्र पाकिस्तानची मदत घेण्यापर्यंत राष्ट्रद्रोही वागतात, तेव्हा यांचा 'राष्ट्रवाद' कुणीकडे डुलक्या घेतो? राफेलवरून देशाच्या पंतप्रधानांना 'चोर' म्हणण्यापर्यंतचा नाकर्तेपणा हा प्रियांका गांधींना कुणीकडचा 'राष्ट्रवाद' वाटतो? एवढेच नाही, तर राफेलचे फ्रान्समधील पूजनही या दुर्जनांना अंधश्रद्धेचा भाग वाटतो, तर अशांना या भारताचा राष्ट्रवाद मुळात समजलेलाच नाही. काँग्रेसचा आणि राष्ट्रवादाचा काडीमात्र संबंध नाही, हे सिद्ध करणारी आज अशी शेकडो उदाहरणे, संदर्भ देता येतील. कारण, राष्ट्रवाद म्हणजे काय, हे समजण्याची मुळात काँग्रेसकडे आकलन शक्तीच नाही.

 

राष्ट्रवाद हा राष्ट्राला सर्वतोपरी मानणारा. जात-धर्म-पंथ यांच्या बेड्या झुगारून राष्ट्रभावनेशी एकरूप होणारा तो राष्ट्रवाद. पण, ज्या काँग्रेसने केवळ मुस्लीम तुष्टीकरणाच्या धोरणालाच सेक्युलॅरिझमचा मुलामा देत कायम हिंदूंचा द्वेष केला, त्यांना आज भाजपला 'राष्ट्रवादा'चे धडे देण्याचा नैतिक अधिकार तो काय? 'हिंदू दहशतवाद'सारखा शब्द जन्माला घालून देशाची अब्रू वेशीवर टांगणार्‍यांच्या तोंडून 'राष्ट्रवादा'ची भाषा कशी काय शोभनीय वाटेल? अशा या १३४ वर्षांची परंपरा लाभलेल्या काँग्रेसने केवळ राजकीय विरोधासाठी विरोध करायचे धोरण वेळोेवेळी अवलंबले. १९७१च्या बांगलादेशी युद्धानंतरही विरोधात असूनही अटलजी तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींच्या पाठीशी उभे राहिले होते. पण, तेवढे राजकीय औदार्य काँग्रेसने कधी दाखवले नाही आणि काँग्रेसच्या नेत्यांची सद्यस्थिती पाहता, भविष्यातही त्यांच्याकडून अशा काही अपेक्षा करणे गैरच!

 

प्रियांका गांधींनी काश्मीरची चिंता आता सोडून द्यावी. काश्मीरमध्ये सर्व काही शुभ, मंगल झाले आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निकालाचे आकडे घेऊन त्यांनी पक्षातील उरल्या-सुरल्या नेत्यांबरोबर पराभवाचे चिंतन करावे. काश्मीरला नाही, तर काँग्रेसला आज नेत्याची आणि नेतृत्वाची गरज आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामनात, नसानसात राष्ट्रवादाची भावना भिनलेली आहेच. तेव्हा, भाजपला राष्ट्रवादाचे धडे देण्यापेक्षा, स्वत:चा खानदानी पक्षच नीट चालवण्याचे धडे प्रियांका गांधींनी घेतले, तर कदाचित त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे भले होईल.

@@AUTHORINFO_V1@@