वन्यजीव तस्करीचा गोरखधंदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2019   
Total Views |


 
 


गेल्या आठवड्यात 'केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागा'ने (डब्ल्यूसीसीबी) राज्यातील पाच जिल्ह्यांमधून २९ हजार, १६६ चित्रकलेचे ब्रश हस्तगत केले. ताब्यात घेतलेले हे ब्रश मुंगुसाच्या केसांपासून तयार करण्यात आले होते. या ब्रशची साधारण किंमत १५ ते २० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. 'डब्ल्यूसीसीबी'ने ही कारवाई महाराष्ट्रासह आणखी तीन राज्यांमध्ये केली. यावेळी उत्तरप्रदेशातील कारवाईमधून अधिकार्‍यांनी २५ हजार ब्रश आणि १५० किलो मुंगुसाचे केस जप्त केले. 'ऑपरेशन क्लीन आर्ट' या नावाखाली पार पडलेल्या या कारवाईमुळे देशात सुरू असलेली मुंगुसांची शिकार आणि त्यांच्या केसांच्या तस्करीचा छुपा व्यापार उघडकीस आला. मात्र, वन्यजीव गुन्ह्यांची ही दाहकता समोर येण्यास मुंगूस हे केवळ एक निमित्त आहे. मानवपयोगी वस्तूंच्या निर्मितीसाठी किंवा पाळण्याच्या हौसेपोटी वन्यप्राण्यांची तस्करी, शिकार आणि त्यांचा व्यापार छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे समोर येत असते. यामध्ये वाघ-बिबट्यांच्या कातडीबरोबरच गोड्या पाण्यातील भारतीय कासवे आणि सापांचा प्रामुख्याने समावेश आहेवन्यजीव तस्करी आणि शिकारीच्या गु्न्ह्यांमध्ये अनेक घृणास्पद बाबी समोर येत असतात. यंदा एप्रिल महिन्यात 'डब्ल्यूसीसीबी'च्या अधिकार्‍यांनी दिल्ली विमानतळावरून घोरपडीच्या कातडीपासून तयार केलेले दप्तर ताब्यात घेतले होते. हे दप्तर तयार करण्यासाठी घोरपडीच्या संपूर्ण शरीराच्या कातडीचा वापर करण्यात आला होता. वन्यजीवांच्या खरेदी-विक्री किंमतीतही बरीच तफावत असल्याचे दिसून येते. गेल्या महिन्यात वन विभागाने ठाण्यातील शोभिवंत माशांची विक्री करणार्‍या दुकानामधून चार 'स्टार' प्रजातीच्या कासवांची सुटका केली होती. 'स्टार' कासवांच्या तस्करीवर नुकतीच आंतरराष्ट्रीय बंदी लावण्यात आली आहे. या परिस्थितीत ठाण्यातील या दुकानदाराने केवळ ३०० रुपयांमध्ये चार कासवांची खरेदी केली. महत्त्वाचे म्हणजे, हा दुकानदार या कासवांना पुढे तीन हजार रुपये जोडी दराने विकणार होता. एकूणच वन्यजीव गुन्ह्यांचा हा गोरखधंदा गुंतागुंतीचा आहे. कारण, प्रत्येक वन्यजीवांच्या तस्करीमध्ये तस्करांची एक साखळी कार्यरत आहे. ही साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी तिचे सुरुवातीचे टोक गाठून मुळावर घाव घालणे आवश्यक आहे. 



 मुळावर घाव गरजेचा

 


देशात वन्यप्राण्यांच्या तस्करीमध्ये प्रामुख्याने वाघ-बिबट्याची कातडी, त्यांची नखे, गोड्या पाण्यातील कासवे आणि खवले मांजरांचा समावेश आहे. वाघ-बिबट्यांची कातडीकरिता होणारी शिकार रोखण्यामध्ये आजही आपली यंत्रणा अयशस्वी आहे. मात्र, काही वन्यजीवांची तस्करी रोखण्यास वन विभाग आणि 'डब्ल्यूसीसीबी' सारख्या शासकीय यंत्रणांना बर्‍यापैकी यश आले आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने गोड्या पाण्यातील कासवे आणि पोपटांच्या विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू होता. मात्र, 'डब्ल्यूसीसीबी'च्या महाराष्ट्र विभागाने प्राणिप्रेमी संस्थेच्या मदतीने कासवांची ऑनलाईन विक्री करणार्‍या तस्करांना ताब्यात घेऊन त्यांची साखळी उद्ध्वस्त केली. त्यामुळे 'स्टार' कासवांसह 'सॉफ्टशेल टर्टल'सारख्या कासवांच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीला चाप बसला. आता ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही भारतीय वन्यप्राण्यांची खरेदी-विक्री होताना दिसत नाही. अशा पद्धतीने मुळावर घाव घालून कारवाई केल्यास वन्यजीवांच्या तस्करीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविता येते. गेल्या आठवड्यात मुंगुसासंदर्भातील कारवाईदेखील याच पद्धतीने पार पडली. या कारवाईमुळे मुंगुसाची शिकार, तस्करी आणि त्यापासून तयार केलेल्या ब्रशच्या व्यापाराची साखळी उघड झाली आहे. परिणामी, कंपनीवरच धाड टाकून कारवाई केल्याने मुंगुसाच्या तस्करीवर रोक लागणार आहे. वन्यजीव गुन्ह्यांबाबत मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याबरोबरच समाजात त्यासंदर्भात जनजागृती करणेही आवश्यक आहे. वन्यजीवांची किंवा त्यांच्यापासून तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक हे बर्‍याच वेळा त्याबाबत अजाण असतात. बहुतांश वेळा केवळ हौसेपाटी त्यांच्याकडून प्राण्यांची वा वस्तूंची खरेदी होते. मात्र, कारवाईच्यावेळी खरेदीदारालाच त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, घरात पाळला जाणारा भारतीय पोपट. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत भारतीय पोपटांना संरक्षण मिळाल्याने त्यांची खरेदी करणे किंवा तो घरात पाळणे हा वन्यजीव गुन्हाच आहे. मात्र, त्यासंदर्भात कोणतेही प्रबोधन होत नसल्याने हे पोपट सहजरित्या घरात पाळले जातात. त्यामुळे यंत्रणांकडून समाजामध्ये वन्यजीव गुन्ह्यांसंदर्भात मोठ्या स्तरावर जनजागृती होणे गरजेचे आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@