अशीही दिवाळी पूजन श्रमाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2019   
Total Views |




दिवाळी म्हणजे तिमिरातून तेजाकडे. धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. या दिवशी धनसंपत्तीचे पूजन केले जाते. धन देणारे, सामर्थ्य देणार्‍या घटकाचे पूजन केले जाते. गोरेगावच्या भगतसिंगनगरमध्ये श्री महालक्ष्मी महिला संघ या सेवाभावी संस्थेने शौचालयाचे पूजन केले. जाणून घेऊया त्याची गोष्ट.

 

गोरेगाव भगतसिंगनगरच्या वस्तीमध्येही दिवाळी उत्साहात होती. मात्र, वस्तीतले एकमजली शौचालय दिवाळीचे तेज घेऊन अगदी लख्ख दिसत होते. शौचालयासमोर सुंदर पारंपरिक रांगोळी काढलेली होती. शौचालयाच्या पायर्‍यांवर दिवे उजळले होते. सार्वजनिक शौचालयाचे व्यवस्थापान श्री महालक्ष्मी महिला संस्था करते. व्यवस्थापन करते म्हणजे काय करते तर शौचालयाचा वापर करणार्‍या व्यक्तींकडून नाममात्र शुल्क घेतले जाते. त्याबदल्यात शौचालयाची स्वच्छता, सुरक्षा, पाणी, वीज याची व्यवस्था संस्था करते. भगतसिंगनगर सारख्या सेवा वस्तीमध्ये महिलांनी शौचालयाचे व्यवस्थापन करावे, हा वेगळाच विषय. असो, तर धनत्रयोदशीच्या दिवशी महिलांनी या शौचालयाचे पूजन केले, अतिशय भक्तिभावाने. यावर हे पूजन करणार्‍या आणि श्री महालक्ष्मी महिला संस्थेच्या अध्यक्षा जयश्री बोभाटेंचे म्हणणे "दिवाळीमध्ये अशुभला मारणार्‍या सगळ्याच शुभाची पूजा केली जाते.

 

आपल्याकडे नाही का केरसुणीची पण पूजा करतात? तर ती पण घरातील घाण साफ करून घरात सफाई आणते. सफाई, स्वच्छता असणार्‍या जागी स्वत: लक्ष्मी असते. शौचालय म्हणजे अशी जागा जी माणसाच्या आयुष्यातली गरजेची गोष्ट. ती गोष्ट अशुभ कशी? बरं आमच्यासारख्या वस्तीतल्या महिला या शौचालयाचे व्यवस्थापन करण्याचे काम करतात. यातूनच आम्हाला चार पैसे मिळतात. आमचे घरदार चालते. त्यामुळे या संपत्तीची पूजा करायलाच हवी."
 

महालक्ष्मी महिला संस्था ज्या शौचालयाचे व्यवस्थापन करते ते शौचालयही अतिशय स्वच्छ, नेटके आणि व्यवस्थित. शौचालय म्हणून आपल्या समोर जी प्रतिमा असते, त्या प्रतिमेला छेद देणारे शौचालय. रूढ अर्थाने अल्पशिक्षित अगदी सातवी शिकलेल्या जयश्री बोभाटे या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. रंजना बनसोडे, सचिव, सुभद्रा शर्मा खजिनदार आहेत. भगतसिंगनगरमध्ये मातंग समाजाची वस्ती बहुसंख्य. समाजातील भगिनी जयश्री या गृहिणी. मात्र, महिलांना घरबसल्या काहीतरी उद्योग मिळावा म्हणून त्यांनी बचतगट स्थापन केला. पाच वर्षे तो बचतगट व्यवस्थित चालला. प्रमिला शिंदे, श्रीकला पिल्ले यांच्या मदतीने त्यांनी या बचतगटाची संस्था निर्माण केली. त्याचे कारणही खास. वस्तीत एकच शौचालय. स्त्रियांचे शौचालय बेतास बेत, पण पुरुषांचे शौचालय मात्र साफ मोडकळीला आलेले. काही व्यसनी लोकांनी शौचालयाची मोडतोड केलेली. या शौचालयाची पुनर्बांधणी होणे गरजे होते.

 

श्री महालक्ष्मी महिला संस्थेने यासाठी पुढाकार घेतला. महानगरपालिका, सत्ताधारी स्थानिक प्रतिनिधी यांच्या सहकार्याने हे शौचालय बांधून घेतले. एकमजली शौचालय नव्या रूपात उभे राहिले. यासाठी जयश्री यांनी खूप धावपळ केली. खूप अडचणी आल्या, पण जयश्री थांबल्या नाहीत. कारण, कष्ट त्यांच्या रक्तातच. ‘पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही, तर कष्टकर्‍यांच्या तळहातावर तरली आहे,’ असे सांगणार्‍या अण्णाभाऊ साठे जयश्रींचे चुलत आजोबा. जयश्री यांचे माहेर चिराकनगरचे. जयश्रीचे वडील सीताराम हे महानगरपालिकेत अनधिकृत फेरीवाल्याचे सामान उचलणार्‍या गाडीवर काम करायचे. कामाहून आले की अण्णाभाऊंशी हितगुज करायचे. अण्णाभाऊंच्या कलापथकाचे लायसन्स सीताराम यांच्या नावावर. जयश्री तिसरीला असताना सीताराम वारले. सात मुली आणि एक मुलगा असलेल्या जयश्री आई सुनंदा यांच्यावर आभाळ कोसळले. पण वडिलांच्या जागी कामावर लागली. सगळ्या मुलांना मार्गी लावले. ती धडाडी, ती जिद्द जयश्रीमध्येही आहे.
 

जयश्री म्हणतात, "अण्णांच्या अंगाखांद्यावर आम्ही खेळलो. त्यांना भेटायला येणार्‍या प्रत्येकाला ते सांगायचे की, कष्टाला वाघ व्हा. लहानपणी ऐकलेले आजपण लक्षात आहे. त्यामुळे कमी शिकले म्हणून कोणतेही काम करताना मला भीती वाटत नाही. उलट नव्या प्रश्नांना नव्या पद्धतीने सामोरे जाण्यात आनंद वाटतो."

@@AUTHORINFO_V1@@