सत्यम 'शिवम' सुंदरम...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2019
Total Views |


 


शिवम दुबे हा सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू म्हणून ओळखला जात असला तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने आत्तापर्यंत मोठा संघर्ष केला. शिवमच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...

 

मुंबई ही 'क्रिकेटची पंढरी.' या मायानगरीने आजवर अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडवले. क्रिकेट विश्वात मुंबईच्या खेळाडूंचे नाव आजही अगदी आदराने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा देशांतगर्त चालणारे रणजीचे क्रिकेट सामने असो, मुंबईच्या खेळाडूंचा कायमच वरचष्मा राहिला आहे. म्हणूनच संघाची निवड करतानाही अनेकदा मुंबईकर क्रिकेटपटूंना संधी देण्याकडे निवड समितीचा कल दिसून येतो. नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणार्‍या आगामी टी-२० मालिकेसाठी निवड झालेला २६ वर्षीय मुंबईकर शिवम दुबे सध्या चांगलाच चर्चेतआहे. 'मुंबईकर' म्हणून ओळख असलेला हा अष्टपैलू खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. रणजी क्रिकेटमधील त्याची कामगिरी उत्कृष्ट असल्याने त्याची भारताच्या आंतररराष्ट्रीय संघात निवड झाली. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असले, तरी इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे.

 

शिवम राजेश दुबे याचा जन्म २६ जून, १९९३ रोजी मुंबईतच झाला. वडील राजेश दुबे हे मूळ उत्तरप्रदेशमधील भदोई जिल्ह्यातले रहिवासी. नोकरी-धंदा करून पैसे कमावण्यासाठी ते १९८०च्या दशकात मुंबईत स्थलांतरित झाले. मुंबईतील अंधेरी येथील नागरदास मार्गावर एक लहानसा म्हशींचा गोठा सुरू करत त्यांनी उदरनिर्वाहासाठी दूधविक्रीचा व्यवसाय केला. शिवम याच्यासह आणखी तीन बहिणी आणि दुबे दाम्पत्य असे मिळून एकूण सहा सदस्यांचे हे कुटुंबशिवम अवघ्या चार वर्षांचा असताना क्रिकेट खेळण्याबाबत त्याच्याकडे एक विशेष शैली असल्याची जाणीव त्यांच्या गोठ्यात येणार्‍या एका नोकराला झाली. त्या नोकराने याबाबत राजेश यांना कळवले. शिवमला क्रिकेटमध्ये रस असल्याचे कळताच वडील राजेश यांनी शिवमला स्वतः क्रिकेट सरावाचे धडे देण्यास सुरुवात केली. शिवमसाठी त्यांनी गोठ्याशेजारीच एक विशेष खेळपट्टी तयार करत त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शिवमने क्रिकेटचे धडे गिरवत मोठेपणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू होण्याचे ध्येय निश्चित केले. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याने दिवस-रात्र कसून सराव करण्यास सुरुवात केली.

 

अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्येच अधिक रस ठेवणार्‍या या शिवमने दहावीपर्यंतच शिक्षण घेतले. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अर्ज करण्याऐवजी त्याने आपल्याला क्रिकेटतज्ज्ञांचे प्रशिक्षण मिळवून देण्याची मागणी वडिलांकडे केली. दूधविक्रीचा व्यवसाय करणार्‍या राजेश यांना शिवमला क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवणे आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते. मात्र, तरीही तडजोड करत शिवमच्या मागणीनुसार वडील राजेश यांनी माजी क्रिकेटर चंद्रकांत पंडित यांच्या क्लबमध्ये त्याला प्रशिक्षणासाठी पाठवले. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिवम उत्तम प्रकारे क्रिकेट सरावाचे धडे गिरवत होता. सर्व काही ठीक सुरू होते. मात्र, का कुणास ठाऊक नियतीच्या मनात काय होते?
 

वयाच्या १५व्या वर्षी शिवमला क्रिकेट सरावाचे धडे घेणे हे अशक्य होऊन बसले. आर्थिकदृष्ट्या शक्य होत नसल्याने शिवमला क्रिकेटचे प्रशिक्षण थांबवावे लागले. वडील राजेश यांचे व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर शिवमला क्रिकेट प्रशिक्षण एकाएकी बंद झाले. यामुळे नैराश्य आलेल्या शिवमने क्रिकेटला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशा बिकट परिस्थितीतही त्याच्या वडिलांनी शिवमची समजूत काढत त्याला धीर दिला. आपण पुन्हा जोमाने क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू करू, असे म्हणत त्यांनी त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा दिली. या काळात प्रशिक्षण जरी मिळत नसले तरी विविध ठिकाणी चालणार्‍या सामन्यांमध्ये सहभागी होत शिवमने आपला क्रिकेटचा छंद जोपासला. क्रिकेटचे करिअर घडविण्यात सर्वात महत्त्वाची वर्षे मानल्या जाणार्‍या 'अंडर-१९'च्या वयात तो तब्बल चार वर्षे क्रिकेट प्रशिक्षणापासून दूर होता.

 

चार वर्षांनंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सावरली आणि शिवमला पुन्हा क्रिकेटचे प्रशिक्षण मिळू लागले. चार वर्षांनंतर पुन्हा जोमाने क्रिकेटचा सराव करत मैदानावर उतरलेल्या शिवमने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी त्याच्यातील क्रिकेट कौशल्य ओळखत त्याला मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत शिवमने उत्कृष्ट कामगिरी केली. शिवमची ही कामगिरी माजी दिग्गज खेळाडूंच्या नजरेत भरली आणि येथूनच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासाची सुरुवात झाली. विविध रणजी सामन्यांमध्ये त्याने केलेली अष्टपैलू कामगिरी ही अनेकदा निर्णायक ठरली. यामुळे आयपीएलमध्येही त्याची निवड झाली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा धडाका असाच सुरू राहिला आणि अखेर बांगलादेशविरुद्ध होणार्‍या आगामी 'टी-२०' मालिकेसाठी निवड झाली. पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा...!

@@AUTHORINFO_V1@@