बगदादीचा रडून भेकून मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2019
Total Views |




जागतिकस्तरावर मानवी मूल्यांच्या परिघातही आज दिवाळी साजरी झाली म्हणायची. ‘इसिस’चा म्होरक्या अबू-बक्र-अल-बगदादी मेला. कोणी मारण्याआधीच या भ्याडाने स्वत:ला संपवले. अर्थात, संपवले तरी कसे म्हणायचे? कारण, अमेरिकेचे सैन्यही नव्हे, तर शिकारी कुत्रा त्याच्या मागावर असताना रडतगडत जीवदानाची भीक मागत तो सैरावर पळत होता. सोबत तीन मुलेही होती. पळता पळता तो धाडकन जमिनीवर कोसळला आणि त्याच्या शरीरावर बांधलेल्या विस्फोटकांचा स्फोट झाला. त्यातच त्याच्या अपवित्र शरीराच्या चिंधड्या उडाल्या. तेथील इतर ११ मुले, तीन बायका जीवंत आहेत. त्या बायकांच्या शरीरावरही विस्फोटके बांधलेली.

 

यावर अनेक चर्चा रंगत आहेत. कशावरून तो बगदादीच होता? तसेच ही कारवाई जिथे झाली तो परिसर ‘इसिस’चा कट्टर विरोधी परिसर. इथे समर्थकांच्या परिसराला सोडून बगदादी इथे का लपेल? थोडक्यात, रशिया-इराण वगैरे राष्ट्रांना हे प्रश्न पडले आहेत. यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे म्हणणे की, सीरियाच्या इदबिल प्रांतातील बारीश गावांमध्ये बगदादी होता. त्याला मारण्यासाठी विशेष सैन्यदल तयार केले होते. त्यात आठ हेलिकॉप्टर्ससह विमानेही होती. ही विमाने तुर्कस्तान, सीरिया आणि रशियाच्या भूमीवरूनही गेली. तेथून उड्डाण करण्यासाठी आम्ही कोणतीही परवानगी मागितली नव्हती, तरीसुद्धा रशियाने आम्हाला अडवले नाही. ही रशियाची मदत आहे. तसेच बगदादीची डीएनए चाचणी केली असून चिंधड्या उडालेले शरीर बगदादीचेच आहे. कुर्दिशांचे नेतृत्व करणार्‍या ‘एसडीएएफ’चे वरिष्ठ सल्लागार पोलट केन यांचे म्हणणे आहे की, बगदादीला पकडण्यासाठी अमेरिकेसोबत ‘एसडीएएफ’ १५ मेपासून कार्यरत होती. बारीशा गावामध्ये लपलेली व्यक्ती बगदादीच आहे का, याचा खात्रीपूर्वक शोध घेण्यासाठी पहिले त्याचे अंतर्वस्त्र मिळवले. त्याची डीएनए चाचणी केल्यानंतर कळले की, तो बगदादीच आहे. थोडक्यात, बगदादीच्या मृत्यूमध्ये अंतर्वस्त्रांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच्या डीएनए चाचणीसंदर्भातही सांगितले.

 

बगदादी मेला आणि अगणित निष्पापांच्या मृत्यूला न्याय मिळाला. ‘अल कायदा’वर बंदी आली असता बगदादीने ‘अल कायदा’चे नामकरण ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ असे केले. बगदादी आणि त्याच्या क्रूर अतिरेक्यांनी सीरिया, तुर्कस्तान आणि इराकमधील नागरिकांच्या अक्षरश: कत्तली केल्या होत्या. ‘इसिस’च्या क्रूरतेने भरलेल्या कहाण्या ऐकल्या की संतापासोबतच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ‘इसिस’च्या अतिरेक्यांच्या तावडीतून सुटलेल्या नादिया मुरादने सांगितले होते की, "सहा ते सात हजार याजिदी महिलांना ‘इसिस’ने लैंगिक गुलाम बनवले. दिवसागणिक अतिरेकी आईसमोर तिच्याच लहान बालिकेवर बलात्कार करतात." इराकच्या सांसद वियान डकहिल यांनी सांगितलेली घटना तर अशी की, एका इसिस अतिरेक्याने एका याजिदी महिलेला तिच्या एक वर्षाच्या बाळासह पळवून नेले. तिला तीन दिवस अन्न-पाण्याशिवाय ठेवले.
 

तिसर्‍या दिवशी तिला मांसासोबत शिजवलेला भात दिला. भुकेने व्याकुळ झालेल्या स्त्रीने मांसभात खाल्ल्यावर तिला अतिरेक्यांनी सांगितले की, तुझ्या बाळाला कापले, त्याचे मांस शिजवले, तेच तू खाल्लेस. अर्थात, त्यांनी तसेच केले होते. केवढे हे क्रौर्य. या अतिरेक्यांचा नेता बगदादी ज्या विशेष मोहिमेंतर्गत मारला गेला, त्या मोहिमेचे नाव आहे ‘कायला मूलर.’ मानवी हक्कासाठी काम करणारी ‘कायला.’ सीरियामध्ये गृहयुद्धाचे बळी झालेल्यांना मदत करण्यासाठी ती सीरियाला गेली होती. २०१३साली ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर’ या संस्थेतर्फे चालणार्‍या एका इस्पितळातून बाहेर येताना ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी तिचे अपहरण केले. २०१५ला तिचा मृत्यू झाल्याचे समजले. दोन वर्षे ती ‘इसिस’च्या तावडीत होती. त्यावेळी नरकापेक्षा भयंकर यातना तिला भोगाव्या लागल्या. भ्याड आणि क्रूर बगदादीने तिच्यावर अनेक अत्याचार केले. तिच्यावर बलात्कार केले गेले. शेवटी तिचा छळ छळ करून हत्या करण्यात आली. लाखो निष्पापांची क्रूरपणे कत्तल करणार्‍या ‘इसिस’चा आणि त्याच्या म्होरक्याचा खात्मा होणे मानवतेची गरजच होती आणि आहे. बगदादीसारख्या लोकांचा मृत्यू असाच भ्याडपणे रडून भेकून होणार हाच कालचक्राचा न्याय!

 

9594969638

@@AUTHORINFO_V1@@