नव्या वर्षाचे स्वागत तेजीने !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2019
Total Views |
 

मुहूर्त सत्रात सेन्सेक्स १९२, निफ्टी ४३ अंशांनी वधारले



मुंबई : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी संवत्सराच्या स्वागतानिमित्त रविवारी झालेल्या मुहूर्ताच्या सौद्याला सायंकाळी ६.१५ वाजता सुरुवात झाली. व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३९.३१ अंशांच्या उसळीसह ३९ हजार ३९७.३७ अंशांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ६३.५५ अंशांच्या वृद्धीसह तो ११ हजार ६४६.९० इतका उसळला होता.

 

राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजाराने मुहूर्त सौद्याने सवंत्सर २०७६चे स्वागत केले. टाटा मोटार्स, येस बॅंक, महिंद्रा एण्ड महिंद्रा, इन्फोसिस, वेदांता आदी शेअर वधारले. कोल इंडिया, टायटन, भारती इन्फ्राटेल आदी समभागांची विक्री झाली. अखेर सेन्सेक्स १९२ अंशांनी वधारत ३९ हजार २५० तर निफ्टी ४३ अंशांनी वधारत ११ हजार ६२७ अंशांवर बंद झाला.

 

दरवर्षी शेअर बाजारात दिवाळीत संवत्सराच्या सुरुवातीला विशेष सत्राचे आयोजन केले जाते. याला मुहूर्त सौदा किंवा सत्र म्हणतात. सायंकाळी ६.१५ वाजता सुरू होणाऱ्या या सत्रात तासाभरासाठी व्यवहार केले जातात. हिंदू नववर्षानिमित्त व्यापारी नव्या नोंदी आणि व्यवहारांची सुरुवात या वर्षापासून करतात. त्यामुळे या व्यवहारांना शुभ मानले जाते. गुंतवणूकदार यावेळी पूजाही करतात. १९५७पासून मुहूर्त सौद्यांची सुरुवात झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीवर याची सुरुवात १९९२ पासून झाली. १४ मुहूर्त सौद्यांपैकी ११ वेळा निर्देशांकांनी झेप घेतली आहे. सोमवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बलिप्रतिपदेनिमित्त बंद राहणार आहेत.

 

नवे वर्ष नवे लक्ष्य

अर्थसल्लागारांच्या मते, नव्या वर्षाकडून गुंतवणूकदारांना बऱ्याच अपेक्षा आहेत. पुढील संवत्सरापर्यंत सेन्सेक्स ४६ हजार तर निफ्टी १४ हजारांचा आकडा पार करेल. दिवाळीमुळे बाजारात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाही फायदा बाजाराला होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@