मोठ्या पडद्याच्या प्रतीक्षेत काश्मीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2019
Total Views |
 
 
 

'एनआयए' अर्थात 'राष्ट्रीय तपास यंत्रणे'ने आसिया अंद्राबी या अटकेत असलेल्या फुटीरतावादी महिलेचा काश्मिरातील चित्रपटगृह बंद करण्यामागे हात असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. पण, गेली तीन दशके हा मोठा पडदा काश्मीरच्या जवळपास तीन पिढ्यांच्या नशिबातच नव्हता...

 

'हाऊ इज द जोश?' असा प्रश्न उच्चारताच पटकन कुणाही भारतीयाच्या तोंडून क्षणार्धात 'हायऽऽऽ सर...' असा उत्स्फूर्त प्रतिसाद येतो. पण, दुर्दैवाने काश्मिरींपर्यंत भारतीय चित्रपटांमधील हा 'जोश' कधी पोहोचलाच नाही. कारण, गेली तीन दशके काश्मिरींना इस्लामच्या धाकावर आणि बंदुकीच्या टोकावर भारतीय चित्रपटांपासून अगदी पद्धतशीरपणे दूर ठेवले गेले. अजूनही काश्मीर खोर्‍यात हीच परिस्थिती कायम आहे. मात्र, 'कलम ३७०' हटविल्यानंतर केंद्र सरकारने खोर्‍यातील ही चित्रपटगृहं पुन्हा सुरू करण्यासाठीच्या दृष्टीनेही प्रयत्नांना बळ दिले आहे.

 

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही. चित्रपटातून अगदी स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ते आजही जनजागृती आणि राष्ट्रोत्थानाचे बाळकडू मिळते. 'मेरे देश की धरती...' पासून ते अगदी 'मेरा रंग दे बसंती चोला...' पर्यंत असे हे समाजमनाचा आरसाच पडद्यावर दाखवणारे भारतीय चित्रपट काश्मीरमध्ये मात्र गेली तीन दशके मोठ्या पडद्यावर झळकू दिले गेलेले नाहीत. 'आझादी'च्या नावाखाली काश्मीरचे भारतापासून लचके तोडू पाहणार्‍यांच्या जिहादी मानसिकतेचाच तो कुटील डाव होता. सुरुवातीला तणावाच्या तीन दिवसांची वाटणारी ही चित्रपटगृहांवरील बंदी मात्र तीन दशकांपर्यंत काश्मिरींना नाहक भोगावी लागली. एकप्रकारे, या बंदीने काश्मिरींमधील भारताप्रतिची परकेपणाची आणि द्वेषभावना वृद्धिंगत करण्यात आयती भरच घातली.

 

आसिया अंद्राबी हे या पटावरील एक छोटेसे प्यादे. ऐंशीच्या दशकात खोर्‍यातील एकूणच परिस्थिती चिघळू लागली. काश्मीरमधील भारतविरोधाच्या त्या हिरव्या ज्वाळांनी चित्रपटगृहांनाही लक्ष्य केले. तोवर इन-मीन १५ चित्रपटगृहे काश्मिरींच्या मनोरंजनसेेवेस तत्पर होती. मात्र, १९८९ साली 'अल्ला टायगर्स' या फुटीरतावादी संघटनेच्या दबावाखाली चित्रपटगृहांना मालकांनीच टाळे ठोकले. १९९३ साली 'पलाडियम' नावाचे सुप्रसिद्ध चित्रपटगृह आगीत भस्मसात करण्यात आले. १९९९ आणि २००५ साली जेव्हा काही चित्रपटगृह पुन्हा खुली करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पोलीस आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत कित्येक काश्मिरी गंभीर जखमी झाले. फुटीरतावाद्यांची हुर्रियत, अब्दुलांच्या नॅशनल कॉन्फरन्सनेही या बंदीच्या सुरात सूर मिळविले. परिणामी, चित्रपटगृहाच्या मालकांनी ही चित्रपटगृहे विकली किंवा त्यांचे रुपांतर मॉलमध्ये तरी करुन टाकले. या सगळ्या घटनाक्रमात १९८७ साली अंद्राबीने कहर केला.

 

चित्रपटगृहात चित्रपट सुरू असताना अंद्राबी आणि तिच्या 'दुख्तरन-ए-मिल्लत' संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बुरखा परिधान न केलेल्या महिला पडद्यावर दिसताच घोषणाबाजी करत शाईफेक केली. त्यावेळी मुद्दाम भारतीय चित्रपटांवर 'इस्लामविरोधी' असण्याचा ठपका ठेवण्यात आला. वरकरणी कारण काय, तर चित्रपटातील बिनबुरख्याच्या अभिनेत्री. पण, या चित्रपटगृहबंदीचा मूळ उद्देशच मुळी भारतीय चित्रपटांना काश्मीरमधून हद्दपार करण्याचा होता आणि त्यामध्ये अंद्राबी आणि तिचे फुटीरतवादी साथीदार पूर्णत: यशस्वी ठरले.
 

हीच अंद्राबी पुढे मुस्लीम महिलांची माथी भडकावून त्यांना दगडफेकीसाठी रस्त्यावर उतरवू लागली. २००५ साली अभिनेता सलमान खाननेही काश्मीरमधील चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याबाबत विधान केले होते. तेव्हा, सलमानलाही 'भारताचा एजंट' म्हणून हिणवत बॉलीवूडवरच अंद्राबीने आगपाखड केली. एकटी अंद्राबीच नाही, तर तिचा शौहरही एका काश्मिरी पंडिताच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगतोय. पतीबरोबरच आसिया अंद्राबीचे 'आयएसआय' आणि फुटीरतावाद्यांशी लागेबांधे उघडकीस आले. काश्मीरच्या लाल चौकात पाकिस्तानी झेंडा फडकाविण्यापासून ते पाकिस्तानी राष्ट्रगीत गाण्यापर्यंत या अंद्राबीची मजल गेली. या गंभीर गुन्ह्यांबरोबरच 'टेरर फंडिंग'प्रकरणी अंद्राबी आज अटकेत आहे. पण, ती आणि तिच्यासारख्या फुटीरतावाद्यांनी ३० वर्षं काश्मीरमधून भारतीय चित्रपटांना हद्दपार करून केलेले नुकसान कधीही भरून निघणारे नाही.

 

आजचा जमाना हा मोबाईल आणि इंटरनेटचा. त्यामुळे चित्रपटगृहात न जाताही सगळे काही एका क्लिकवर उपलब्ध होतेच. पण, ऐंशी-नव्वदचा काळ वेगळा होता. चित्रपट हे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचे एक प्रमुख माध्यम होते आणि आजही आहेच. 'जोश', 'सर्फरोश', 'डर', 'वास्तव' आणि अशा शेकडो चित्रपटांनी समाजातील विविध पैलू अगदी कल्पकतेने प्रेक्षकांसमोर ठेवले. पण, काश्मीरची जनता यापासून आणि मग आपसुकच भारतातील समस्या, संस्कृतीपासून काहीशी अनभिज्ञ राहिली. हा देश, ही भूमी, तेथील संस्कृती 'परकी' असल्याचे विष त्यांच्या मनामनांमध्ये कालवले गेले. चित्रपटांवरील बंदीने त्यात भरच घातली. व्हीसीडी-कॅसेटचा काळा बाजार काश्मीरमध्ये फोफावला.

 

अस्वस्थ काश्मीरमध्ये मग बॉलीवूडनेही फिरकणे बंद केले. हिमालयाऐवजी स्वित्झर्लंड, न्यूझीलंडचा निसर्ग भारतीय चित्रपटांमध्ये भाव खाऊन गेला. चित्रपटगृह व त्याच्याशी निगडित दुकाने, उद्योगधंदे देशोधडीला लागले. रोजगाराच्या संधी हिरावल्या. ज्याचा साहजिकच परिणाम जम्मू-काश्मीरच्या अर्थकारणावरही झाला. पण, धर्माच्या नावाखाली 'आझादी' मागणार्‍यांनी, भारतीय चित्रपटांवरील पाकिस्तानातील बंदीची परंपरा काश्मिरातही बळजबरीने रुजवली. काश्मिरींची मने चित्रपटांतील भारतीय राष्ट्रवाद, भारतीयत्वाने दीपून जाऊ नयेत, त्यांनीच उलट बगावत करू नये म्हणून रचलेली अशी ही चित्रपटगृह बंदीची व्यथा आणि कथा...

 

ऑगस्टमध्ये 'कलम ३७०' हद्दपार केल्यापासून या परिस्थितीत मात्र हळूहळू फरक पडताना दिसतोय. संविधानिकरित्या काश्मीर आता मूळ भारतीय प्रवाहात आले आहे. परवाच गोव्यात बदली झालेले जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक तसेच राज्यातील काही खाजगी उद्योजकही चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. यामुळे काश्मीरमध्ये मनोरंजनाचा मार्ग केवळ सुकरच होणार नाही, तर रिळाबरोबर तेथील अर्थकारणाची चक्रेही वेगाने फिरू लागतील. काश्मिरींनाही आता खानबंधूंबरोबर बच्चनसाहबही अधिक जवळचे, 'आपले' वाटू लागतील. त्यामुळे आता तो दिवस दूर नाही, जेव्हा काश्मीरमध्येही पुन्हा एकदा भारतीय चित्रपट मोठ्या अभिमानाने मोठ्या पडद्यावर झळकतील. जेव्हा भारतीय राष्ट्रगीताचे 'विंध्य हिमाचल यमुना गंगा'चे स्वर काश्मिरी चित्रपटगृहांमध्ये गुंजतील, तेव्हा काश्मिरी बांधवांचा 'जोश'ही 'हाय' झाल्याशिवाय राहाणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@