मंदीत संधी कशी शोधावी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2019
Total Views |




छोटीशी बचत भांडवली नफा मिळवून देण्यासाठी कुठे गुंतवावी? जोखीम घेण्याची तयारी तर आहे पण कुठले क्षेत्र गुंतवणूकीसाठी सुरक्षित असेल? असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर आपल्या आजूबाजूला बघायला शिका. अर्थव्यवस्थेची स्थिती कुठलीही असू देत पण खाद्यपदार्थ, मनोरंजन, शिक्षण आणि आरोग्य निगा ही क्षेत्रे कधीही थांबत नाहीत. तुम्ही कधी मंदी आहे म्हणून लोकांनी खाणे-पिणे बंद केले, असे ऐकले आहे का? शैक्षणिक कर्ज घेऊन देशात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ आहे कि घट याचा कानोसा घेतला आहे का? गेल्या महिन्यात एका आठवडयात २०० कोटींचा गल्ला जमविणारा चित्रपट कुठला? असा प्रश्न विचारला तर किती पटकन नाव सांगाल. हो कि नाही? साथीच्या रोगांनी आपले सगे-सोयरे आजारी पडले आणि पैसे नाहीत म्हणून त्यांनी उपचार घेतले नाहीत, असं होतं का? लक्ष्मीपूजनानिमित्त जाणून घ्या बचतीचे मार्ग आणि मानसिकता...

 

सुर्ये आधिष्ठीली प्राची |

जगा जाणिव दे प्रकाशाची ||

तैसी श्रोतया ज्ञानाची |

दिवाळी करी ||

-- संत ज्ञानेश्वर

 

वरील श्लोकातून ज्ञानदेवांनी श्रोत्यांना अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. महाMTB वाचकदेखील ही दिवाळी नक्कीच ज्ञानार्थपूर्ण दिवाळी म्हणून साजरी करत असतील, असा विश्वास वाटतो. विवध विषयांची 'अर्थ'पूर्ण मेजवानी फराळातल्या चविष्ट पदार्थांसारखी आपल्याला रोजच अनुभवायला मिळत असते. खरतरं दिवाळी म्हटली कि, आसपासचा परिसर कसा पावसाळा संपून ऑक्टोबर हिटसोबतच थंडीची चाहूल देणारा आणि उत्सवी सणांची उधळण करणारा बनून जातो. पण यंदा ऋतू कुठला? हेच कळेनासे झालंय.

 

आजच्या विषयाकडे वळतांना मनात अजूनही बचत करणारे लोक गुंतवणूकदार का बनू शकत नाही? असा विचार येतोय. उत्पन्न मिळविणारी प्रत्येक व्यक्ती भविष्यापेक्षा आजच्या दिवसाची गुजराण कशी करावी? याचा विचार अधिक करते. गुंतवणूक म्हणजे वर्तमानाचे नियोजन आणि भविष्याचे उपयोजन असते. वर्तमानाचे नियोजन नसल्यामुळे भविष्यासाठी लागणारी गुंतवणूक नेहमीच पुढे ढकलली जाते. परिणामी उद्या पुन्हा हिच परिस्थिती तयार होते आणि गुंतवणूक केलीच जात नाही.

 

मागे एका लेखात LPG म्हणजेच Liberalization, Privatization आणि Globalization या बदलाच्या चक्रावर लिहिले होते. दुर्दैवाने या स्थित्यांतराकडे बघण्याचा दृष्टीकोन सामान्य बचतकर्त्याकडे नसतो. त्याचे कारण वर नमूद केले आहेच. परंतु त्याला छोटीशी का होईना गुंतवणूक सुरु करायची असते. हि सुरुवात मात्र इच्छा, आस कि ध्येय हे ठरवता येत नाही. मग पदरी अंधारच पडतो. बहुतेकदा पहिली गुंतवणूक हि विम्यापासून होते. कमी वयात जास्त हफ्ता असलेली, कमी सुरक्षा कवच असलेली दिर्घ मुदतीची योजना विकत घेतली जाते. वाढत्या वयासोबत उत्पन्न आणि जबाबदाऱ्या वाढत जातात. मग विम्याचे हफ्ते भरणे म्हणजे कर्जाचे हफ्ते भरण्यास जसे जिवावर येते तशीच काहीसी गत होते. हि गुंतवणूक काढून घ्यावी म्हटली तर आपलाच अभिमन्यू होतो. कारण धड परतावा मिळत नाही आणि आर्थिक सुरक्षा देखील.

 

तुम्ही कुठलेही कमिशन न देता बनू शकता करोडपती... अशी जाहिरात बघून शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करणारे आरंभशूर काही कमी नाहीत. बाजारात ६,००० पेक्षा जास्त नोंदणीकृत असलेल्या कंपन्या आणि २,७०० हून जास्त पर्याय उपलब्ध असलेल्या म्युच्युअल फंडांच्या योजना असतांना देखील मै बन गया करोडपती! असे कुणी का सांगत नाही? याला कित्येकदा अति पारदर्शकता हा अडथळा असावा, असे माझे ठाम मत आहे. बाजारात ट्रेडींग करणारे आणि गुंतवणूक करणारे असे दोन गट केल्यास सौदेबाजीला आळा बसू शकेल. म्युच्युअल फंडाची नक्त मालमत्ता मूल्य म्हणजेच NAV दररोज जाहीर करून किरकोळ गुंतवणूकदार परतावा बघण्यापेक्षा चढ-उतार बघून नकारात्मक निर्णय घेत असतो.

 

Parle-G ने १०,००० कर्मचारी कपात केल्याची बातमी आल्यावर सर्वांनीच मंदीचा धसका घेतला. कधीकाळी निकृष्ट दर्ज्याच्या गव्हापासून बिस्किटे बनविणारी कंपनी म्हणून कुप्रसिद्धी मिळविणाऱ्या Parle-G बद्दल अचानक आत्मीयता दाखविणारे कोण? हा साधा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारलात का? त्याच Parle-G ने मागच्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १०% वाढ नोंदविली. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढलात? गुंतवणूकदार बनायचे असल्यास टीपोजीराव बनून चालणार नाही त्यासाठी थोडासा का असेना अभ्यास तर करावाच लागेल.

 

मंदीत संधी कशी शोधावी? छोटीशी बचत भांडवली नफा मिळवून देण्यासाठी कुठे गुंतवावी? जोखीम घेण्याची तयारी तर आहे पण कुठले क्षेत्र गुंतवणूकीसाठी सुरक्षित असेल? असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर आपल्या आजूबाजूला बघायला शिका. अर्थव्यवस्थेची स्थिती कुठलीही असू देत पण खाद्यपदार्थ, मनोरंजन, शिक्षण आणि आरोग्य निगा ही क्षेत्रे कधीही थांबत नाहीत. तुम्ही कधी मंदी आहे म्हणून लोकांनी खाणे-पिणे बंद केले, असे ऐकले आहे का? शैक्षणिक कर्ज घेऊन देशात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ आहे कि घट याचा कानोसा घेतला आहे का? गेल्या महिन्यात एका आठवडयात २०० कोटींचा गल्ला जमविणारा चित्रपट कुठला? असा प्रश्न विचारला तर किती पटकन नाव सांगाल. हो कि नाही? साथीच्या रोगांनी आपले सगे-सोयरे आजारी पडले आणि पैसे नाहीत म्हणून त्यांनी उपचार घेतले नाहीत, असं होतं का?

 

भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जीना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांचे अर्थशास्त्र माझ्या उन्नतीसाठी कसे उपयोगात आणता येईल, असा विचार करणारा खरा अर्थभारत. तुम्ही त्यांच्या पुअर इकॉनॉमिक्सवर चर्चा करत असाल तर मग तुम्ही अर्थविचारवंत. या मानसिकतेतून बाहेर पडायचे असेल तर

१. तुमच्या गरजा भागतील एवढे पैसे कमवा.

२. तुमच्या भविष्यातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक सुरु करा.

३. वरील दोन्ही पूर्तता झाल्यावर समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून दोन पैसे बाजूला काढून निर्लोभ मदत करा.

 

वर्षभरात लोकशाहीचे दोन मोठे उत्सव राज्यात चौघडे वाजवून गेले. त्यातून कुठलीही परिस्थिती आणि मानसिकता सदैव एकांगी नसते, हा धडा शिकायला मिळाला. तसच अर्थव्यवस्थेच सुद्धा असतं, असं इतिहास सांगतो. वर्षभराने पुन्हा गाडी पकडायची राहून गेली अशी घालमेल राहायला नको म्हणून दिवाळी ते ख्रिसमस या दरम्यान सुट्ट्यांचे नियोजन करतांना गुंतवणूकीचे सुद्धा नियोजन करा. नक्कीच फायदा होईल या आशादायी विचारासह दिवाळीच्या व पाडव्याच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा!
 

- अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक सल्लागार)

94 23 18 75 98

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@