वा.श्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2019
Total Views |





मला माणसं जोडण्याची हौस आहे
. असाच एक काही वर्षांपासून जोडला गेलेला माणूस आज चहा घेत असताना समोर आला. वा. श्री. जोशी. एका विशिष्ट शैलीत पाडलेला पांढर्‍या केसांचा तो भांग. भांगाच्या त्या जुनाट स्टाईलला तितक्याच जुनाट चौकोनी फ्रेमच्या चष्म्याची जोड. अंगात पत्रकारितेचा पिंड सांगणारा सदरा-लेंगा.



आमच्या वाडीसमोरच्या चहावाल्याकडे सकाळचा चहा घेणं हे आता माझ्या
‘circadian rhythm’चा भाग झालाय. गिरगावात असल्यावर ते केल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. अनेक वर्षांपासूनची सवय आहे आणि तो कटिंग चहा प्यायला मला चांगली सात-आठ मिनिटं लागतात. या वेळेत कोण ना कोण भेटतं, इकडच्या तिकडच्या गोष्टी होतात. मला माणसं जोडण्याची हौस आहे. असाच एक काही वर्षांपासून जोडला गेलेला माणूस आज चहा घेत असताना समोर आला. वा. श्री. जोशी. एका विशिष्ट शैलीत पाडलेला पांढर्‍या केसांचा तो भांग. भांगाच्या त्या जुनाट स्टाईलला तितक्याच जुनाट चौकोनी फ्रेमच्या चष्म्याची जोड. अंगात पत्रकारितेचा पिंड सांगणारा सदरा-लेंगा.



पायात ठिकठिकाणी फिरून झिजलेल्या चपला
. ही ठिकाणं बहुदा धार्मिक स्थानं असत, हे विशेष. मला अध्यात्म -देवाधर्माबाबत कुतूहल असल्याकारणाने या व्यक्तीशी माझा संपर्क आला. त्याला झाली असतील सात-आठ वर्ष. वा. श्री. चे पूर्ण नाव काय, हे कोणालाच तसं माहीत नाही. मलाही नाहीये... पण, त्याची आध्यात्मिक बैठक पाहता ते ‘वामन श्रीपाद जोशी’ वगैरे असावं असं मला खूपदा वाटतं. असो, वा.श्री हा मूळचा गिरगावचाच. त्याची आई असेपर्यंत तो गिरगावात राहिला. ती गेली आणि ह्याने गिरगावातली खोली विकून उपनगरात कुठेतरी एक घर घेतलं. मग फक्त भागवत सप्ताह किंवा एखादं पोथीचं पारायण गिरगावातल्या एखाद्या मंदिरात असेल तर हा नजरेस पडे; अन्यथा त्याचा मुक्काम त्याच्या घरी उपनगरात. तिथे तो एकटाच राहात असे. ब्रह्मचर्य पाळलं होतं त्याने. तो, त्याचे देव, त्यांच्या पोथ्या आणि तत्सम धार्मिक कार्यक्रम... बस्सं, एवढंच त्याचं विश्व. कधी मौजमजा नाही, सण साजरे करणं वगैरे नाही.



यामुळेच त्याच्या चेहर्‍यावर एक विरक्तीचा भाव असायचा
. प्रसन्नता तशी कधी आढळली नाही त्यात शक्यतो, पण आज मात्र तो चिडचिडा वाटत होता. त्याचं कारण मी त्याला विचारणार, त्या अगोदरच ’‘डॉक्टर, थायलंडला जायचा विचार करतोय.” आयुष्यभर वरणभात खाणार्‍या माणसाने एकदम ’एक हाफ तंदुरी और एक दम बिर्यानी लाव’ अशी सराईत ऑर्डर द्यावी, असा काहीतरी तो प्रकार होता. मी “का रे बाबा... ठीक आहेस नं?” असं विचारता, “अरे लेका, कंटाळा आला आता शिस्तबद्ध जगण्याचा. माझी विरक्ती आता मलाच नकोशी झालीये. लोकं आयुष्यात काय मजा मारत आहेत आणि आम्ही अख्खी हयात देव देव करण्यात घालवली. आज मागे वळून पाहतो तर वाटतं काय गवसलं आपल्याला? काहीच नाही. ब्रह्मचर्य पाळायचा प्रयत्न केला. पण, बरेच वेळा आकर्षण झालंच की. देवाच्या भीतीने कशीतरी मुरड घातली त्या आकर्षणाला, पण अलीकडे सहन होत नाही बघ. लोक संसार करून पोराबाळांमध्ये छान आयुष्य जगत आहेत. आम्ही काय करतोय? तसबिरी आणि मूर्त्यांमधून देव प्रकट होऊन बोलेल, याची वाट पाहतोय. कपाळकरंटे रे, आमच्यासारखे लोक. म्हणून आता ठरवलंय थायलंडला जायचं!” अजब मजा होती. संसार करणारे म्हणतात, “देवाच्या सान्निध्यात वेळ घालवणारे सुखी आणि देवाधर्मात आपली हयात वेचणारे हे असे लोक म्हणतात, “संसार केला ते सुखी.”



अशा वेळेस मला नकळतच एक गोष्ट आठवली
, एक लहान मुलगा असतो. त्याचं गाव अगदी समुद्रकिनार्‍याला लागूनच असतं. एक दिवस समुद्रावर खेळत असताना त्याला एक दिव्य रूपातली बाई दिसते. ती त्याला म्हणते, “या समुद्राखाली एक मंदिर आहे. भाग्यवान माणसाला त्याच्या घंटेचा आवाज येतो.” आपण भाग्यवान आहोत का, ही ओढ त्याला लागते आणि दररोज तो किनार्‍यावर येऊन घंटेचा आवाज ऐकू येईल, या आशेने बसून राहतो. इतर मुलं शाळेत जातात, खेळतात. हा मात्र किनार्‍यावर. एक दिवस त्याला असं किनार्‍यावर बसून राहण्याचा कंटाळा येतो. तो परत आपण इतर मुलांसारखं जगायचं, असं ठरवतो. शाळेत जातो, खेळतो. पुढे त्याचं लग्न होतं.




नोकरी
-व्यवसायात त्याचा छान जम बसतो. त्या समुद्राखालच्या मंदिराबद्दल तो एव्हाना सारं विसरलेला असतो. एक दिवस असाच तो त्या समुद्रावर जातो. आता त्याचं लक्ष लाटांच्या सुंदर लयीवर. समुद्रावर पडलेल्या तांबूस सूर्यकिरणांवर. मधूनमधून येणार्‍या माशांच्या आवाजावर असतं. त्याच्या मनात विचार येतो, काय सुंदर किमया आहे निसर्गाची. त्याच्या डोक्यात त्या मंदिराच्या घंटांचा विचारही नसतो आणि इतक्यात त्याला त्यांचा आवाज ऐकू येतो. ही गोष्ट माझ्या डोक्यात झळकली आणि मी मिश्किलपणे हसलो. माझा मिश्किलपणा पाहून वा. श्री. उद्गारला, “हस लेका, पण मला आता कोणाची भीड नाही. मी आता मजा करायचं ठरवलेलं आहे. आयुष्याचा उपभोग घ्यायचा!” चहाचा तो काचेचा ग्लास मी चहावाल्याकडे ठेवला आणि फिरून वा.श्रीला हात मिळवत ’हॅपी जर्नी!’ म्हटलं. आयुष्य मोकळेपणाने, खुल्या विचारांनी जगण्याच्या प्रवासात त्याला कदाचित देव सापडणार होता...थायलंड हे निमित्तमात्र होतं!


-
डॉ. अमेय देसाई

@@AUTHORINFO_V1@@