धक्कादायक ! मुंगुसाच्या केसांचे ३० हजार 'ब्रश' हस्तगत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2019
Total Views |


 

राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये कारवाई

 

मुंबई ( अक्षय मांडवकर ) - मुंगुसाच्या केसांपासून तयार केलेले ३० हजार पेन्टिंग ब्रश राज्यातील पाच जिल्ह्यांमधून ताब्यात घेण्यात आले आहेत. 'केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग' (डब्ल्यूसीसीबी), वन विभाग आणि 'वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएश'न (डब्ल्यूडब्ल्यूए) या प्राणिप्रेमी संस्थेच्या माध्यमातून ही कारवाई पार पडली. या कारवाईमुळे राज्यात मुंगुसाच्या केसांचा पुरवठा करण्याबरोबरच त्यामाध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या चित्रकलेच्या ब्रशचा छुपा व्यापार उघडकीस आला आहे.

 
 

 
 
 

केंद्रीय पातळीवर वन्यजीव तस्करीसंदर्भात काम करणाऱ्या 'डब्लूसीसीबी' या संस्थेने 'आॅपरेशन क्लीन आर्ट' या मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध राज्यांमधून मुंगुसांच्या केसांपासून तयार केलेले 'पेन्टिंग ब्रश' जप्त करण्यात येत आहेत. गुरुवारी ही मोहीम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पार पडली. मुंबई, ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. यावेळी मुंगुसांच्या केसापासून तयार केलेले पेन्टिंग ब्रश पुरविणारे पुरवठादार तसेच ते विकणाऱ्या स्टेशनरी दुकानांवर धाड टाकण्यात आली. राज्यभर २२ दुकानांवर टाकलेल्या धाडीत एकूण २९,१६६ ब्रश यंत्रणेच्या हाती लागले. ही संपूर्ण कारवाई 'डब्ल्यूडब्ल्यूए'चे स्वयंसेवकांनी वन विभाग आणि 'डब्ल्यूसीसीबी'च्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पार पाडली.

 

 
 
 
 

या कारवाईच्या माध्यमातून औरंगाबादमधून १ हजार, ६३०, पुण्यातून ३ हजार, ६४० आणि सिंधुदुर्गातून ४ हजार, ९७२ ब्रश हस्तगत करण्यात आले. मुंबई-ठाण्यातून सर्वात जास्त १७ हजार, ७५१ ब्रश ताब्यात घेण्यात आले आहेत. राज्यभर पार पडलेल्या या कारवाईत सर्वात जास्त ब्रश मीरा रोड येथून जप्त करण्यात आले आहेत. मीरा रोड येथील दुकानामधून १३ हजार, २०६ ब्रश ताब्यात घेतल्याची माहिती ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी दिली. या ब्रशची विक्री करणारा आरोपी मोहम्मद फिरोजला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याचे मुठे म्हणाले. मुंबईतील दादर, अंधेरी आणि गोरेगाव येथील स्टेशनरीच्या दुकानांमधून ३ हजार, ९०१ ब्रश जप्त केल्याचे मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी सांगितले. डोंबिवलीतील दुकानामधून २९० ब्रश मिळाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांनी दिली. 'डब्ल्यूसीसीबी'चे पश्चिम परिक्षेत्र प्रमुख एम. मारंको आणि ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत ही कारवाई पार पडली.

 

 
 
 

ब्रशची ओळख कशी पटवली ?

धाड टाकलेल्या दुकानांमधून महिन्याभरापूर्वी 'डब्ल्यूडब्ल्यूए'च्या स्वयंसेवकांनी या ब्रशची खरेदी केली होती. त्यानंतर हे ब्रश मुंगुसांच्या केसांपासून तयार करण्यात आले आहेत का, याची निश्चिती करण्यासाठी न्यायवैद्यक तपासणी करण्यात आल्याची माहिती 'डब्ल्यूडब्ल्यूए'चे प्रमुख आदित्य पाटील यांनी दिली. या तपासणीनंतर हे ब्रश मुंगुसांच्या केसांपासून बनविण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर 'डब्ल्यूसीसीबी'ला यासंदर्भात माहिती देऊन पाच जिल्ह्यांमध्ये ही कारवाई पार पाडल्याचे पाटील यांनी सांगितले. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत मुंगूस या प्राण्याला दुसऱ्या श्रेणीत संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या केसांचा वापर करुन ब्रश तयार करणे, हा गुन्हाच असल्याची माहिती 'डब्ल्यूसीसीबी'चे प्रमुख एम. मारंको यांनी दिली. भारतात मुंगुसाच्या सहा प्रजाती असून 'इंडियन मुंगूस' प्रजातीची सर्वसामान्यपणे तस्करी होत असल्याचे त्यांनी सांगितले.


@@AUTHORINFO_V1@@