हरलोय पण थांबलो नाही : उदयनराजे भोसले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2019
Total Views |


 


सातारा : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपप्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांनी पराभवानंतर भावनिक प्रतिक्रीया दिली आहे. "आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर" , अशी भावनिक प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा येथे सभा घेतली होती. मात्र, खासदार झाल्यानंतर तीनच महिन्यांत राजीनामा दिलेल्या उदयनराजेंना सातारच्या जनतेने कौल दिला नाही. शरद पवारांचे विश्वासू सहकारी श्रीनिवास पाटील यावेळी रिंगणात होते. त्यांनी राजेंचा पराभव केला. श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा तब्बल ८५ हजार, ६८९ मतांनी पराभव केला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली होती, तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्यासाठी भर पावसात सभा घेतली होती.



 

"आपण सुचवलेले एकही जनहिताचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांनी केले नाही," असा आरोप उदयनराजे यांनी केला होता. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यांनी राष्ट्रवादीचा आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. भाजपनेही त्यांचा प्रचार करताना ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरेपूर प्रचार केला होता. मात्र, साताऱ्याच्या जनतेने पक्षीय निष्ठेला जास्त पसंती दिली आहे, असे दिसते आहे.

@@AUTHORINFO_V1@@