कोणी थिएटर देता का थिएटर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2019
Total Views |


प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी आणि ट्रिपल सीट हे दोन चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले. मात्र दुर्दैवाने या चित्रपटांना अपेक्षेप्रमाणे प्रेक्षागृह मिळण्यास खूपच त्रास होतो. आजच्या घडीला मराठी चित्रपट खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर चित्रपटांचे सादरीकरण करत आहेत आणि प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट देण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी देखील त्यांच्यावर अशी वेळ यावी ही खरंच एक चिंतेची बाब आहे असे म्हणावे लागेल.

चित्रपटांमध्ये काम करणारे प्रतिष्टीत कलाकार मंडळी, दिग्दर्शक, निर्माते यांनी वेळोवेळी यावर भाष्य करून सुद्धा अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. आज प्रसिद्ध कलाकार स्वप्नील जोशी याने निराशा व्यक्त करत "हिरकणी आणि ट्रिपल सीट ! दोन मोठे मराठी चित्रपट ! मोठी नावं, उत्तम निर्मिती मूल्य आणि प्रेक्षकांची वाढलेली उत्सुकता !!! असे असताना महाराष्ट्रामध्ये त्यांना थिएटर्स मिळू नयेत !??? अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय !! असं होता कामा नये !!!" अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध कलाकार भारत जाधव यांनी नाट्यगृहाच्या परिस्थितीविषयी नाराजी व्यक्त करणारा एक व्हिडीओ टाकला होता जो प्रचंड व्हायरल झाला. त्याचबरोबर मुक्त बर्वे, सुबोध भावे यांनी देखील याविषयी अनेकदा आपले मत व्यक्त केले. त्याही बाबतीत अनेक प्रश्न कलाकारांच्या मनात आहेत.

भारतात दरवर्षी जवळपास १००० ते १२०० चित्रपट दरवर्षी प्रसिद्ध होतात. त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे बॉलिवूडमधील चित्रपटांचे असते तरी देखील प्रत्येक चित्रपटाला पुरेशी प्रेक्षागृह उपलब्ध करून दिली जातात. मग मराठी चित्रपटांकडे हे दुर्लक्ष का केले जावे? यामध्ये नक्की चूक कोणाची, मराठी चित्रपट फार कमी प्रमाणात जाऊन बघणाऱ्या प्रेक्षकांची की प्रेक्षागृहांच्या व्यवस्थापन प्रमुखांची? याचा विचार करून योग्य तो निर्णय होणे गरजेचे आहे नाहीतर मराठी चित्रपटकर्त्यांवर कोणी थिएटर देता का थिएटर? असे म्हणण्याची वेळ येईल जे योग्य नाही.

@@AUTHORINFO_V1@@