‘स्क्रॅपमास्टर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2019
Total Views |



चित्रकलेची आवड ते स्क्रॅपमास्टरहा शिल्पकलाकार प्रदीप शिंदे यांचा कलात्मक प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांचा प्रवास उलगडणारा हा लेख...



प्रदीप शिंदे हे शिल्पकलेमधील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व. त्यांनी साकारलेल्या अनेक शिल्पांमधून त्यांच्या कल्पकतेचे प्रतिबिंब दिसून येते. प्रदीप शिंदे हे तसे मध्यमवर्गीय कुटुंबातील. विक्रोळीतल्या कन्नमवार नगरमध्ये त्यांचे बालपण गेले. आई-वडील आणि ही तीन भावंडे असा परिवार. वडील गिरणी कामगार. मात्र, मुंबईतील गिरण्या बंद झाल्याने त्यांच्या आईला शिवणकाम करुन घराचे आर्थिक धागे विणावे लागले. मुलांच्या शिक्षणात त्यांनी पैशांअभावी कुठलाही व्यत्यय येऊ दिला नाही. प्रदीप शिंदे आणि त्यांच्या भावंडांना चित्रकलेची मनसोक्त आवड. सर्वांचीच चित्रकला उत्तम असल्याने चाळीतल्या सर्व सणांमध्ये आणि कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होत. विशेषत: शिवजयंती आणि दिवाळीत किल्ले बनविण्यात त्यांचा हातखंडा. पण, प्रदीप शिंदे यांनी मात्र यामध्येच पुढे करिअर करण्याचे ठरवले.



विक्रोळीतल्या विकास हायस्कूलमधील श्रीरंग भगत आणि रजनीनाथ लुडबे या शिक्षकांनी प्रदीप यांना चित्रकलेचे धडे दिले
. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात चित्रकलेची आवड निर्माण केली. शाळेत हे शिक्षक त्यांना अनेक चित्रकला प्रदर्शनांच्या भेटीला घेऊन जात. त्यांनीच प्रदीप यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे दर्शन घडविले. दहावीत असताना प्रदीप अनुत्तीर्ण झाल्याने ऑक्टोबरची पुरवणी परीक्षा होईपर्यंत त्यांनी चिंचपोकळीला काशिनाथ घोलप यांच्याकडे मातीकाम शिकण्यास सुरुवात केली. त्यामुळे मातीकाम कसे करतात, हे प्रत्यक्ष प्रदीप यांना बघायला मिळाले. त्यांनी तिथे वर्षभर काम करून अनेक महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात केल्या. याच काळात दहावीची पुरवणी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी ठाणे स्कूल ऑफ आर्ट्स येथे ‘फाऊंडेशन’ शिकून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिल्पकला विभागात चार वर्षे शिक्षण घेतले. शिक्षणाबरोबरच त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली. फेमस स्टुडिओमध्ये मॉडेल बनविले. यामुळे त्यांचा अनुभव वाढतच गेला. शिवाय ही कामे करून मिळणार्‍या पैशांमुळे त्यांच्या आईला आर्थिक आधार मिळाला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना आदित्य बिर्ला संगीत अकॅडमीकडून ‘कला किरण’ ही शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही शिष्यवृत्ती आठ वर्षांनी मिळते. यामुळे त्यांच्या शिक्षणातील अनेक अडचणी कमी होऊन त्यांना प्रोत्साहन मिळाले. मिळेल त्या स्क्रॅपमधून शिल्पे बनविणे यात प्रदीप यांचा हातखंडा. त्यांनी ठाणे स्कूल ऑफ आर्ट्समधील स्पर्धेत ‘मास्क’ या थीमवरील शिल्पे बनविली. यात ‘अळंबी’ आणि इतर गोष्टींचा वापर करून बनविलेल्या ‘मास्क’ला प्रथम पारितोषिक मिळाले. यामुळे प्रदीप यांचा आत्मविश्वास वाढतच गेला. कमी पैशात चांगले स्क्रॅप शिल्प बनविण्यासाठी त्यांनी एका वेल्डरला हाती घेऊन अनेक चांगली शिल्पे साकारली. फावल्या वेळात त्यांना अनेक कल्पना सुचत. त्यातून नवीन काही घडविण्याचे ते काम करत.



यात
‘सिप्ला’ कंपनीचा ‘आई आणि बाळ’ असलेला लोगो प्रदीप यांचीच निर्मिती. त्यानंतर मात्र प्रदीप शिंदेंना कधीही मागे वळून पाहावे लागले नाही. त्यांनी स्क्रॅप वापरुन शिल्पकलेचे अनेक प्रयोग केले. जुनं सामान वापरून त्यांनी कावळ्यांचे शिल्प घडवले. वेगवेगळ्या मूडमधले, वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले हे कावळे लोकांच्या अतिशय पसंतीस पडले. त्यांची उत्तम शिल्पे म्हणजे वरळीला 80 मजली इमारतीच्या लॉबीमध्ये ब्रॉन्झमध्ये पृथ्वी आणि त्यावर आनंदाने नाचणारी तीन माणसे, तसेच वांद्य्राच्या कलानगरमधील एकावर एक दगड रचून केलेली कल्पक रचना. तसेच म्हाडाच्या कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलमधील रामाची मूर्ती प्रदीप यांनीच घडवलेली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मागच्या बाजूला मुख्य टपाल कार्यालय आहे. त्या टपाल कार्यालयाच्या समोर कबुतरखाना आहे. पूर्वी तिथे पाणपोई होती. आता पाणपोईचे नामोनिशाणदेखील राहिलेले नाही. त्या चौकात गेल्या वर्षापासून एक लॅम्प पोस्ट लागलेली दिसते. शिडीवर चढून लॅम्प लावणारा माणूस. हे अप्रतिम शिल्प प्रदीप शिंदे यांच्याच कल्पक बुद्धीतून साकारलेले. शिंदे यांनी अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांच्यावर देशभरातून कौतुकवर्षाव केला जातो. देशभरात अनेक प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला आहे. त्यांना आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे असून त्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. या त्यांच्या कल्पक प्रवासाला त्यांच्या कुटुंबीयांचीही साथ लाभली. यामुळेच त्यांचा हा प्रवास यशोमय झाला.



हा प्रवास प्रदीप शिंदे यांच्यासाठी सोपा नव्हता
. मात्र, त्यांनी जिद्द आणि मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण केले. यात त्यांना अडचणीही आल्या. मात्र, त्यातून मार्ग काढत त्यांनी आपले आयुष्य घडविले. आज नामांकित शिल्पकरांमध्ये प्रदीप शिंदे यांचे नाव असून आवर्जून घेतले जाते. त्यांना अनेक मोठ्या कंपन्या, संस्थांकडून शिल्प बनविण्यास बोलावणे येते. या प्रसिद्धीनंतरही प्रदीप शिंदे आपल्या आयुष्यातील कठीण समय विसरलेले नाहीत. त्यांच्या या कलाप्रवासात त्यांना उत्तरोत्तर असेच यश मिळावे, यासाठी शुभेच्छा...!

-कविता भोसले 
@@AUTHORINFO_V1@@