पवारांनी गड राखला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2019   
Total Views |




महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच पश्चिम महाराष्ट्राचा राजकारणात कायमच वरचष्मा राहिला. महाराष्ट्राला आजवर लाभलेले बहुतांश मुख्यमंत्रीही याच पश्चिम महाराष्ट्रातले. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा एकूण पाच जिल्ह्यांचा जवळपास ५० हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा हा महत्त्वाचा विभाग. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटलांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्रातून नेतृत्व लाभले. पण, तरीही कित्येक मूलभूत समस्या अनेक वर्षं ‘जैसे थे’च राहिल्या. माण-खटावसारखा दुष्काळी भाग, नापिकी, शेतकरी आत्महत्या, सहकारी साखर कारखान्यांचे राजकीय वर्चस्व, जातीपातीचे राजकारण यामुळे पश्चिम महाराष्ट्र कायमच अस्थिरतेच्या गर्तेत राहिला. काँग्रेस-राष्ट्रवादीला कायम ‘हाता’ची साथ देणार्‍या प. महाराष्ट्रात मात्र २०१४ साली भाजपने मुसंडी मारली.



त्यानंतरही झालेल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत
‘कमळ’ उमलले. शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार यांसारख्या कित्येक सरकारी योजना या विभागात सरकारने यशस्वीपणे राबविल्या. त्याचा निश्चितच फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आला. त्याचबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीशी कित्येक वर्षांपासूनचे घनिष्ठ संबंध राहिलेल्या छत्रपतींच्या घराण्यापासून ते मोहिते-पाटील, निंबाळकर घराण्याचे सदस्य भाजपमध्ये प्रवेश करते झाले. त्यापैकी सातार्‍यातून शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय झाला असला तरी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झालेले उदयनराजे यांचे पक्षांतर सातारकरांच्या पचनी पडलेले दिसत नाही. ८५ हजारांच्या मताधिक्क्याने राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्या सिंहासनाला जोरदार धक्का दिला. शिवाय शरद पवार यांनी ऐन मतदानापूर्वी पावसात भिजून केलेल्या सातार्‍यातील भाषणामुळे राष्ट्रवादीविषयी एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली. त्यामुळे सातार्‍याचा आणि पर्यायाने प. महाराष्ट्राचा गड शरद पवार राखण्यात यशस्वी ठरले. सातार्‍यातील आठ पैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयाने दक्षिण कराडमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले.



सांगलीमध्येही तासगाव
, इस्लामपूर, शिराळा राष्ट्रवादीकडे, तर जत, पळूस-कडेगावातून काँग्रेसचे विश्वजित कदम विजयी ठरले. भाजपचे सुरेश खाडे मिरजेतून निवडून आले, तर सांगली धनंजय गाडगीळ यांनी राखली. सोलापूरमध्ये मात्र महायुतीचे वर्चस्व यंदाही दिसून आले. माळशिरस मतदारसंघातून शेतकर्‍याचा मुलगा, संघ, भाजप, अभाविपमध्ये सक्रिय असलेले राम सातपुते यांनी दणदणीत विजय मिळवला. सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिणमध्ये ‘कमळ’ फुलले, तर सांगोला, बार्शीवर शिवसेनेचा भगवा फडकला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे काँग्रेसतर्फे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडून आली व एमआयएमचा उमेदवार दुसर्‍या, तर शिवसेना तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली.



महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात आणखीन एक मोठा धक्का बसला तो कोल्हापुरातून
. काही महिन्यांपूर्वी उद्भवलेली भीषण पूरस्थिती आणि त्यामुळे प्रशासनावरील कोल्हापूरकरांची नाराजीच या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. या पूरपरिस्थितीत कुठे तरी प्रशासकीय यंत्रणेचे प्रयत्न अपुरे पडले आणि कोल्हापूरकरांनी मतपेटीतून आपला रोष व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १० जागांपैकी चंदगडमध्ये वंचित बहुजन आघाडीने खाते उघडले, तर शाहुवाडीत जन सुराज्य शक्तीचे डॉ. विनय कोरे विजयी ठरले. राधानगरीची एकमेव जागा शिवसेनेच्या प्रकाश अबिटकरांना राखता आली, तर शिरोळ, इचलकरंजीच्या जागेवर अपक्ष उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. कागलमधून निवडणुकीपूर्वी आयकर खात्याचे छापे पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफांनाच मतदारांनी कौल दिला, तसेच बंडखोरीचा फटकाही महायुतीला कागलमध्ये बसला, तर करवीर, हातकणंगले, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण या चार जागांवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे मूळचे कोल्हापूरचे असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठीही हा धक्काच म्हणावा लागेल. परिणामी, मतदानाचा एकूणच टक्का कोल्हापूरमध्ये वाढला असला तरी भाजपच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही.








पुणे जिल्ह्यातील एकूण २१ मतदारसंघांपैकी शहरातील आठ पैकी सहा जागांवर भाजपने आपले वर्चस्व कायम राखले
. कोथरुडमधून चंद्रकांतदादा पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले, तर गिरीश बापटांचा, भाजपचा पारंपरिक कसबा मतदारसंघ राखण्यास पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यशस्वी ठरल्या. शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, पर्वतीमधून माधुरी मिसाळ विजयी झाल्या, तर खडकवासला, पुणे कॅन्टॉन्मेंट, चिंचवड मतदारसंघातही भाजपची जादू दिसून आली. पिंपरी, वडगाव शेरी, हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची सरशी झाली. अपेक्षेप्रमाणे अजित पवार बारामतीतून, तर आंबेगावमधून दिलीप-वळसे पाटील निवडून आले. इंदापूरमध्ये मात्र राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केलेल्या हर्षवर्धन जाधवांना पराभवाचा सामना करावा लागला आणि राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विजयी ठरले. शिरुर, जुन्नरमधूनही राष्ट्रवादीने बाजी मारली, तर पुरंदर आणि भोर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी ठरले.



. महाराष्ट्रातील २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता, बारामती, सातारा सोडल्यास पुणे, मावळ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, माढा, हातकणंगले या मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार निवडून आले होते. पण, यंदा विधानसभा निवडणुकीत मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या. त्या खालोखाल भाजप, काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांना यश संपादित करता आले. एकूणच, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला फारसे समाधानकारक यश मिळविता आलेले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकापला एकाही जागेवर खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे भाजपसह शिवसेनेलाही पक्षसंघटनेवर अधिकाधिक भर देऊन प. महाराष्ट्रातील जनतेच्या समस्यांकडे अधिक गांभीर्याने पाहावे लागेल, हाच या निवडणुकीचा धडा!

@@AUTHORINFO_V1@@