उत्तर महाराष्ट्रात संमिश्र आणि धक्कादायक निकाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2019   
Total Views |





नाशिक महसूल विभागातील नाशिक
, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश उत्तर महाराष्ट्रात होतो. नाशिक येथील कृषी वर्ग, जळगाव येथील सोने व्यापार आणि कृषी व्यवसाय, धुळे आणि नंदुरबार मधील वनवासी बहुल समाज आणि अहमदनगर जिल्ह्यातील सहकार आणि कृषीआधारित जनजीवन यांचा संगम म्हणजे उत्तर महाराष्ट्र होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातील या भागाचे राजकारणदेखील याच मुद्द्यांच्या आधारे कायम रंगवले गेले. यंदाच्या निवडणुकीतदेखील हेच मुद्दे येथील चर्चेचे मुद्दे ठरले.



उत्तर महाराष्ट्रातील नाशिक हा प्रमुख जिल्हा
. यंदाच्या निवडणुकीत नाशिक शहरात भाजपने एकहाती सत्ता अबाधित राखली. यामुळे नाशिककरांचे २००९ पासून एकहाती सत्ता देण्याचे धोरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले. येथील देवळाली मतदारसंघात ३० वर्षांपेक्षा घोलप घराण्याकडे असणारी सत्ता यंदाच्या निवडणुकीत राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांच्या हातातून निसटल्याचे दिसून आले. त्यांचे पुत्र आणि शिवसेना उमेदवार योगेश घोलप यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सरोज आहेर यांनी मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. सातत्याने घोलप घराणेच सत्तेत असणे याचा फटका येथे शिवसेनेला बसलेला दिसला. त्यातच ‘भगवा’ आणि ‘निळा’ यांचे मतविभाजन होऊ नये यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून खेळण्यात आलेली ही खेळी यशस्वी झाल्याचे दिसून आले. घोलप यांचा पराभव म्हणजे घराणेशाहीला नाकारणारा मतदारांचा कौल असल्याचे दिसून येते. यामुळे येथील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याचे स्पष्ट होत आहे.



नाशिक जिल्ह्यातील नांदगाव
, मालेगाव मध्य, बागलाण, कळवण, चांदवड, येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी, इगतपुरी हे ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतात. या भागातील निकालदेखील संमिश्र स्वरूपाचे असल्याचे दिसले. जिल्ह्यातील चांदवड, नांदगाव, बागलाण या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेने दिलेले उमेदवार निवडून जरी आले असले तरी, इतर मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बोलबाला राहिला. नांदगावमध्ये पंकज भुजबळ यांच्या कामाप्रति असणारा असंतोष, त्यांची मतदारसंघाशी तुटलेली नाळ याचा फटका त्यांना बसल्याने शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. येवल्यात मात्र छगन भुजबळ आपल्याकडे मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्याचे दिसून आले.



जिल्ह्यातून माकपची सत्ता तब्बल ३५ वर्षांनंतर हद्दपार झाली
. म्हणजेच सात वेळा आमदार राहिलेले जीव पांडू गावित यांना कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यात झालेल्या प्रांतवादाचा फटका बसला असून या दोन्ही तालुक्यांनी आपल्या भागातील उमेदवारांना मते देण्याचा निर्णय सुप्त पद्धतीने घेतल्याने राष्ट्रवादीचे नितीन पवार या निवडणुकीत यश संपादित करू शकले. पवार हे भाजपचे पूर्व मंत्री व तब्बल नऊवेळा कळवण मतदारसंघातून विजयी झालेले दिवंगत आमदार ए. टी. पवार यांचे चिरंजीव आहेत. भाजपच्या दिंडोरी मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांचे दीर आहेत. कळवण तालुक्यावर सातत्याने पवार परिवाराचा स्नेह असल्याने नितीन पवार यांना हा विजय प्रांतवादामुळे सोपा झाला व माकपची दांडी गुल झाली.



जळगाव जिल्हा गिरीश महाजन यांचा जिल्हा म्हणूनच राज्यात ओळखला जातो
. २०१४ नंतर येथून भाजप नेते एकनाथ खडसे यांचे कमी होत गेलेले महत्त्व आणि महाजन यांचे उभे राहिलेले नेतृत्व हेच जळगावच्या राजकारणाचे समीकरण गेल्या पाच वर्षांत पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन यांनी विजयश्री संपादित करत राज्याच्या राजकारणात आपले स्थान पक्के केले आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील ४७ जागांपैकी ४३ जागांवर विजय संपादित करण्याच्या त्यांच्या स्वप्नाला नंदुरबारमधून राष्ट्रवादीचे विजय गावित, नवापूर सुरूपसिंग नाईक, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांनी सुरुंग लावल्याचे दिसून आले. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा झालेला पराभव आणि एकनाथ खडसे यांना नाकारलेले तिकीट हे आगामी काळात जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात वेगळीच नांदी दाखविण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. रोहिणी खडसे यांच्या पराभवानंतर त्यांचा विजय हा निसटता असल्याची एकनाथ खडसे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया बरीच बोलकी म्हणावी लागेल.



अहमदनगर जिल्ह्यातून कर्जत
-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांनी पहिल्याच निवडणुकीत मिळवलेला विजय हा या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा गड अजूनही हातात असल्याचे उदाहरण आहे. अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीतून हमखास निवडून येणारे मधुकर पिचड आणि आता त्यांचे पुत्र वैभव पिचड हेच समीकरण होते. मात्र, यावेळी वैभव पिचड यांनी हाती ‘कमळ’ घेत आपले नशीब आजमावून पहिले. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. येथून राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा मोठ्या मताने पराभव केला. मुळात नगर जिल्ह्यात भाजपच्या केवळ दोन जागा निवडून आल्या. यामागे जाणीवपूर्वक असणारे संगनमत, नगर जिल्ह्यातील काही नेत्यांकडून करण्यात आलेली आक्रमक विधाने, पिचड यांनी न केलेले काम व त्यांच्या अवतीभोवती असणार्‍या मंडळींप्रति नागरिकांमध्ये असणारी तीव्र नाराजी आदी कारणे असल्याचे जाणवते.



नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे विजयकुमार गावित यांनी मिळविलेला विजय हा आजही वनवासीबहुल भागातील जनतेचा भाजपवर असणारा विश्वास दर्शविणारा ठरला आहे
. गावित आडनावाच्या भोवती फिरणारे नंदुरबारचे राजकारण लोकसभेप्रमाणे मतदारांच्या कौलाच्या रूपाने भाजपच्या पाठीशी उभे राहिले आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हादेखील वनवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिक जिल्ह्याच्या शेजारचा जिल्हा असा भौगोलिकदृष्ट्या धुळे जिल्हा असला तरी, नाशिक व धुळे जिल्ह्यातील राजकीय मुद्दे हे नेहमीच वेगळे राहिले आहेत. नाशिक जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर धुळे जिल्ह्यात पाण्याची मोठी समस्या असते. त्यामुळे या जिल्ह्याचे वेगळे असणारे प्रश्न हे या निवडणुकीत मैलाचा दगड ठरले असे म्हणावे लागेल. तरीदेखील धुळे ग्रामीणमध्ये भाजपच्या माईसाहेब पाटील यांनी उत्तम लढत दिली. येथून काँग्रेसचे कुणाल पाटील हे जरी विजयी झाले असले, तरी भाजपचे असणारे येथील अस्तित्व अधोरेखित करणारी ही निवडणूक ठरली. धुळे शहरामधून राजवर्धन कदमबांडे यांचा अपक्ष म्हणून झालेला विजय हा लोकसंग्रामाचे अनिल गोटे यांच्या जिव्हारी लागणारा ठरण्याची शक्यता आहे. असे असले तरी, नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे नाशिक शहरातील तीनही मतदारसंघात भाजपची सत्ता अबाधित राहिली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नाशिक ग्रामीण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे येथील समीकरणे मात्र निश्चितच वेगळी ठरली. लोकसभेत उत्तम यश देणारा हा विभाग मात्र विधानसभेसाठी स्थानिक मुद्द्यांवर भर देणारे आणि त्याची सोडवणूक करणारा उमेदवार निवडून देणारा ठरला. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्राचा निकाल हा संमिश्र आहे, असेच म्हणावे लागेल.

@@AUTHORINFO_V1@@