स्वस्तिपंथेचि चालावे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2019
Total Views |




कलंक विरहित चंद्र आणि तापविहीन सूर्य असे सज्जन नेहमीकरिता
‘आमचे सोयरे’ होवोत. या दोन्हींचा उद्देश सर्वांसाठी कल्याणकारी आहे. अगदी सृष्टीच्या आदीकाळापासून हे गतिमान आहे. म्हणून मानवाने या दोन्हींना आपले आदर्श मानून प्रगती साधावी. ही दोन्ही तत्त्वे सन्मार्ग शिकवतात. मानवसमूहातील मोठ्यात मोठे विद्वान किंवा तत्त्वज्ञ आपल्या मार्गावरून विचलीत होतील. पण, सूर्य आणि चंद्र ही प्राकृतिक महान तत्त्वे आपल्या कर्तव्यापासून कधीही टळणार नाहीत. म्हणूनच मानवाने या दोन्हींच्या पवित्र कल्याणप्रद मार्गांचे अनुसरण करावे.



स्वस्तिपन्थामनुचरेम सूर्याचन्द्रमसाविव।

पुनर्ददताघ्नता जानता सं गमेमहि॥

(ऋग्वेद-५.५१.१५)

अन्वयार्थ

आम्ही (सूर्याचन्द्रमसौ इव) सूर्य आणि चंद्राप्रमाणे (स्वस्तिपन्थाम्) कल्याणकारी मार्गाने (अनुचरेम) चालत राहावे. (पुन:) आणि तसेच (ददता) दान करणार्‍या दानी लोकांसमवेत, (अघ्नता) हिंसा न करणार्‍यांसमवेत आणि (जानता) ज्ञानी व विद्वान महात्म्यांसमवेत (सं गमेमहि) राहून त्यांची संगत करावी.

विवेचन

मानव हा अल्पज्ञ असा सामाजिक प्राणी आहे. अक्षरी ज्ञानपांडित्याने किंवा भौतिक सुखसुविधांनी किती जरी परिपूर्ण झाला, तरी त्याने स्वत:ला मोठे समजू नये. त्याला थोरा-मोठ्यांच्या विचारांची, संगतीची मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज भासतेच!

वरील मंत्रात माणसाने कोणाच्या मार्गाचे अनुसरण करावे आणि कोणाची संगती धरावी, याबाबत अतिशय समर्पक उदाहरणाद्वारे विश्लेषण करीत उत्तम प्रकारे प्रबोधन केले आहे. आपण नेहमी ‘लहानांनी मोठ्यांचे अनुकरण करावे’ असे म्हणतो व ऐकतोही. परंतु, जर एखाद्या लहान असलेल्या पण सद्गुणांनी, सदाचरणाने व ज्ञानाने मोठा असलेल्यांचे का आपण ऐकू नये? हो! तोदेखील तितकाच महान आहे. याउलट एखादा वयाने, आकृतीने, विद्येने व धनाने जरी मोठा असला, पण त्याचे आचरण मात्र बरोबर नसेल तर काय तो आपला आदर्श व अनुकरणीय व्यक्ती होऊ शकतो? असेही नव्हे! वस्तुस्थिती अशी की, लहान असो की मोठा, जो कोणी ज्ञान, सत्कर्म व सदाचाराने सुसंपन्न असेल तर तोदेखील सर्वांकरिता प्रेरणेचा स्रोतच ठरतो. एका सुभाषिताने सार्थपणे म्हटले आहे

‘न खलु वयस्तेजसो हेतु:।’

सदरील मंत्रात सृष्टीतील सूर्य व चंद्र या दोन तत्त्वांना दिशादर्शक, प्रेरक व दीपस्तंभ मानले आहे. या जगात मोठ्यात मोठे व लहानात लहान कोण-कोण आहेत? तर वेदमंत्र म्हणतो - सूर्य आणि चंद्र! हे दोघेही प्रकाशमान, तेजस्वी व समग्र जगाकरिता कल्याणकारी, परोपकारी व पथप्रदर्शक आहेत. सूर्य व चंद्रास आम्ही नित्य नेमाने पाहतो. आकाशात दीपस्तंभाप्रमाणे चमकणारी जणू काही श्रेष्ठतम अशी ऊर्जास्थानेच! पण, आम्हास त्या दोन्हींविषयी कधीही कौतुक वा विशेष महत्त्व वाटत नाही. या दोन्हींचा पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीशी घनिष्ठ संबंध! सूर्य दिवसा तर चंद्र रात्री! सूर्य प्रखर तेजस्वी, तर चंद्र हा शीतल! सूर्यासाठी सविता, आदित्य, अर्क, हंस, खद्योत, तपन, दिवाकर, रवी, हिरण्यगर्भ, भानु, भास्कर, मित्र, सहस्रांशु, तेजोनिधी, मरिचीमालिनी अशी कितीतरी अर्थपूर्ण नावे, तर चंद्रासाठी हिमांशु, इंदू, कुमुदबांधव, सुधांशु, निशापती, कलानिधी, सोम आदी सार्थक नावे अमरकोषात आलेली आहेत. ही दोन्ही तत्त्वे नावानुरूपच आपल्या कार्यात मग्न आहेत. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात सूर्य आणि चंद्र या दोन्हींचेही स्मरण करीत त्यांची उपमा सज्जनांना दिली आहे.

चंद्रमे जे अलाच्ंछन मार्तंड जे तापहीन।

ते सर्वाहि सदा सज्जन। सोयरे होतु॥

कलंक विरहित चंद्र आणि तापविहीन सूर्य असे सज्जन नेहमीकरिताआमचे सोयरे’ होवोत. या दोन्हींचा उद्देश सर्वांसाठी कल्याणकारी आहे. अगदी सृष्टीच्या आदीकाळापासून हे गतिमान आहे. म्हणून मानवाने या दोन्हींना आपले आदर्श मानून प्रगती साधावी. ही दोन्ही तत्त्वे सन्मार्ग शिकवतात. मानवसमूहातील मोठ्यात मोठे विद्वान किंवा तत्त्वज्ञ आपल्या मार्गावरून विचलीत होतील. पण, सूर्य आणि चंद्र ही प्राकृतिक महान तत्त्वे आपल्या कर्तव्यापासून कधीही टळणार नाहीत. म्हणूनच मानवाने या दोन्हींच्या पवित्र कल्याणप्रद मार्गांचे अनुसरण करावे. या दोन्ही सर्वांसाठी खुले व समान आहे. सूर्यप्रकाश विश्वनिर्मिती व विकासाकरिता अत्यावश्यक आहे. तसेच चंद्रही तितकाच आरोग्यदायी. म्हणूनच त्याच्या कार्यात विश्वाचे कल्याण दडले आहे. मानवास आपली प्रगती साधावयाची असेल, तर त्यांनी या दोन्ही प्राकृतिक शक्तींच्या गतिशील व प्रकाशमय मार्गांचे अनुसरण करावे लागेल.



जीवनात गतिमान होताना चालता
-चालता माणूस थकतो, हे निश्चित! म्हणून त्याने थोडीशी विश्रांती घ्यावयास हवी. मग कोठे तरी, कोणाच्या तरी सान्निध्यात बसावयास हवे. ज्यांची संगत ही आपल्या जगण्याला नवे बळ प्रदान करते. अशांच्याच संगतीत राहणे उचित आहे, हे सांगताना वेदमंत्रात श्रेष्ठ व्यक्तींच्या संगतीचे महत्त्व विशद केले आहे. याचकरिता मंत्राचा दुसरा अंश सत्संगतीची शिकवण देतो. आम्ही ददता, जानता आणि अघ्नता म्हणजेच दानशील, ज्ञानशील व हिंसाविरहित अशा सज्जन महापुरुषांच्या सोबत राहावे व बसावे. कारण, चांगल्यांच्या संगतीत गेल्यास मानव दु:खापासून दूर होतो आणि सर्व सुखांचा लाभ होतो. आचार्य भर्तृहरीने एके ठिकाणी सत्संगाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे -

‘सत्संगति: कथय किं

न करोति पुंसाम्?’



सांगा पाहू
! संत्संगत मानवाचे कोणते कल्याण करत नाही? सर्व काही लाभते ते संतांच्या संगतीमुळेच, अन्यथा वाईटांची संगत मानवाच्या अध:पतनास कारणीभूत ठरणारे आहे. दानी, ज्ञानी व अहिंसकाची संगत ही मानवाला नेहमी उच्च आदर्शांचे वळण देते. दातृत्वाची भावना विकसित होते. ती उदारहृदयी दानी व्यक्तीमुळे. बुद्धीचा विकास होतो ज्ञानी लोकांमुळे आणि दया, करुणा व मृदुता येते ती अहिंसक लोकांच्या संगतीमुळे! म्हणून सत्संगतीच्या पावन तीर्थामध्ये स्नान केल्याने माणूस सर्व दृष्टीने शुद्ध, पवित्र व मंगलमय होतो, असाच भाव यजुर्वेदात येतो. ‘ऋतस्य पंथा प्रेत।’ (हे माणसा, तू सत्यमार्गाने पुढे चल.) वैदिक वाङ्मयातील महान तत्त्वांच्या अनुगमनाचा आणि महापुरुषांच्या सत्संगतीचा हा उदात्त भाव जगातील सर्व मानव आपल्या हृदयात धारण करतील आणि या वेदाज्ञेप्रमाणे चालतील, तेव्हा त्यांचे समग्र जीवन निश्चितच सर्व दृष्टीने आनंदी व सुखी होईल, यात शंका नाही.



-
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@