काय आहे इन्फोसिस वाद ? ज्यामुळे बुडाले गुंतवणूकदारांचे ५२ हजार कोटी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2019
Total Views |




मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातली आघाडीची कंपनी इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच इन्फोसिसचे समभाग १६ टक्क्यांनी घसरले. इन्फोसिसच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळेच हा परिणाम जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा फटका गुंतवणूकदारांना बसला.

 

एकूण भांडवल मुल्यात ५२ हजार कोटींची घसरण झाली. शुक्रवारी इन्फोसिसचा शेअर ७६७.७५ रुपयांवर बंद झाला होता. यावेळी कंपनीचे बाजारमुल्य एकूण ३ लाख ३० हजार ७३ कोटी इतके होते. मंगळवारी एकूण १६ टक्क्यांनी घसरला. कंपनीचे एकूण बाजारमुल्य आता २ लाख ७७ हजार ४५० कोटी इतके आहे. याचे पडसाद शेअर बाजारावरही उमटले.

 

कंपनी अधिकाऱ्यांवर हे आहेत गंभीर आरोप

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय कदाचार यांच्यावर कर्मचाऱ्यांच्या एका गटाने गंभीर आरोप लावले आहेत. एका जागल्यानुसार, कंपनीतील नफ्याचा आकडा फुगवण्यासाठी गुंतवणूक आणि हिशोबाच्या आकडे फुगवण्यात आले आहेत. त्याबद्दल कंपनीच्या ऑडीटर्सनाही अंधारात ठेवण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या गटाने त्यांच्याकडे पुराव्यांमध्ये ई-मेल्स आणि व्हॉईस रेकॉर्डिंग असल्याचेही सांगितले आहे.

 

इथिकल एम्पोइज नामक एका समुहाने इन्फोसिसच्या मंडळासह अमेरिकन सिक्युरीटी एक्सचेंज कमिशनला एक विवादीत पत्र लिहीत हा आरोप लावला आहे. जास्तीचा नफा मिळवण्यासाठी कंपनीने अनैतिक मार्गांचा अवलंब केल्याचा आरोपही त्यांनी लगावला आहे. हे पत्र २२ सप्टेंबर रोजी पाठवण्यात आले आहे.

 

असा केला महसुलात फेरफार

इन्फोसिसकडे पाठवण्यात आलेल्या पत्रात सर्व पुरावे सादर करण्यात आले असून या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी ऑडीटरला या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यासाठी धमकी दिल्याचेही पत्रात म्हटले आहे.

 

कंपनीने महसुलात फेरफार केल्याचाही आरोप या पत्रात लगावण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या गटाने म्हटल्यानुसार इतर कुणालाही कंपनीच्या कारभाराचा ताबा दिला जात नसून तसे केल्यास कंपनीच्या भागभांडवलावर त्याचा परिणाम होईल, अशी भीती व्यवस्थापनाला वाटत होती. वेरीजॉन, इंटेल, एबीएन आणि जपान जेवी या करारांमध्ये महसुलातील आकडेवारीत फेरफार केल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत.

 

कंपनीचे म्हणणे काय ?

या सर्व प्रकरणाचे गांभीर्य पाहाता कंपनीतर्फे यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. जागल्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ऑडीटरसमोर हे प्रकरण ठेवण्यात आले असून याबद्दल योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी याबद्दल शेअर बाजारात ही माहिती दिली. या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 
@@AUTHORINFO_V1@@