भारताचा ऐतिहासिक विजय : द. आफ्रिकेचा सुपडा साफ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2019
Total Views |


 


रांची : विराट कोहलीच्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या कसोटीमध्ये एक डाव आणि २०२ धावांनी धुव्वा उडवत आणखी एक ऐतिहासिक विजय आपल्या नावावर केला. विराट कोहलीच्या संघाने या कसोटीमध्ये पहिल्या दिवसापासून वर्चस्व प्रस्थापित केले होते. अखेर चौथ्या दिवशी फॉलोऑन दिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १३३ धावांत गुंडाळला. या सामन्यामध्ये रोहित शर्माची, अजिंक्य राहाणेची फलंदाजी आणि भारतीय गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे हा विजय साकारत आला.

 

नाणेफेक जिंकत भारतने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माच्या २१२ आणि अजिंक्य रहाणेच्या ११५ धावांच्या जोरावर भारताने दीड दिवसामध्ये ४९७ धावांचा डोंगर रचला. या ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची मात्र दमछाक झाली. आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. या डावामध्ये झुबेर हमझा याच्या ६२ धाव वगळता एकही फलंदाजाला चंगली कामगिरी करता आली नाही. यामध्ये गोलंदाजांनी मात्र कमी धावा देत विकेट घेण्याचे सत्र सुरूच ठेवले. उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतले तर मोहम्मद शमी, शाहबाज नदीम आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट घेतले.

 

भारताने फॉलो ऑन दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची मात्र दैना झाली. शमी आणि यादवच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेच्या एकही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. त्यांचा दुसरा डावही अवघ्या १३३ धावांवर आटोपला. यावेळी शमीने ३ विकेट्स घेतल्या, तर यादव आणि नदीमने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा आणि अश्विननेदेखील प्रत्येकी १ विकेट घेऊन भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मालिकेमध्ये सलग ३ शतक ठोकणाऱ्या रोहित शर्माला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या मालिकेमध्ये सर्वाधिक ५२९ धावा केल्या, ज्यामध्ये ३ शतकांचा समावेश आहे. शेवटच्या सामन्यात केलेल्या द्विशतकीय खेळीची त्याला सामानावीराचादेखील पुरस्कार देण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@