युती विरुद्ध शरदराव पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2019   
Total Views |





या अखेरच्या पर्वात आपण जे उभं केलं ते उद्ध्वस्त होत असताना पाहात राहणे कोणाच्या नशिबी येऊ नये
. परंतु, नशीब काही चुकत नाही. आपला एक कर्मसिद्धांत आहे, जे कर्म आपण करू त्याचे फळ आपल्याला भोगावे लागते.


महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या
. २१ तारखेपूर्वी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पाऊस पडत होता. मुंबईत तर हलकी सरही म्हणता येणार नाही, असा रिपरिप पाऊस सतत पडत होता. मतदानाच्या दिवशीही असाच पाऊस पडल्यास त्याचा मतदानावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, असे सर्वांना वाटले. वरुणराजाच्या मनात मात्र वेगळेच होते. त्याने निर्णय केला होता की, दिवसभर फिरकायचे नाही. एकदा मतदान झाले, लोकं आपल्या घरी गेली की मग आवाज करीत मस्तपैकी बरसून घ्यायचे. त्याच्याही मनात असावे की, महाराष्ट्रात पुन्हा जनतेचे सरकार यावे. म्हणजे कोणाचे? याचे उत्तर उद्या मिळेल.



हा झाला पावसाचा विषय
. तसाच दुसरा विषय पवारांचा. शरदराव पवार यांचे वय आता ८०च्या जवळपास आहे. या वयात माणूस थकतो. प्रवास त्याला नकोसा वाटतो. सार्वजनिक कार्यक्रम शक्यतो टाळण्याचा तो प्रयत्न करतो. शरदराव पवार यांनी या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात जवळजवळ ६० ठिकाणी सभा घेतल्या. तरुणाला लाजवेल, असा हा उत्साह. हाडाचा राजकारणी कधी म्हातारा होत नसतो, असे जे म्हणतात, त्याचे प्रत्यंतर शरदराव पवार यांनी दाखवून दिलेया वयात निवडणूक प्रचारात एवढ्या ठिकाणी शरदराव पवारांना जाण्याचे कारण काय पडले? त्याचे उत्तर असे की, ही निवडणूक त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची लढाई होती. निवडणूक घोषित होण्यापूर्वीच त्यांच्या पक्षातील मान्यवर नेतेमंडळी पक्ष सोडून शिवसेना आणि भाजपत गेली. त्यांचे नातेवाईकही गेले. पक्षाचे नेतृत्व अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी करणे अपेक्षित होते. अजित पवार यांनी मध्येच राजीनामा देण्याची भाषा केली. त्यामुळे केवळ पक्षच हादरला असे नाही, तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणालादेखील भूकंपाचा धक्का बसला. शेवटी पक्षासाठी प्रचारसभा घेण्याचे काम शरदराव पवार यांच्या खांद्यावर आले.



राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोनिया काँग्रेस यांची युती झाली
. काँग्रेसकडे प्रचारासाठी कोणी नेता उरला नाही. जे आहेत ते गर्दी खेचू शकत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राज ठाकरे यांना भाड्याने घेतले होते. यावेळी राज ठाकरे स्वत: निवडणुकीत उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महागठबंधन असल्यामुळे या गठबंधनाच्या नेतृत्वाची जबाबदारी शरदराव पवार यांनाच उचलावी लागली. येथेही प्रश्न अस्तित्व रक्षणाचा आहे. काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी प्रचारासाठी आल्या, राहुल गांधी यांनी काही सभा घेतल्या आणि राफेलचे तुटलेले तुणतुणे वाजवले. तशी ही निवडणूक ‘शिवसेना-भाजप युती विरुद्ध शरदराव पवार’ अशीच झालेली आहे. युती विरुद्ध बोलण्यासाठी शरदराव पवार यांच्याकडे नवीन मुद्दे काही नव्हते. युतीच्या काळात महाराष्ट्राचा विकास झाला नाही, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, बेरोजगारी वाढते आहे, सिंचनाचे प्रश्न प्रलंबित आहेत वगैरे वगैरे... युतीविरुद्धच्या या प्रचाराला तशी कोणती धार नव्हती. शरदराव पवार यांचे राजकारण पाहता त्यांनी नव पेशवाई, हिंदू दहशतवाद, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र या भाषेत विषय मांडणे अपेक्षित होते. परंतु, ते विकासाच्या प्रश्नांवर बोलत राहिले. अधूनमधून घटनेचे ‘३७० कलम’, पाकिस्तानविरुद्ध केलेली कारवाई यांचा उल्लेख करून त्यांचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंध काय? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.



शरदराव पवार यांचे आतापर्यंतचे राजकारण जातीय समीकरणे यशस्वीपणे बसविण्यात होते
. मराठा-दलित-मुसलमान असं गठबंधन त्यांनी यापूर्वी महाराष्ट्रात घडवून आणले होते. यावेळी त्यांना अशाप्रकारे ज्यांचे संख्याबळ जास्त आहे, अशा जातींची आणि धर्मगटांची मोट बांधणे काही जमलेले दिसत नाही. मराठा समाज हा त्यांच्या भरवशाचा समाज. त्यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करताना इंग्रजी वर्तमानपत्रे ‘स्ट्राँग मराठा मॅन’ या शब्दात करतात आणि मराठी वर्तमानपत्रे ‘जाणता राजा’ या शब्दाने करतात. हा मराठा समाज आता शरदराव पवार यांच्या मागे उभा नाही. देवेंद्र फडणवीस शासनाने मराठ्यांना १६ टक्के आरक्षण दिल्यामुळे आरक्षण हा विषय राजकारणातून संपलेला आहे. जे काम १५ वर्षे सत्तेत राहूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला करता आले नाही किंवा त्यांनी केले नाही, ते काम देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखविले. यामुळे ‘पेशवाई’ वगैरे शब्दप्रयोगांना काही बाजारपेठ राहिलेली नाही. दरवर्षी कांद्याचे भाव जसे कोसळतात तसे ‘पेशवाई’चे भावदेखील आता कोसळलेले आहेत.



मतदान झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरदराव पवार म्हणतात की
, “मतदानाचा कौल नक्कीच या सरकारच्या विरोधात जाईल. मतदार सामान्यत: उमेदवाराच्या कार्यशैलीचा विचार करतात. मतदारसंघात त्याने किती कामं केली आहेत हे बघतात, तो कोणत्या घराण्याचा आहे किंवा परिवाराचा आहे हे बघत नाहीत.” शरदराव पवारांना आशा वाटते की, या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल. तरुणांना बदल हवा आहे, भाजप आणि सेनेच्या सत्तेने काही बदल होईल, असं लोकांना वाटलं होतं. परंतु, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे म्हणून त्यांनी बदलासाठीच मतदान केलेले आहे, असे शरदरावांचे मत आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही पराभूत होणार आहोत, आम्ही सपाटून मार खाणार आहोत, आमच्या अस्तित्वापुढे प्रश्न निर्माण होणार आहे, असे कोणताही नेता म्हणत नाही, म्हणूदेखील शकत नाही. पराभव दिसत असतानादेखील आम्हीच विजयी होणार असेच त्याला म्हणावे लागते. बुशने जेव्हा इराकवर हल्ला केला, तेव्हा दूरदर्शनवर सद्दामचा अली नावाचा एक मंत्री सतत वक्तव्य देत राहिला की, “आम्ही अमेरिकन लोकांना ठोकून काढणार आहोत. एक अमेरिकन सैनिक जीवंत जाणार नाही. एकाही अमेरिकन विमानाला आमच्या हद्दीत प्रवेश करू दिला जाणार नाही.” या अलीचे नंतर नाव पडले, ‘विनोदी अली.’ तोही सद्दामसोबत पकडला गेला. पराभव होत असताना असे बोलायचे असते.



शरदराव पवार यांच्या राजकीय जीवनाचे
, तशा अर्थाने हे अखेरचे पर्व आहे. या अखेरच्या पर्वात आपण जे उभं केलं ते उद्ध्वस्त होत असताना पाहात राहणे कोणाच्या नशिबी येऊ नये. परंतु, नशीब काही चुकत नाही. आपला एक कर्मसिद्धांत आहे, जे कर्म आपण करू त्याचे फळ आपल्याला भोगावे लागते. शरदराव पवार १९६७ सालापासून राजकारणात आहेत. महाराष्ट्राचे चार वेळा ते मुख्यमंत्री झाले आहेत. एकही निवडणूक ते हरलेले नाहीत. राजकारणातील डावपेचात ते अत्यंत तज्ज्ञ आहेत. सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. ही सर्व शक्तिस्थाने असतानादेखील या वयात त्यांना एवढा झंझावाती दौरा का करावा लागला? सहकारी का सोडून चालले? ज्या मराठा समाजाचे नेतृत्व केले, तो मराठा समाज का दूर जात चालला आहे? ज्या जातीय समीकरणांचे राजकारण केले ते आता यशस्वी का होत नाहीत? ज्या ‘हिंदू दहशतवादा’ची भाषा केली, ‘तोंडात राम आणि पोटात नथुराम’ असे ज्यांना म्हटले, त्याचे परिणाम काय झाले? या प्रश्नांविषयी कठोर आत्मचिंतनाची आवश्यकता आहे. ते त्यांनी करावे, असे सूचविण्याचा मला काही अधिकार नाही, पण उगाच असे वाटले की, एका वयोवृद्ध आणि राजकारण धुरंधर मराठी नेत्याला असे दिवस पाहायला लागू नयेत.

@@AUTHORINFO_V1@@