रो‘हित’ आधी का नाही?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019
Total Views |




२००७साली झालेल्या पहिल्यावहिल्या टी
-२० विश्वचषकामध्ये रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जवळपास १२ वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या या विश्वविख्यात खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरावण्यास वर्षानुवर्षे प्रतीक्षा करायला लागली, हे दुर्दैवच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने उत्कृष्ट कामगिरी करत आपणही कसोटी क्रिकेट खेळू शकत असल्याचे सिद्ध केले
. २००७ साली झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषकामध्ये रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जवळपास १२ वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या या विश्वविख्यात खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरावण्यास वर्षानुवर्षे प्रतीक्षा करायला लागली, हे दुर्दैवच म्हटल्यास वावगे ठरणार नाही. क्रिकेटविश्वात रोहितच्या नावावर विविध विक्रम असून एकदिवसीय (वन-डे) आणि टी-२० सामन्यांमधील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून जगभर त्याची ख्याती आहे. विविध विक्रम नावावर असणार्‍या या खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये वेळीच संधी मिळणे, हे अपेक्षित होते. मात्र तसे झालेच नाही. प्रख्यात खेळाडू असतानाही रोहितला कसोटीत पदार्पण करण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागली. २०१३ साली म्हणजे जवळपास सहा वर्षांनंतर रोहितला प्रथम कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१३ साली वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्यावेळीही दोन सामन्यांत शतकी खेळी करत रोहितने कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता आपल्यात असल्याचे सिद्ध केले होते.



उत्तम फॉर्मात असतानाही रोहितला पुढे कसोटी क्रिकेटचे सामने खेळण्याची संधी न मिळाल्याने कसोटीविश्वात तो स्थिरावू शकला नाही
. अधूनमधून संधी दिली जायची, मात्र पूर्णवेळ कसोेटी क्रिकेटचा खेळाडू म्हणून त्याला अपेक्षित संधीच चालून आली नाही. एकदिवसीय आणि टी-२० मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणार्‍या विख्यात रोहितला कसोटी सामन्यांत कधी पाचव्या तर कधी सहाव्या स्थानावर खेळण्याची संधी मिळायची. त्यामुळे द्विशतकी खेळी साकारण्याची संधी त्याला कधीही मिळाली नाही. त्याने शतक ठोकताच डाव घोषित होण्याची वेळ यायची. परिणामी, तो कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरावूच शकला नाही. द. आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याने याचे सोने केले. त्यामुळे साहजिकच प्रश्न उरतो, तो फक्त रो‘हित’चे हित आधी का केले नाही?



‘हिटमॅन‘समोरील आव्हाने!


रोहित गुरुनाथ शर्मा
. या ३२ वर्षीय मुंबईकर खेळाडूची सध्या संपूर्ण जगभरात ख्याती आहे. ‘भारताचा सलामीवीर फलंदाज’ म्हणून रोहितला सर्वत्र ओळखले जाते. जुलै महिन्यात पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरल्यानंतर रोहितच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली. विश्वचषकात सर्वाधिक शतकी खेळी साकारण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक २६४ धावांची खेळी साकारणे, तीन द्विशतके, एका खेळीत सर्वाधिक षट्कार आदी विक्रमांचाही तो बादशाह असून एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांचा ‘स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा रोहित सध्या कसोटी क्रिकेटही त्याच जोमाने गाजवतो आहे.



रांची येथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान रोहितने संकटसमयी भारतीय संघाला तारून नेण्याचे काम तर केलेच
, मात्र द्विशतकी खेळी साकारत त्याने भारताला अशा मजबूत स्थितीत नेऊन ठेवले की, प्रतिस्पर्धी संघाने दोनदा फलंदाजी केली तरी त्यांना ती धावसंख्या गाठणे शक्य होत नाही. रोहितच्या या फलंदाजीनंतर कसोटी क्रिकेटमधील त्याचे स्थान पक्के झाल्याचे मानण्यात येत असले तरी रोहितसमोर आव्हान असणार आहे, ते परदेशांतील धरतीवर उत्कृष्ट खेळी साकारण्याचे. कारण, परदेशांतील उसळत्या खेळपट्ट्यांवर उत्कृष्ट कामगिरी करण्यात भारतीय संघ गेल्या काही वर्षांत अपयशी ठरला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर कसोटी क्रिकेटमध्ये भारताला पराभवांचा सामना करावा लागला आहे.



अनेक बडे आणि नामांकित खेळाडू संघात असतानाही मालिका पराभवाची नामुष्की भारतीय संघावर ओढवलेली आहे
. त्यामुळे परदेशी धर्तीवर धावा काढणे हे भारतीय खेळाडूंसमोर नेहमी आव्हानात्मक राहिले आहे. रोहितपुढे आगामी काळात हेच आव्हान असणार आहे. परदेशांतील तेज आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळायला रोहितला नेहमी आवडते. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेल्या मालिकांत रोहित शर्माची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. त्यामुळे रोहित परदेशांतील कसोटी सामन्यांतही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. एकदिवसीय आणि टी-२० प्रमाणे तो कसोटी क्रिकेटमध्येही स्थिरावू शकतो की नाही, हे येणारी वेळच ठरवेल.

-रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@