पश्चिम घाटामधून पालीच्या सहा नव्या प्रजातींचा शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019   
Total Views |


 
 
 

 दिडशे वर्षांनंतर 'द्रविडोगेको' पोटजातीमधील पालींचा शोध


मुंबई ( विशेष प्रतिनिधी) - वन्यजीवांच्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटामधून पालीच्या सहा नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. 'द्रविडोगेको' पोटजातीमधील या सहा नव्या प्रजाती आहेत. आजवर या पोटजातीमधील केवळ एका प्रजीताचा भारतामध्ये अधिवास होता. तिचा शोध देखील ब्रिटिशांनी दिडशे वर्षांपूर्वी लावल्याने या नव्या पालींचा शोध भारतातील उभयसृपशास्त्र संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

 

भारतातील पालींच्या जैवविविधतेत सहा नव्या पालींच्या प्रजातींची भर पडली आहे. 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या पश्चिम घाटामधून या प्रजातींचा शोध लावण्यात उभयसृपशास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. 'द्रविडोगेको' पोटजातीमधील या नव्या प्रजाती आहेत. या पोटजातीमध्ये आजतागायत 'द्रविडोगेको अन्नामलेइन्सिस' या एका प्रजातीचे अस्तित्व होते. ही पाल केवळ पश्चिम घाटात आढळते. तिचा शोध १८७५ साली ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ अर्ल्बट गुन्थर यांनी लावला होता. त्यामुळे या प्रजातीची वैविधता आणि उत्क्रांतीविषयक सखोल संशोधनास उभयसृपशास्त्रांनी सुरुवात केली. या संशोधनादरम्यान त्यांना या सहा प्रजाती आढळून आल्या. या संशोधनाचे वृत्त सोमवारी 'झूटॅक्सा' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले.

 
 
 
 

तामिळनाडू आणि केरळ राज्यात पसरलेल्या पश्चिम घाटामधून या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. त्यांचे नामकरण 'द्रविडोगेको सेप्ट्रिओनिलिस', 'द्रविडोगेको जानकीई' ( केरळातील वनस्पतीशास्त्र डाॅ. जानकी अम्मल यांच्या सन्मानार्थ), 'द्रविडोगेको मेघामलाईन्सिस', 'द्रविडोगेको डग्लसअदम्सीस' ( ब्रिटीश लेखक डग्लस अदम्स यांच्या सन्मानार्थ) आणि 'द्रविडोगेको स्मिथी' ( ब्रिटीश उभयसृपशास्त्रज्ञ माल्क्रोम स्मिथ यांच्या सन्मानार्थ) असे करण्यात आले आहे. हे शोधकार्य बंगळुरू स्थित उभयसृपशास्त्रज्ञ आर. चैतन्य यांनी डाॅ. वरद गिरी, डाॅ. दिपक विरप्पन, डाॅ. अनिरुद्ध दत्त-राॅय, डाॅ. बी.एच.सी.के. मुर्ती आणि डाॅ. प्रविण कारंथ यांच्या सहयोगाने पूर्ण केले आहे. या सहा प्रजातींची चाचणी 'आकारशास्त्र' आणि 'गुणसूत्रा'च्या आधारे करण्यात आली.

 
 

पालीच्या या नव्या सहा प्रजाती निशाचर असून त्या झाडांवर उत्तम प्रकारे चढू शकतात. झाडाच्या खोडावर प्रामुख्याने त्यांचा अधिवास आढळतो. 'द्रविडोगेको' ही भारतातील सर्वात जुन्या पालीची प्रजात आहे. - आर. चैतन्य, उभयसृपशास्त्रज्ञ

@@AUTHORINFO_V1@@