जलभूमीवरचा फिल्ड मार्शल धारातीर्थी पडला!

    21-Oct-2019
Total Views |


 


शनिवारी संध्याकाळी प्रफुल्ल नातू यांचा फोन आला. ''शेषराव जवरे यांचा अपघात झाला आहे, लवकर या.'' मोटरसायकलवर अखंड प्रवास करणारा, जलसंधारणाचे काम करताना समाज जोडण्याचे चिंतन करणारा हा दुर्लभ कार्यकर्ता !


तीन दिवसांपूर्वी पाथर्डीत बैठक झाली. दोन तासांच्या अवघ्या सूचनेवरून शेषराव यांनी जलसंधारणाचे काम असलेल्या काही गावातून कार्यकर्ते गोळा केले. विषय होता निवडणुकीच्या निमित्ताने समाजात जातीजातींमधील संघर्षातून समाजातील वीण उसवू न देण्याचा. त्याच कामासाठी ते बाहेर पडले होते. भगवान आव्हाड यांनी गाडी घेऊन येण्याच्या आत बाहेर पडले आणि घात झाला. अपघात मोठा होता. शंकेची पाल चुकचुकत होती आणि सकाळी आज जे ऐकायचे नव्हते तेच ऐकायला मिळाले. नातूसाहेब फोनवरच रडायला लागले आणि २०१२ ते २०१९ हा काळ डोळ्यासमोर उभा राहिला. २०१२ च्या प्रचंड दुष्काळात जनकल्याण समितीने निर्णय घेतला, पाण्याच्या टाक्या वाटपाचा. त्या निमित्ताने शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यांवर लक्ष द्यायचे ठरले. पण तात्पुरत्या कामापेक्षा कायमस्वरूपी दुष्काळनिर्मूलन केले पाहिजे, हा विचार करणाऱ्यांमध्ये शेषराव एक होते. शिरपूर पॅटर्नचा बोलबाला सुरू होता. या तालुक्यामधील काही जणांनी प्रत्यक्ष जाऊन शिरपूर पॅटर्नचे काम पाहायचे ठरले. शेषराव त्यात आघाडीवर! प्रकल्पभेटीची सहल झाली. येताना सर्वांनी आपल्या गावात असे काही करता येईल का? असा विचार करायचा हे ठरले आणि मग शेषराव यांनी जणू ध्यासच घेतला. पाठीशी नंदकिशोर नातू खंबीरपणे उभे राहिले. शेषराव यांना जणू जीवनध्येयच मिळाले. वास्तविक, शेषराव हे नोकरी निमित्ताने गुजरातमध्ये गेले. संघाच्या संपर्कात आले. मनमोहन वैद्य यांच्या परीसस्पर्शाने प्रचारक होण्याची प्रेरणा मिळाली. थांबल्यानंतर डोक्यातले विषय गावाकडे जायचे आणि काहीतरी आपल्या समाजबांधवांसाठी करायचे, हे स्वप्न घेऊन ते गावाकडे परतले. वडगाव येथे वसतिगृहाचा प्रयत्न, नंतर थोडा राजकीय सहभाग त्यातून उपसरपंच आणि संघाचे काम यात धडपड चालू असली तरी मन समाधानी नव्हते पण शिरपूर पॅटर्नची सुरुवात झाली आणि शेषराव यांना जणू जीवन लक्ष्य मिळाले.

 

सुरुवातीला एकनाथ वाडी हा प्रयोग ठरला. गावातील काही लोकांनी विरोध केला, पण शेषराव ठाम होते. संवादकौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी सगळे अडथळे दूर करत बंधारे पूर्ण करत प्रकल्प दृष्टिपथात आणला. त्यासाठी शासकीय परवानग्या, प्रकल्प अहवाल हे सर्व पूर्ण केले आणि जेव्हा एकनाथ वाडीचा बंधारा पाणी साठा होऊन वाहता झाला, तेव्हा शेषराव यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध वाहता झाला. मग दैत्य नांदूर फुंदे, टाकळी दैत्य नांदूर मोहज देवढे, कोरड गाव. एकामागून एक गावे शेषराव सर करत गेले आणि बघता बघता हा देवदुर्लभ कार्यकर्ता जणू दुष्काळी पाथर्डी तालुक्याचा जलदूत बनून गेला. त्यासाठी शेषराव यांनी काय केले नाही? प्रसंगी कामाच्या ठिकाणी रात्री मुक्काम करावा लागला तर जेसीबीवरच अंग टाकून दिले. कधी स्मशानात झोपावे लागले, कधी कुणी अंगावर धावून आले तरी पण शांत राहत त्याला समजावले. न समजणाऱ्याला गावाच्या हितासाठी दोन हात करण्याचे धाडस दाखवले. रात्र- रात्र जागले. शेकडो किलोमीटर उपाशी रोज मोटरसायकलवर फिरले. नगरला येऊन हिशोब पूर्ण करण्यासाठी पाठ एक करून बसले. स्वतःचा संसार हा जणू देवावर सोपवून ते मोकळे झाले होते. सात वर्षात शेवगाव पाथर्डी तालुक्यातील ३२ गावे त्यांनी सुजलाम सुफलाम केली, पण पाणी आणून उपयोग नाही, संस्कार पण महत्त्वाचे आहेत, हे जाणून संघ, शाखा शिबिरे, शिवशक्ती संगम या सगळ्यात अत्यंत उत्साहाने भाग घेत राहिले. संघ शिक्षा वर्गात भोजन विभागात काम करण्याची आज्ञा मिळाल्यावर ती प्रमाण मानून नगरच्या वर्गात हजर झाले.

 

जनकल्याण समितीचे नाव ग्रामीण भागात सर्वदूर पसरवण्यात या दोन तालुक्यात पोहोचण्यात शेषराव यशस्वी झाले. या सगळ्या कामात सुरेश काजवे, मनोहर देशपांडे, अनिल मोहिते या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग आणि प्राज् इंडस्ट्री, भारत फोर्ज अशा कंपन्या यांचे सहकार्य त्यांनी मिळवले. त्यांच्या डोळ्यात समाधान होते. कामात ते व्यग्र होते आणि रोज नवनवीन स्वप्ने बघत होते. त्यांच्या स्वप्नाळू बोलण्यातील अव्यवहारीपण दाखवून दिले की, थोडे खट्टू व्हायचे. पण संघनिष्ठा त्यांना परत कार्यप्रवण करायची. संघ आणि संघाचे प्रचारक यांच्याबद्दल अत्यंत भावनिक होऊन ते बोलायचे. संघ आणि संघाचे कार्य माहीत नसलेले अनेक जण संघावर टीका करत राहतात पण शेषराव यांच्यासारखे कार्यकर्ते हेच त्या टीकाटिप्पणीला दिलेले कृती रूप उत्तर असते. काही दिवसांपूर्वी शेकटे या गावात दोन मुलांना पोहता येत नव्हते म्हणून तलावात बुडून गेली. तेव्हापासून रोज गावापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या त्या गावात मुलांना पोहायला शिकवायला ते जात होते. स्वतःचा पोहण्याचा व्यायाम ते तिथे करायचे. मुळा धरणाचे पाणी पाथर्डीत कसे आणता येईल, याचे ते स्वप्न बघत होते. एकाच वेळेस समाजजीवनातील अनेक पैलूंकडे सजगपणे, डोळसपणे शेषराव बघत होते. शेषराव हे गंगा पृथ्वीवर आणणारे भगीरथ शेषराव होते. शेषराव युद्धभूमीवरील मार्शलसारखे जल संधारणाच्या कामातील मार्शलच होते. त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली. जलसंधारण झाल्यावर त्या गावात ग्रामविकासाच्या कुठल्या कामांनी सुरुवात करता येईल, यावर आमची अनेक वेळा चर्चा होत असे. त्यांनी उभ्या केलेल्या या प्रकल्पयुक्त गावात पुढील टप्पे सुरू करणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. देव या संकल्पनेवर विश्वास ठेवला तर असे वाटायला लागते की, स्वर्गातील गंगा पण कदाचित आटायला लागली, तेथेही पाण्याची कमतरता भासू लागली म्हणून आमच्या मधल्या या भगीरथ पुरुषाला देवाने बोलावून घेतले की काय? पण शेषराव यांच्या पवित्र आत्म्याला आपण अशी ग्वाही देवू की जर तसे असेल तर शेषराव तुम्ही तेथेही कार्यरत राहणारच आहात. काळजी करू नका, तुम्ही स्वीकारलेले पृथ्वीलोकातील काम तुमच्यामुळे तयार झालेले अनेक शेषराव करत राहतील!

 

- रवींद्र मुळे.

९४२२२२१५७०