विकास आणि हिंदुत्वासाठी मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2019
Total Views |



देवेंद्र फडणवीसांच्या रूपात महाराष्ट्राला एक सर्वसमावेशक, उमदे, कुशल, विकासाभिमुख, हिंदूंच्या भावविश्वाला तडा जाऊ न देणारे, जातीयवादाला बळी न पडणारे, प्रसंग कोणताही असो, त्यात धीरोदात्तपणे राज्यशकट हाकणारे, जबाबदारीचे भान असणारे नेतृत्व मिळाल्याचे दिसते. आता आजच्या मतदानातून राज्यातील जनता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर कशी मोहोर उमटवते, आहे तितक्याच जागांवर विजयी करते की, त्यापेक्षाही अधिक हे लवकरच कळेल.


लोकशाहीत जनतेला आपले सार्वभौमत्त्व दाखविण्याचा हुकमी मार्ग म्हणजे मतदान
. आज महाराष्ट्रासह हरियाणात विधानसभेसाठी आणि काही ठिकाणी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. तत्पूर्वी २०१४ साली महाराष्ट्र आणि हरियाणातही मतदारांनी ‘परिवर्तन तर होणारच’चा नारा देत काँग्रेसच्या वर्षानुवर्षांच्या भ्रष्ट राजवटींना उलथवून टाकले. महाराष्ट्राचा विचार करता मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या १५ वर्षांच्या मस्तवाल कारभाराचा कलंक मिटवत भाजपकडे सत्ता सोपवली. राज्याच्या कोणत्याही मूलभूत प्रश्नांची सोडवणूक न करणार्‍या, शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या, प्रकल्प-योजना लटकावून ठेवणार्‍या, जातीयवादाच्या माध्यमातून समाजात भांडणे लावणार्‍या आणि केवळ स्वतःच्याच कित्येक पिढ्यांची सोय करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी अद्दल घडवली व विकासाला मत दिले. नंतर मतदारांनी ज्या इच्छा, आशा, आकांक्षा आणि अपेक्षेने भाजपच्या ताब्यात सत्ता दिली, त्या सर्वांचीच पूर्तता करण्यासाठी मागील पाच वर्षे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अहोरात्र कष्ट घेतले.

 

विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या फडणवीसांनी विकासालाच आपल्या सरकारचा कृतीकार्यक्रम निश्चित करून नवनवीन कल्पक योजना, प्रकल्प आणि संकल्पनांची अंमलबजावणी केली. शेतकर्‍यांच्या जीवाभावाचा प्रश्न असलेल्या सिंचनाकडे प्राधान्याने लक्ष देत देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ ही अभिनव योजना राबवली. सोबतच मागेल त्याला शेततळे, रखडलेल्या छोट्या-मध्यम बंधारे व धरणांची पूर्णता, शेतकरी आठवडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून गाव-खेड्यात, कुठल्याही भागातील शेतकर्‍यांच्या समस्यांवर समाधानकारक तोडगा काढला. आघाडी सरकारच्या काळात पाण्याअभावी उन्हाने, दुष्काळाने होरपळलेल्या भुईवर हिरवळ फुलवत शेतकर्‍यांच्या पाठीशी प्रत्यक्ष कामातून खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले.

 

तसेच रस्ते, महामार्ग, मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू करत, आधीच्या लांबलेल्या कामांना गती देत आपले ध्येय राज्यविकासाचेच असल्याचे सांगितले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मॅग्नेटिक महाराष्ट्र, बुलेट ट्रेन, आता नव्याने होऊ घातलेला मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीतून या प्रत्येकातून मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांपासून कामगार, उद्योजक, गुंतवणूकदार, सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांचेच हित पाहिले. सोबतच राज्यातील कायदा-व्यवस्थाही देवेंद्र फडणवीस यांच्या या पाच वर्षांच्या पहिल्याच कार्यकाळात चांगली राहिली. माओवादी, नक्षलवादी, गुंड-गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबले गेले आणि त्यामुळेच कुठेही भीषण हिंसाचाराच्या, घातपाताच्या मोठ्या घटना घडल्याचे दिसले नाही.

 

विकासाबरोबरच भाजपने हिंदुत्वाच्या विषयातही उत्तम काम केले. आघाडी सरकारच्या काळात मालेगाव बॉम्बस्फोटावरून हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवादाचा बागुलबुवा उभा करण्यात आला. हिंदू समाजाचे खच्चीकरण व्हावे, मानभंग व्हावा आणि त्यांनी कायम न्यूनगंड-अपराधगंड बाळगत जिणे जगावे, असा डाव तेव्हाच्या सत्ताधार्‍यांचा होता. तसेच कोणताही पुरावा नसताना हिंदुत्ववादी कार्यकर्ते, संस्था आणि संघटनांना त्रास देण्याचा, गजाआड टाकण्याचा, दंगलीचे वा इतरही बिनबुडाचे पण गंभीर आरोप करण्याचा सिलसिला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने चालवला. हा सगळाच प्रकार हिंदूद्वेषातून आणि मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळून एकगठ्ठा मतदान मिळवण्यासाठीच केलेला होता.

 

तसेच हिंदू समाजातील जाती-जातींत झगडे निर्माण होतील, एका समाजापुढे दुसरा समाज उभा ठाकेल, समाजात दुही माजेल, यासाठी त्यांनी कार्यक्रम आखले. तशा संस्था आणि संघटनांना पाठिंबा देत समाजस्वास्थ्य बिघडवण्यासाठी हातभार लावला. परंतु, देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यानंतर हिंदू समाजाला जाणूनबुजून लक्ष्य करण्याचे उद्योग बंद झाले. समाज एकसंध कसा राहिल, समरसता कशी निर्माण होईल, यासाठी फडणवीसांनी काम केले. गोवंश हत्याबंदीसारखा कायदा लागू करून राज्यघटनेने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन केले. हिंदूहिताच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचे जिवंत उदाहरण म्हणजे पंढरपूरचे वारकरी भवन. विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता, पायपीट करत येणार्‍या वारकर्‍यांना पंढरपुरात, चंद्रभागेच्या वाळवंटात वर्षानुवर्षे चिखला-मातीत राहावे लागे. वारकर्‍यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारकडे पंढरपुरातील अडीअडचणी दूर करण्याची आणि निवारा बांधून देण्याची मागणी सातत्याने केली. पण, हिंदूंसाठी काहीही करायचे नाही, असा पण केलेल्यांनी त्याकडे पाहिलेही नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपल्या पहिल्याच कार्यकाळात लाखो वारकर्‍यांसाठी केवळ आषाढी वारीसाठीच नव्हे तर कायमस्वरूपी छत देणारे वारकरी भवन उभारले.

 

देवेंद्र फडणवीस अशाप्रकारे विकासाचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन वाटचाल करत असतानाच मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि कोरेगाव-भिमा येथील हिंसाचाराचे प्रकरण उद्भवले. भाजप सरकारला पाण्यात पाहणार्‍या विघ्नसंतोषींनी मात्र इथेही आपला जातीयवादी अजेंडा घुसविण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाच्या वा दंगलीच्या प्रश्नावरून राज्यात अराजक, अशांतता निर्माण व्हावी, सरकार अस्थिर आणि त्याचे धनी फडणवीस (त्यांच्या जातीमुळे) व्हावे, असा त्यांचा कावा होता. पण देवेंद्र फडणवीसांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने, नेतृत्व क्षमतेने विरोधकांना प्रत्येकवेळी शह दिला व राज्यातले वातावरण बिघडवू दिले नाही. चारीबाजूंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर टपलेल्यांना त्यांची जागा दाखवून दिली. गेल्या वर्षभरात तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना नामोहरमच केले. विधानसभा असो वा विधान परिषद कुठेही मुद्द्यांच्या आधारे विरोधकांना सरकारला कोंडीत पकडता आले नाही.

 

विरोधी पक्षनेत्यांसह कितीतरी नेत्यांनी फडणवीस सरकार व भाजपवर विश्वास दाखवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. म्हणूनच आताच्या निवडणुकीत, प्रचारात समोर कोणीही विरोधात उभा नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. म्हणजेच देवेंद्र फडणवीसांच्या रूपात महाराष्ट्राला एक सर्वसमावेशक, उमदे, कुशल, विकासाभिमुख, हिंदूंच्या भावविश्वाला तडा जाऊ न देणारे, जातीयवादाला बळी न पडणारे, प्रसंग कोणताही असो, त्यात धीरोदात्तपणे राज्यशकट हाकणारे, जबाबदारीचे भान असणारे नेतृत्व मिळाल्याचे दिसते. आता आजच्या मतदानातून राज्यातील जनता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर कशी मोहोर उमटवते, आहे तितक्याच जागांवर विजयी करते की, त्यापेक्षाही अधिक हे लवकरच कळेल. मात्र, समोर उमेदवार कोणीही असो, प्रत्येक मतदाराने नोटाचा वापर न करता आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडलेच पाहिजे. कारण, त्यातूनच तर चांगल्या राज्यकर्त्यांना काम करण्याचे बळ, हुरूप आणि संधी मिळत असते. म्हणूनच राज्यात सर्वच गोष्टी व्यवस्थित, नीटनेटक्या असायला हव्या असतील तर प्रत्येकाने आपले घटनादत्त कर्तव्य पार पाडणे अगत्याचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@