समाजसुखासाठी लेखन करणारे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |
 



अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साहित्य विश्वातील मान्यताप्राप्त 'स्नेहांजली पुरस्कार' मराठी सारस्वतातील एका लेखक व लेखिकेस प्रदान केला जातो. यंदाचे हे पुरस्काराचे १८वे वर्ष आहे. यावर्षीचा पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक व समीक्षक अनिल बळेल यांना देण्यात येणार आहे. मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृह, पुणे-३० येथे आयोजित सोहळ्यात बळेल यांना सन्मानित करण्यात येईल. त्या निमित्ताने सुप्रसिद्ध लेखक प्रा. श्याम भुर्के यांनी लिहिलेला अनिल बळेल यांच्या साहित्यिक कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...

 

सुप्रसिद्ध साहित्यिक अनिल वसंत बळेल यांचा जन्म बडोदा येथे १ सप्टेंबर, १९४४ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण भावे हायस्कूल, पुणे येथे झाले. या शाळेत अनेक साहित्यिक विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने हजेरी लावत. त्यांच्या विचारांनी अनिल बळेल प्रभावित झाले. शाळेत असतानाच ते कथालेखन करू लागले. हे लेखन प्रामुख्याने मुलांसाठी होते. पुढे 'मॅजेस्टिक'चे केशवराव कोठावळे यांची भेट झाली. त्यांनी साहित्यिक लिखाणाबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणेने अनिल यांचे 'साहित्यविश्व' हेच मुख्य लेखनसूत्र बनले. निरनिराळ्या वृत्तपत्रांतून सातत्याने त्यांनी स्तंभलेखन केले.

 

नव्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली. सा. 'सकाळ'मधील त्यांचे पुस्तक परीक्षण लेखन लोकप्रिय झाले. साहित्य पत्रकारिता यामध्ये लिखाण चालू असतानाच त्यांनी पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामध्ये त्यांचा द्वितीय क्रमांक आला. उपजीविकेचे साधन म्हणून दूरध्वनी खात्यात नोकरी केली आणि सोबतच लिखाणाचा छंदही जोपासला. 'रसिक साहित्य'ने साहित्य सूचीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला होता. त्या साहित्य सूचीच्या संपादनाचे सुरुवातीचे २० वर्षे कार्य अनिल बळेल यांनी केले. पुण्यातील सांस्कृतिक जीवनात 'मॅजेस्टिक' गप्पांना फार महत्त्वाचे स्थान होते. त्या गप्पांच्या कार्यक्रमात ते सक्रिय राहिले. त्यामुळे साहित्य क्षेत्राची जाण वृद्धिंगत झाली. 'ग्रंथाली' पुणे केंद्राचा प्रारंभ आणि संचालन हे त्यांनी अत्यंत आवडीने केले.आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या साहित्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडला. सतत कार्यरत राहणे, इतरांना मदत करण्यात आनंद मानणे हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे त्यांचे लिखाण सकारात्मक वृत्तीने केलेले आहे.

 

लहान मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी चरित्रलेखन केले. पंडित महादेवशास्त्री जोशी, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधीजी, यशवंतराव चव्हाण, ग. दि. माडगूळकर, ना. सी. फडके ही चरित्रे अनिल बळेल यांनी खासकरून मुलांसाठी लिहिली. क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर याची कारकिर्द लिहून मुलांना प्रेरणा दिली. मोठी माणसं बालपणी कशी होती, कशी वागत होती हे सांगणारे त्यांचे पुस्तक 'पाळण्यातले पाय' हे मुलांना मोठं होण्याची प्रेरणा देणारे आहे. सुट्टीत मुलांचा वेळ सदुपयोगी पडावा यासाठी त्यांनी 'गोष्टी दिवाळीच्या सुट्टीसाठी' हे पुस्तक लिहिले. 'महानगरी सफर' या त्यांच्या पुस्तकाने बालसाहित्यात मोलाची भर टाकली आहे. लहान मुलांना वाचनात गुंगवून ठेवणे हे अतिशय कठीण काम असते. ते काम अनिल बळेल यांनी केले. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होत आहेत. 'उमलती फुले' हे त्यांचे पुस्तकही तितकेच प्रेरणादायी आहे.

 

'वाचेल तो वाचेल' तसेच 'वाचता न येणारा अशिक्षित' आणि 'वाचता येत असूनही न वाचणारा सुशिक्षित यात फारसा फरक नसतो' असे सुविचार वाचले की, माणूस वाचनासाठी प्रवृत्त होतो. पण, आता काय वाचावे याचे मार्गदर्शन हवे असते. ती वाट दाखविण्याचे काम बळेल यांच्या 'पुस्तक गाथा,' 'पुस्तक प्रदेश' या ग्रंथांनी केले आहे ‘Knowledge is power’ हे वाचून बळेल यांनी माहितीचा खजिना देणारी 'महाराष्ट्रातील वक्ते,' 'दिवाळी अंक नाबाद शंभर' 'मराठी साहित्य संमेलन शतकाकडे' ही पुस्तके लिहिली. मराठी साहित्यविश्वाचा फेरफटका मारावयाचा असल्यास त्यांचे 'लिहिता लिहिता' हे पुस्तक जरूर वाचावे.

 

चरित्रलेखन आणि व्यक्तिचित्रे उभी करणे हे बळेलांचे आवडते क्षेत्र. 'विसाव्या शतकातील गाजलेले दहा वृत्तपत्र संपादक,' 'आठवणीतील मराठी साहित्यविश्व' सिनेदिग्दर्शक राजा परांजपे यांचे चरित्र 'राजा माणूस', संगीतकार सुधीर फडके याचे चरित्र 'बाबुजी' कवयित्री शांता शेळके यांचे चरित्र 'शान्ताबाई' ही अनिल बळेल लिखित चरित्रे अत्यंत वाचनीय आहेत.मराठीमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेल्या पहिल्या तीन साहित्यकांवर, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्यावर लिहिलेले 'ज्ञानपीठ त्रिमूर्ती' हे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे. 'त्या चौघी' या त्यांच्या पुस्तकामध्ये शांता शेळके, दुर्गा भागवत, विजया राजाध्यक्ष आणि कुसुमावती यांची चरित्रे आहेत. हे सारे लेखन विपुल तर आहेच. त्याशिवाय ते दर्जेदार आहे. त्यामुळे अनिल बळेल यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

 

'स्वराज्य साप्ताहिक' कथास्पर्धेत त्यांना पारितोषिक प्राप्त झाले. स. मा. गर्गे पुरस्कार, ललित मासिक पुरस्कार, मनीषा पिंगळे पुरस्कार, 'महानगर मुंबई' पुरस्कार, असे मानाचे पुरस्कार मिळाले. गुहागर येथे कोमसाप साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष विजया राजाध्यक्ष यांच्या हस्ते 'केशव भिकाजी ढवळे' हा पुरस्कार प्राप्त झाला. आता 'स्नेहल प्रकाशन'तर्फे दि. ५ ऑक्टोबर रोजी पुण्यात त्यांना, सुप्रसिद्ध प्रकाशिका अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साहित्य विश्वातील मानाचा समजला जाणारा 'स्नेहांजली पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे. समाजसुखाचा ध्यास घेतलेल्या या लेखकाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सदिच्छा आणि शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@