हिंदू धर्मविचार आणि गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |



महात्मा गांधीजींचे हिंदू धर्माविषयीचे विचार काय होते, त्यांची मते काय होती, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. सोबतच गांधीजींचा हिंदू धर्मविचार व संकल्पनांपर्यंतचा प्रवास कसा झाला, स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घेणारे गांधी सर्वधर्मसमभावाची संकल्पनाही सांगत, पण ती हिंदू जीवन दर्शनाच्या आधारेच, पण कशी, हाही एक मुद्दा आहेच. अशा महात्मा गांधीजींच्या धर्मविषयक विविध मुद्द्यांना स्पर्श करणारा हा लेख....



आमच्या पौर्वात्य संस्कृतीचे अंतिम ध्येय गांधींच्या रूपाने अवतरले आहे
. भविष्यकाळी जगाला नवे वळण लावण्याच्या कार्यात गांधी यांजकडे महत्त्वाची भूमिका येणार आहे. यज्ञाला स्वतः मनुष्यरूप घ्यावेसे वाटले आणि तो गांधींच्या रूपाने अवतरला. - गुरुवर्य डॉ. रवींद्रनाथ टागोर

 

महात्मा गांधींचे यज्ञरूपी जीवनकार्य स्वातंत्र्यलढ्यातील देशकार्यासाठी समर्पित तसेच हिंदू धर्माचरण व हिंदू धर्मसंकल्पनेतून देशहित साधणारे होते. सनातनी हिंदू धर्मातील मोध समाजात मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ साली गुजरातमधील पोरबंदर (सुदामापुरी) शहरात झाला. वडील करमचंद गांधी (कबा गांधी) कुटुंबप्रिय, सत्यप्रिय, धीट, उदार व रागीट होते. वडील हिंदू मोध समाजातील असले तरी त्यांचे धार्मिक शिक्षण फारसे नव्हते, पण देवळात जाण्याची सवय असल्याने व तिथे होत असलेल्या धार्मिक कथा ऐकून त्यांना धर्मज्ञान प्राप्त झाले होते. आई पुतळीबाई वैष्णव समाजातील व अत्यंत साध्वी स्त्री तसेच भाविक होत्या, त्या पूजापाठ केल्याशिवाय जेवत नसत तसेच त्या नित्य हवेलीत (गुजरातीत देऊळ म्हणजे हवेली) जात असत. त्यांची छाप महात्मा गांधींच्या आध्यात्मिक जीवनावर पडलेली जाणवते. अत्यंत धार्मिक वातावरण लहानपणापासूनच लाभल्याचा मोठा प्रभाव त्यांच्या आयुष्यात दिसून येतो.

अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, करुणा या तत्त्वांचे बीज बालवयातच त्यांच्या मनात पेरले गेले होते. आई पुतळीबाई अत्यंत धार्मिक असल्याने गांधींवर श्रावणबाळ, हरिश्चंद्र यांच्या पौराणिक कथांचा गहिरा प्रभाव बालवयात झाला होता. त्यांच्या आत्मचरित्रात ते लिहितात की, "मी अनेकवेळा हरिश्चंद्रासारखा स्वत:शी वागलो असेल." महात्मा गांधींना 'महात्मा' (महान आत्मा) अशी उपाधी सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी दिली, तसेच अनेक भारतीय त्यांना प्रेमाने 'बापू' म्हणत. सुभाषचंद्र बोस यांनी इ. स. १९४४ साली महात्मा गांधींना 'राष्ट्रपिता' असे संबोधले होते. सविनय सत्याग्रहाचे जनक असलेले महात्मा गांधी यांचा जन्मदिन 'अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो.

महात्मा गांधी लोकोत्तर पुरुष असतानाही त्यांनी आपले मन लोकांसमोर, जगासमोर उघडे करून ठेवले होते. त्यांनी आपल्या जीवनात धर्माला प्रथम स्थान दिले व त्यानंतर राजकरणाला. राजकारणाच्या गढूळ प्रवाहाला पवित्र गंगेचे स्वरूप म्हणून पाहणारे महात्मा गांधी हे एकमेव महान, आध्यात्मिक पुरुष होते. गांधीसारखे सामान्य व्यक्तिमत्त्व ज्यांनी ईश्वराविषयी गंभीर चिंतन करत तसेच आपल्या वर्तनातून दैवी हेतू प्रतिबिंबीत करत ईश्वरी मार्गदर्शनानुसार अधिक धैर्याने आचरण करत असामान्यत्व प्राप्त केल्याचे प्रतीत होते.अशा महान आत्म्याचे जीवन अंध:कार जगात ही प्रकाशमय दीपस्तंभासारखे कार्य करत असल्याचे आपल्याला दिसते.

गांधी स्वत: म्हणतात, "माझ्या राजकीय क्षेत्रात असल्याने जर माझी धार्मिकता ज्याला मी सेवामय जीवन समजतो, ते जर प्रभावित होणार असेल तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. लहानपणापासून मी भारतातील महान योगी-पुरुषांचे जीवन अभ्यासले आहे. त्याने मला आनंद प्राप्त झाला आहे. जो ईश्वर भक्तिरत असतो तो परमेश्वराच्या माध्यमातून सर्व जगावर प्रेम करतो, असे मी मानतो." सदैव ईश्वरभक्तीत लीन असलेल्या गांधींनी ईश्वरेच्छेने समाजसेवा व देशसेवा करण्याचे व्रत अंगीकारले होते. गांधींच्या मते, ईश्वर म्हणजे सत्य होय. जीवनाच्या जीवंत नियमाचा म्हणजेच नियम आणि नियम निर्माण करणार्यांचा अर्थ असलेल्या कोणत्याही नावाने तुम्ही ईश्वराला हाक मारू शकता, असे गांधी ईश्वराबद्दल सांगतात. ईश्वर स्वत: नियमही आहे आणि नियम-निर्माताही आहे.त्यामुळे कोणीतरी ईश्वराला निर्माण करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मनुष्य धरण बांधू शकतो, पण नदी निर्माण करू शकत नाही.ईश्वराने मनुष्याला निर्माण केले आहे.

मनुष्याने ईश्वराला नाही, असे गांधी स्पष्ट सांगतात. ईश्वर साकार नाही. ईश्वर एक विचार आहे. ईश्वरीय नियम व ईश्वर हे एकच आहेत. ईश्वर स्वत:च एक नियम आहे. त्यामुळे त्याच्या नियमाचा नियमभंग तो स्वत: कधीही करू शकत नाही. गांधींचे ईश्वराविषयीचे विचार हिंदू धर्मगुरूंप्रमाणे असल्याचे यावरून दिसून येते. आध्यात्मिक जगावर लक्ष केंद्रित केल्यास आपण अशा जगाची निर्मिती करू शकू, जिथे ना गरिबी असेल, ना बेकारी असेल, तसेच रक्तपात आणि युद्धही नसेल, असे म. गांधी खात्रीशीर सांगतात. "गांधीजी हे त्या पैगंबरांपैकी आहेत, ज्यांच्यात आत्म्याचे सौंदर्य, आत्म्याचे शील आणि निर्भय व्यक्तीचे हास्य यांचे दर्शन होते," असे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् गांधींबद्दल आवर्जून सांगतात.

"आजच्या जीवनातून 'संत' हा शब्द काढून टाकला पाहिजे. हा शब्द इतका पवित्र आहे की कोणाशीही या शब्दाला असेच जोडणे बरोबर नाही," असे सांगत गांधीजी स्वतःला 'संत' म्हणण्यांविरोधात ठाम भूमिका मांडतात. तसेच विरक्त वृत्ती धारण केलेल्या साधक महापुरुषाप्रमाणे व्यक्त होतात आणि आपण केवळ सत्यशोधक असल्याचे सांगत वैज्ञानिकासारखे शाश्वत सत्याविषयी प्रयोग करत असल्याचे प्रतिपादन ते करतात. सत्य आणि अहिंसेपेक्षा कुठलेही वेगळे धोरण गांधींनी कधीही अवलंबिले नव्हते. देशाच्या आणि धर्माच्या उद्धाराकरिता सत्य आणि अहिंसेशिवाय पर्याय नाही, असे गांधी नमूद करतात. "अहिंसा आणि सत्य हे एकच आहेत. सत्याची कास सोडल्यास अहिंसेचे रहस्य उलगडता येणार नाही," असा विश्वास गांधीजी व्यक्त करतात.

"सत्य हे ईश्वराच्या प्रार्थनेतून प्राप्त होते आणि त्यासाठी श्रद्धेची गरज असते म्हणून मी देवाकडे मला श्रद्धा दे, अशी प्रार्थना करतो आणि अंतत: ईश्वरच सत्य आहे, हे तत्त्व मला जाणवते आणि माझ्या शरीराचे कण-कण ईश्वरव्याप्त आहे. याचा मला अनुभव येतो." यावरून गांधीजींची ईश्वरनिष्ठा आणि त्यातून धार्मिक उन्नती व देशहित साधण्याचा त्यांचा ध्यास इथे प्रकट होतो. गांधींचा सत्य आणि अहिंसेवर जसा विश्वास होता, तसेच न्यायावरही त्यांचा अदम्य विश्वास होता. "न्यायाचाच अंतिम विजय होतो, या विश्वासाने मला प्रेरणा मिळते," असे गांधी सांगतात.

सत्यशोधक वृत्ती असलेले गांधी म्हणतात, "मी सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला आहे. सत्य पूर्ण प्राप्त होणे म्हणजेच साक्षात्कार होणे आहे असे मी मानतो आणि जोपर्यंत ते प्राप्त होत नाही तोपर्यंत अपूर्णत्वाचे दु:ख राहतं.गांधीजी स्वत:ला संन्यासी मानत नाहीत." कारण, संन्यास ही फार कठीण गोष्ट आहे असे ते म्हणतात. सहकार्‍यांच्या आणि मित्रांच्या दानशीलतेवर सेवेचे व्रत आचरणारे एक गृहस्थ आहे, असे ते स्वत:ला मानतात.त्यांच्या वेशभूषेवरुन त्यांना संन्यासी समजणार्‍यांना गांधी सांगतात, "माझा पंचा हा माझ्या जीवनाचा स्वाभाविक विकास आहे आणि तो आपोआप आला आहे. त्याकरिता मी कुठलेही विशेष प्रयत्न केले नाहीत. मला संन्यासी म्हणणे चुकीचे आहे, माझे जीवन आदर्शांनी नियंत्रित आहे आणि ते कोणताही सामान्य माणूस करू शकतो.

माझा इंद्रियनिग्रह आणि अहिंसा हे स्वानुभवातून निर्माण झाले आहे." गांधीजींची ही साधक वृत्ती, स्वत:च्या आदर्शांचे कठोर पालन तसेच ऋषितुल्य जीवनशैली देशहितासाठी आणि जनसेवेसाठी अनुकरणीय व हितकारक होती, हे इथे लक्षात घ्यावे लागेल. अहंकाराचा त्याग करणारे ते एक योगी पुरुष होते. "धर्म, राजकारण, अर्थशास्त्र यातून मी आणि माझे वगळल्यास पृथ्वीवर स्वर्ग येईल," असे त्यांचे म्हणणे होते. म. गांधी हिंदू धर्मीय, आध्यात्मवादी महापुरुष म्हणून त्यांचे आचरण, विचार, मूल्ये, तत्वे ही श्रेष्ठ संतासारखीच होती आणि असे असतानाही त्यांचे स्वत:ला संत न समजण्याचा, महात्मा न मानण्याचा, अवतारी पुरुष न मानण्याचा साधेपणा त्याबाबत त्यांची आग्रही भूमिका आणि सामान्यातले असामान्यत्व त्यांच्या महान व्यक्तित्वातून प्रकट होते.

. एम. फॉस्टर यांनी म. गांधींना 'शतकातील महानतम पुरुष' संबोधले होते. तसेचअर्नोल्ड टॉयन्बीला म. गांधीजी हे गौतम बुद्धानंतरचे सर्वश्रेष्ठ भारतीय होते, असे वाटत होते तर येशू ख्रिस्तानंतरचे सर्वात श्रेष्ठ पुरुष हे म. गांधी होते, असे डॉ. जे. एच. होम्स यांनी गांधींचे मूल्यांकन केले होते. 'जे का रंजले, गांजले' या उक्तीप्रमाणे म. गांधींनी गरिबांची, दीनांची सेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांची अविरत सेवा केली तसेच गरिबांची सेवा म्हणजेच मोक्षप्राप्ती आहे, असे त्यांचे मत होते. गरिबांमध्ये आणि स्वत:मध्ये कोणतेही अंतर म. गांधींनी कधीही ठेवले नव्हते, तसेच ते त्यांना आप्तेष्ट समजत असत. देशाची सेवा तसेच मानवतेची निरंतर सेवा हाच माझ्यासाठी मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, असे ते म्हणत असत व त्यानुसार मानवतेच्या असीम प्रेमातून ते गरिबांचे कैवारी झाले. ईश्वरावर तसेच संपूर्ण मानवजातीवर विश्वास असलेले म. गांधी म्हणत आमचे शरीर वेगवेगळे असले तरी आत्मा एकच आहे.

प्रयोगशील वृत्तीमुळे त्यांनी संपूर्ण मानवतेला त्यांच्या प्रयोगात भागीदार केले होते आणि तसे करणे हेच त्यांचे जीवन होते. म. गांधी स्वत:ला "व्यावहारिक स्वप्नद्रष्टा" म्हणवतात. कारण, त्यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न वास्तवात आणण्यावर त्यांचा विश्वास होता. म. गांधी स्खलनशील स्वभावाचे होते हे त्यांच्या स्वत:ला सामान्य समजण्यावरून दिसून येते. विनयशील स्वभाव असलेले गांधी आपणही चुकू शकतो, हा स्वाभाविक मनुष्यभाव प्रांजळपणे व्यक्त करतात तसेच ईश्वर आणि त्याच्या दयाळूपणावर अविचल श्रद्धा असल्यामुळे सत्य आणि प्रेमाची ओढही ते व्यक्त करतात. कुठल्याही व्यक्तीचा वापर त्यांनी राष्ट्राच्या हानीकरिता कधीही न केल्याचेही ते स्पष्ट करतात. स्वत:च्या हिमालयाएवढ्या चुका केल्याचे मान्य करत कुठल्याही व्यक्ती, राष्ट्र किंवा प्राणिमात्रांविरुद्ध कधीही शत्रुत्वाची भावना न ठेवल्याचेही ते मान्य करतात.

गांधीचे चारित्र्य इतके पूर्णावस्थेला पोहोचले आहे की, अशा प्रकारची माणसे क्वचितच आपल्या नजरेस पडतात. किंबहुना, हजार दोन हजार वर्षात एखादाच प्राणी मानवकोटीत जन्म घेतो. - रे. जॉन हेन्स होम्स

"आपल्याकडून काही पापे घडल्याचे म. गांधी मान्य करतात, तसेच त्याचे ओझे न वावरता आपला ईश्वराकडचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे स्वत:कडून झालेली पापे आपण मान्य करत आहोत," असे गांधी म्हणतात. तसेच अशी पापे न घडण्यासाठी आपला साधेपणा, उपवास आणि प्रार्थना यातून परमेश्वराचरणी लीन होण्याचा विश्वास आपल्याला या गोष्टीतून प्राप्त होतो, असेही म. गांधी म्हणतात. जगातील प्रत्येक दीन व्यक्ती सुखी असेल तरच मी सुखी असेन, असे सांगत म. गांधींचा 'सर्वे भवन्तु सुखिन:' हा मानवतावाद आपल्यास दिसून येतो तसेच जगातील सर्व थरातील, जातीतील लोकांशी त्यांचा एकात्मभाव, आपलेपणाही जाणवतो. कुठल्याही व्यक्तीशी भेद करून वागल्यास आपल्याला ईश्वरास त्याचे कारण द्यावे लागेल, अशी स्पष्टोक्ती तसेच ईश्वराप्रति भययुक्त आदरभाव, म. गांधी व्यक्त करतात. मनुष्यजात ही ईश्वरनिर्मित आहे त्यामुळे कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नाही, तसेच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुण-दोषांसकट आपण स्वीकारले पाहिजे, असे गांधींचे मत होते.विरोधकांनाही आपलेसे करणारे म. गांधी हे एक असे राष्ट्रपुरुष तसेच गीतेचे उपासक होते ज्यांनी कोणाशीही मतभेद असले तरीही त्यांच्याशी प्रेमपूर्वक व्यवहार केला होता. इतकंच काय ब्रिटिशनीती आणि प्रणालीचा विरोध करूनही हजारो-लाखो स्त्री-पुरुषांनी म. गांधींचा आदर तसेच त्यांच्याविषयी असीम प्रेमभाव नेहमीच व्यक्त केला होता. म. गांधी याचे श्रेय गीतेतील सिद्धांताला देतात तसेच त्यांना हा अहिंसेचा विजयच वाटतो.

. गांधींचे जितके अनुयायी आहेत तितके जगाच्या पाठीवर आजपर्यंत इतिहासात एकाही व्यक्तीला मिळाले नाहीत. आत्मिक शक्तीवाचून कुठलीही दुसरी शक्ती गांधी मानीत नाहीत, यातच त्यांचे महत्त्व आहे. जग जडवादाने होरपळले गेले आहे व त्याला आध्यात्मिक क्रांतीची तीव्र उत्कंठा लागून राहिली आहे. एका एशियाटिकाने ही उत्कंठा तृप्त करण्यास पुढे यावे याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो.

- ओसाका मेनिची (जपानी दैनिक)

. गांधी स्वत:ला 'महात्मा' मानत नसत ते इतरांसारखेच स्वत:ला ईश्वरी अंश मानायचे. "महात्मा या पदवीमुळे मला सतत वेदना झाल्या आहेत," असे म. गांधी म्हणतात. तसेच "असा एकही क्षण नाही की या पदवीमुळे मी सुखावलो असेन," अशी खंतही म. गांधी व्यक्त करतात. थोर राष्ट्रपुरुषांचे हेच मोठेपण आपल्याला यातून दिसून येते. म. गांधी महापुरुषही होते तसेच ते सत्पुरुषही होते. एका टीकाकाराच्या म्हणण्यानुसार, हा अतिशय दुर्लभ योग आहे, पण त्याचे महत्त्व लोकांना बहुधा कळत नाही. म. गांधींच्या कार्यामुळे त्यांना महात्मा म्हटले जात होते, पण गांधी स्वत: याउलट सांगतात, माझी 'महात्मा' ही पदवी व्यर्थ आहे. कारण, माझे कार्य अत्यल्प आहे. माझी वास्तविक बाजू सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्य व त्यांचा आग्रह तसेच त्याचे चिरंतन महत्त्व आहे.

. गांधींना महात्मापणापेक्षा सत्य अधिक प्रिय होते. महात्मापण हे त्यांना सतत एखाद्या ओझ्यासारखे वाटायचे. म. गांधींना त्यांचे अस्तित्व आणि सीमा या महात्मापणाच्या पलीकडच्या वाटत होत्या, तसेच त्यांना 'महात्मा' म्हणणे हे अत्याचारीपणाचे वाटायचे. सत्य, अहिंसा या तत्त्वांमुळे महात्मापणाच्या अत्याचारापासून मी बचावलो, असे ते सांगतात. म. गांधींना कोणी ईश्वरी अवतार म्हणणे पटत नव्हते. काहीजण त्यांना भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानत होते, पण तसे करणे म्हणजे ईश्वराची निंदा केल्यासारखे आहे, असे गांधीजी म्हणत. स्वत:ला ते एक सामान्य कार्यकर्ते मानत होते. कार्य करण्यासाठी आपले जीवन आहे व त्यामध्ये कुठल्या व्यक्तीस अवाजवी अवतार समजून महत्व देऊन त्याचे पोवाडे गायले तर ते कार्य सिद्धीस जाणार नाही, असे गांधीजींचे मत होते.

"सत्य आणि अहिंसेखेरीज कुठलीही अमानवीय शक्ती माझ्यात नाही तसेच मीही सर्वांसारखी हाडामांसाची साधारण व्यक्ती आहे," असे गांधी म्हणत. तसेच त्यांना सर्वांनी एक साधारण व सामान्य कार्य करणारी व्यक्ती मानावे, असेही त्यांचे मत होते. सत्यशोधक असलेले म. गांधी स्वत: प्रेषित असल्याचेही अमान्य करतात. सत्यप्राप्तीसाठी संकल्पबद्ध असलेले गांधी ईश्वरसाक्षात्कारासाठी कुठलाही त्याग मोठा नाही, असे मानत. सनातन हिंदू धर्मीय असलेले म. गांधी उपवास आणि प्रार्थना यांचा अवलंब करणारे होते, तसेच कुठल्याही संकटाचे निवारण उपवास आणि प्रार्थना करण्यानेच शक्य होत, असे ते मानायचे. "जग पाहण्यासाठी जसे डोळ्यांचे महत्त्व आहे, तसेच आंतरिक शुद्धीसाठी उपवास महत्त्वाचा आहे," असे म. गांधी म्हणत. कुठल्यातरी उच्चतम शक्तीद्वारे आपण उपवास करतो, तसेच त्याच उच्चतम शक्तीद्वारे आपण उपवास सहन करतो, असेही गांधी म्हणत. उपवासाने शरीर, मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण होते, तसेच उपवासाने देहाला होणारा त्रास हा आत्म्याला स्वतंत्र करतो.

प्रार्थनेशिवाय खरा उपवास होऊ शकत नाही आणि उपवासाशिवाय प्रार्थना होऊ शकत नाही, असेही गांधीजी म्हणत. प्रार्थना आणि उपवासातून शुभ हेतू साध्य करता येतो, असे गांधीजी मानत होते. षड्रिपूंवर नियंत्रण असलेल्या एखाद्या सिद्धहस्त योगी पुरुषांप्रमाणे ईश्वरनिष्ठ म. गांधींचे आचरण होते, तसेच ईश्वरकृपा प्राप्त होण्यावरही त्यांचा विश्वास होता. इंद्रियांवर ताबा केवळ उपवासाने शक्य आहे असे व त्यातूनच ईश्वरप्राप्ती होऊ शकते, असे गांधी म्हणायचे याशिवाय शारीरिक व्याधी बद्धकोष्ठता, रक्ताल्पता, अपचन हेही टाळता येते, असे शारीरिक आरोग्याविषयी त्यांचे मत होते. म. गांधींचा देशबांधवांवर अतिशय प्रभाव होता आणि हा प्रभाव कुठल्याही लौकिक शक्तीशिवाय तसेच अस्त्र-शस्त्रांच्या शक्तीशिवाय होता, हे आश्चर्य आहे. भारताचे महाराज्यपाल लॉर्ड हॅलिफॉक्स यांच्या मतानुसार, म. गांधींचे चरित्र हे श्रेष्ठ होते, तसेच त्यांचे आचरणही अनुकरणीय होते. त्यांच्या चरित्रानेच त्यांनी अनेक पिढ्यांच्या विचारांवर प्रभाव निर्माण केला होता.

प्रा. एल. डब्ल्यु. ग्रेनस्टेड म्हणतात, "म. गांधींची महती त्यांनी साध्य केलेल्या गोष्टीत नव्हती, तर त्यांच्या उत्तुंग अशा चारित्र्यात होती." डॉ. फ्रान्सिस नेल्सन म्हणतात, "म. गांधी हे कर्मात डायोजिनिस, नम्रपणात सेंट फ्रान्सिस आणि बुद्धिमत्तेत सॉक्रेटिस होते." म. गांधींनी सत्याचा दिव्य संदेश मानवजातीला दिला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, सत्य हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असू शकते. एखाद्या व्यक्तीसाठी असलेले सत्य हे दुसर्‍या व्यक्तीसाठी असत्य असू शकते. कारण, प्रत्येक व्यक्तीची मानसिकता आणि मानसिक विकास हा भिन्न असतो. ज्या व्यक्तीत विनम्रता नसेल त्याला सत्याचा शोध लागू शकत नाही. सत्य, अहिंसा आणि प्रेम जिथे आहे, तिथेच सर्वकाही ठीक आहे.

सत्याची अनेक रुपे आहेत, असे ते सांगत. सत्य हे सापेक्ष सत्य नसून ते संपूर्ण सत्य, चिरंतन सत्य आहे. कारण, सत्यच ईश्वर आहे. सत्याच्या अनेक रूपांप्रमाणे ईश्वराचीही अनेक रूपे आहेत. म. गांधींनी सदैव ईश्वराची भक्ती सत्याच्या रूपात केली, पण असे असले तरी सत्यशोधक वृत्तीने त्यांचा सत्याचा शोध निरंतर सुरूच होता, तसेच सत्य जाणून घेण्याचे त्यांचे अनेक प्रयोगही सुरू होते.सत्य हे विशाल वृक्षासारखे, धुलिकणापेक्षाही विनम्र आहे, असे ते म्हणायचे. सामान्य लोकांना जो ईश्वर आणि त्याची श्रद्धा माहीत आहे, तीच श्रद्धा आणि तोच ईश्वर म. गांधींनाही माहित होता. ईश्वराच्या संकल्पनेशिवाय आणि श्रद्धेशिवाय गांधींना सर्वकाही गौण वाटायचे. श्रद्धा हाच ईश्वरी अनुभव आहे, असे गांधींना वाटायचे. शरीराचे कुठलेही अवयव काढले तर मी मरणार नाही, पण ईश्वरावरील श्रद्धा नाहीशी झाली तर मी नष्ट होईल, असे ईश्वरनिष्ठ गांधींना वाटायचे. ईश्वरभक्तीतून आत्मसाक्षात्कार होतो आणि ईश्वराचे अस्तित्व जाणवते, असे गांधींना वाटत होते. गांधींचे प्रत्येक कार्य हे ईश्वर समर्पित होते.

आध्यात्मिक संस्कार लाभलेल्या म. गांधींच्या अंगी सत्य, अहिंसा यासोबत निर्भयता हा गुणही होता. जिथे भय आहे तिथे धर्म असू शकत नाही, असे गांधींना वाटायचे. गीतेचे अभ्यासक व उपासक असलेले गांधी म्हणतात, "गीतेच्या सोळाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने निर्भयता हा गुण सांगितला आहे. गीतेचे जे साधक तसेच पाठक आहेत त्यांनी निर्भयता अंगी धारण केली पाहिजे," असे ते म्हणत असत. निर्भयतेतून ईश्वरापर्यंत पोहोचता येते जे निर्भय आहेत तेच वीर आहेत आणि जे शस्त्रास्त्रांना महत्त्व देतात ते भित्रे आहेत, असे गांधींचे मत होते. निर्भयता म्हणजे सर्व बाबतीतल्या भयांपासून मुक्ती होय. त्यात आजार, शारीरिक इजा, मृत्यूची भीती, नातलगचा मृत्यू इ.चा समावेश होतो. आंतरिक शत्रूंवर विजय मिळवल्यास भय नाहीसे होते, असे गांधी म्हणत असत.

कुठल्याही भीतीला कसलाच आधार नाही 'तेन त्यक्तेन भुंजिथा' या तत्त्वानुसार सांसारिक वस्तूचा त्याग करत त्यांचा उपभोग घ्या, हा संदेश धर्माने दिला असून धन, कुटुंब, शरीर तसेच राहतील त्याबद्दलची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, तसेच त्या गोष्टींचा त्याग अनासक्ती भावाने करणे, हेच ध्येय असले पाहिजे व या सर्व गोष्टी ईश्वराच्या आहेत. त्यामुळे भीती असण्याचे कारणच नाही, असे म. गांधी सांगतात. वस्तूंचा उपभोग अनासक्त वृत्तीने घेतला पाहिजे हा उपनिषदातील दिव्य संदेश गांधी इथे सांगतात.

श्रद्धेची महती सांगताना गांधी म्हणतात की, "श्रद्धा एखाद्या पर्वतालाही हलवू शकते, समुद्र ओलांडू शकते. श्रद्धा म्हणजे आणखी काही नसून आपल्यातील वास करत असलेल्या परमेश्वराची जिवंत आणि स्पष्ट जाणीव आहे. मनुष्याला शारीरिक व्याधी असली तरी तो आध्यात्मिक दृष्टीने निरोगी असतो, तसेच तो भौतिक दृष्टीने गरीब असेल तरी आध्यात्मिक दृष्टीने संपन्न असतो. ईश्वराची भक्ती, ईश्वरावर श्रद्धा, प्रार्थना यावर व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती अवलंबून असते, असे म. गांधींचे म्हणणे होते आणि त्याद्वारे राष्ट्राची उन्नती साधता येणे शक्य होते, असेही त्यांचे मत होते. ईश्वराबद्दल आणि धर्माबद्दल श्रद्धा असणे महत्वाचे आहे, असे म. गांधी सांगत.

सनातनी हिंदू असलेले म. गांधी म्हणतात-

मी वेद, उपनिषद तसेच हिंदू धर्मग्रंथ व हिंदू धर्मग्रंथाच्या नावाने प्रचलित सर्व साहित्यावर विश्वास ठेवतो तसेच अवतार आणि पुनर्जन्म यावरही माझा विश्वास आहे. माझा वर्णाश्रम धर्मावरही विश्वास आहे, जो माझ्या विचारानुसार विशुद्ध वैदिक आहे. पण त्याच्या सध्याच्या प्रचलित तसेच स्थूल रूपावर माझा विश्वास नाही. माझा गोरक्षा आणि त्याच्या सद्यस्थितीतील स्थूल रूपापेक्षा अधिक व्यापक रूपावर विश्वास आहे. माझा मूर्तिपूजेवर अविश्वास नाही.

धर्माचा अर्थ सांगताना गांधीजी म्हणतात, "हिंदू धर्माबद्दल मला सगळ्या धर्मापेक्षा अधिक आदर वाटत असला तरी हिंदू धर्म म्हणजेच धर्म असा त्याचा अर्थ नाही. हिंदू धर्माच्याही पलीकडे जो धर्म आहे जो मानवाचा स्वभावच बदलून टाकतो, जो आपल्या आतील सत्याशी एकरूप करतो आणि सतत पवित्र करतो तो खरा धर्म आहे," असे गांधी म्हणतात. 'धर्माचा इथे औपचारिक अर्थ न घेता, सर्व धर्माच्या मुळाशी जो धर्म आहे आणि जो आपल्याला निर्मात्याचे दर्शन घडवतो तो धर्म,' असे म. गांधींना अपेक्षित धर्माची व्याख्या आहे. स्वत:च्या धर्माबद्दल सांगताना गांधीजी म्हणतात की, माझ्या धर्माला कोणत्याही भौगोलिक सीमा नाहीत. माझा धर्म तुरुंगासारखा नाही. यात ईश्वरनिर्मित सर्व स्तरातील माणसांचा समावेश आहे. देशापेक्षाही माझ्या धर्मावर मी अधिक प्रेम करतो त्यामुळे मी आधी हिंदू आहे आणि नंतर राष्ट्रभक्त आहे. माझ्या धर्माचे आणि राष्ट्राचे हित एकच आहे.

धर्म म्हणजे एकाच बिंदूकडे जाणारे विविध मार्ग आहेत, जगात एकच धर्म आहे किंवा असेल या धारणेशी गांधीजी सहमत नव्हते. सर्व धर्मांचा आत्मा एकच असून त्याची रूपे अनेक आहेत व सर्व धर्म कमी-अधिक प्रमाणात खरे आहेत, असा विश्वास गांधीजी धर्माबद्दल व्यक्त करतात. वेद, कुराण, बायबल हे ईश्वराचे अपूर्ण शब्द आहेत आणि ते मानवाला समजणे अशक्य आहे, असे गांधी म्हणत. देशातील तसेच जगातील विविध धर्मीय लोकांनी एकत्र येऊन अधिक चांगले बनले पाहिजे, असा उपदेश गांधीजी देतात. प्रत्येक धर्माची परीक्षा धार्मिक दृष्टिकोनातून व्हावी तसेच भारतात हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन यांपैकी कुठलातरी एकच धर्म असावा असे नसून सर्व धर्मांनी परस्पर सहकार्याने धार्मिक कार्य केले पाहिजे, असे गांधींना वाटत होते.

धार्मिक वृत्तीच्या म. गांधींनी अनेक धार्मिक अध्ययनानंतर सर्व धर्म खरे आहेत, असा निष्कर्ष काढला होता तसेच सर्व धर्मांवर हिंदू धर्माएवढेच मी प्रेम करतो, असे समानतेच्या भावनेने स्पष्ट ही केले होते. ईश्वरावर श्रद्धा ही सर्व धर्मांची आधारशीला आहे, तसेच जगातील सर्व धर्मातील मूलभूत सत्यावर माझा विश्वास आहे, असे म. गांधी म्हणत. सर्व धर्मातील पवित्र ग्रंथ त्यांच्या अनुयायांच्या दृष्टिकोनातून वाचले तर सर्व धर्म मूलत: एकच असल्याचे तसेच परस्पर पूरक असल्याचे आढळून येईल, असे गांधीजी म्हणतात. धर्म लोकांना एक दुसर्‍यांपासून वेगळे करण्याकरिता नाही तर तो त्यांना जोडण्याकरिता आहे, असे गांधींचे धर्माबद्दलचे विचार होते.

हिंदू धर्मग्रंथाच्या बाबतीतही म. गांधींचे अगदी समर्पक असे विचार होते. वेदांना ते दिव्य अपौरुषेय मानत असत. पावित्र्य, सत्य, निष्कपटता, शुचिता, विनम्रता, साधेपणा, क्षमा, दिव्यत्व हे सर्व गुण वेदातून प्रकट होतात, असे ते मानत. केवळ वेदच नव्हे तर कुराण, बायबल आणि जेंदअवेस्ता हे ग्रंथ ही वेदांप्रमाणेच ईश्वरी प्रेरणेने प्रकट झाले आहेत, असा गांधींना विश्वास होता. 'सर्मन ऑफ द माऊंट' आणि 'भगवद्गीता' यात गांधींना कोणतेही अंतर वाटत नव्हते. माझा हिंदू धर्म हा कोणत्याही अन्य धर्मीयांना वगळणारा नाही, असे गांधीजी स्पष्ट सांगतात. जगातील सर्व पैगंबरांच्या पूजेला यात स्थान आहे. हिंदू धर्म प्रत्येक व्यक्तीला आपल्या श्रद्धेप्रमाणे देवाची आराधना करण्यास सांगतो. यामुळे सर्व धर्मांबरोबर याचे सह-अस्तित्व आहे, असे गांधी म्हणतात.

हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे की, तो सर्व धर्माला एक समजतो मग त्याला कोणी 'अल्ला' म्हणा किंवा कोणी 'गॉड' म्हणा. माझे हिंदुत्व सांप्रदायिक नसून त्यात मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध या धर्मांचाही समावेश होतो, असे म. गांधींचे हिंदू धर्माविषयीचे सर्वसमावेशक धोरण आपल्याला दिसून येते.महात्मा गांधींनी आपल्या संपूर्ण जीवनात हिंदू धर्मतत्त्वांचे, आध्यात्माचे तंतोतंत पालन केले होतेच तसेच हिंदू धर्मविचारांची मांडणीही हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे सर्वसमावेशक आहे, हेही म. गांधींच्या आचरणातून आणि विचारातून त्यांनी स्पष्ट केले होते, हे यावरून दिसून येते.

- किरण गोटीमुकूल

८९७५९४५५६६

@@AUTHORINFO_V1@@