द्वैपायन सरोवर (भाग-2)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |




"संजया
, सत्वर जा आणि माझा निरोप माझ्या मातापित्यांना सांग. आता मला शांती हवी आहे. या सरोवराच्या तळाशी राहून मला माझं हे शरीर थंड करू दे. कोणीही पाहण्यापूर्वी मला सरोवरात प्रवेश करू दे.”



त्याच्या अंगाचा दाह होतो आहे
. तो शांत करण्यासाठी काही काळ तो या सरोवराच्या बुडाशी राहणार आहे. संजया, तू त्यांना सांग, दुर्योधनाला आता जगायची पण इच्छा नाही. त्यांना माझा प्रणाम सांग. त्यांना दिलेल्या दुःखाबद्दल मी त्यांची क्षमा मागितली आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करतात व मला नक्की क्षमा करतील. माझ्या मातेला गांधारीला सांग की, तिच्यासारख्या महान स्त्रीचा पुत्र होण्याची माझी योग्यताच नाही! तिच्या चरणांवरती डोके ठेवून मी तिची क्षमा मागतो आहे. तिला सांग की, या पुढचे माझे सर्व जन्म तिच्याच उदरी व्हावेत, अशी माझी प्रार्थना आहे. संजया, सत्वर जा आणि माझा निरोप माझ्या मातापित्यांना सांग. आता मला शांती हवी आहे. या सरोवराच्या तळाशी राहून मला माझं हे शरीर थंड करू दे. कोणीही पाहण्यापूर्वी मला सरोवरात प्रवेश करू दे.”




आपली गदा घेऊन दुर्योधनाने त्या सरोवरात प्रवेश केला. पाणी निश्चल करण्याची विद्या त्याला अवगत होती. दीर्घकाळ पाण्यात कसे राहावे, हे त्याला माहीत होते. दुर्योधन सरोवरात दिसेनासा झाला. मग संजय धृतराष्ट्राकडे जाण्यास निघाला. वाटेत त्याला अश्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा भेटले. त्यांनी विचारले, “संजया, तू अद्याप जीवंत आहेस, ही तर मोठी कृपाच म्हणायची. तू राजा दुर्योधनाला पाहिलेस का कुठे? तो जीवंत आहे की मृत आहे, हे तू सांगू शकशील का?” मग संजयने त्यांना दुर्योधन सरोवराच्या तळाशीआहे, असे सांगितले. हे ऐकून अश्वत्थामाला खूप दुःख झाले. तो म्हणाला, “अरेरे केवढे हे दुर्दैव! आम्ही तिघे अजून जीवंत आहोत, हे दुर्योधनाला ठाऊक दिसत नाही. आम्ही अजूनही त्या पांडवांचा पराभव करू शकतो.”




इकडे पांडवांच्या शिबिरात विजयाचा जल्लोष सुरू होता. आता युधिष्ठिर या सर्व जगाचा राजा झाला होता! परंतु, काही काळानंतर त्यांच्या लक्षात आले की, दुर्योधन कुठेच दिसत नाही. त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना दुर्योधनाचा मृत घोडा पण सापडला. परंतु, दुर्योधन मात्र सापडत नव्हता. दुर्योधन पळून जाण्याचा भेकडपणाच करेल, हे त्यांना पटत नव्हते. जशी संध्याकाळ झाली व अंधार पडला तसे कृप, अश्वत्थामा, कृतवर्मा सरोवरापाशी गेले व हळूच म्हणाले, “महाराज, आम्ही जीवंत आहोत. बाहेर या. आपण चौघे मिळून पांडवांचा पराभव करू. आपण जिंकू व तुम्ही पुन्हा राजे व्हा. जर युद्धात मारले गेलो, तर आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल.” त्यांचे हे वक्तव्य ऐकून दुर्योधनाला खूप आनंद झाला. तो सरोवराच्या आतूनच म्हणाला, “तुम्ही तिघंं जीवंत आहात हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे. मात्र, या क्षणी माझ्या शरीरात लढायचे त्राण नाही. युद्धातल्या जखमांमुळे ते दुबळे झाले आहे. माझे मनही थार्‍यावर नाही. आता तुम्हीपण थकला असाल. आज आपण विश्रांती घेऊया व उद्या त्या पांडवांचा समाचार घेऊया.”




अश्वत्थामा म्हणाला, “उद्यापर्यंत कशाला? आताच आपण पांडवांशी लढू. मी प्रतिज्ञा करतो की, त्या सर्वांना मी यमसदनी पाठवीन. महाराज आपण बाहेर या. आताच युद्ध सुरू करूया.” इतक्यात काही पारधी पाण्याच्या शोधात तिथे आले. त्यांना कळले की, दुर्योधन या सरोवराच्या तळाशी लपून बसला आहे. ही बातमी युधिष्ठिराला दिली तर तो नक्कीच आपल्याला चांगले बक्षिस देईल. म्हणून ते लगबगीने युधिष्ठिराकडे गेेले. तिथे भीम भेटला. त्यांनी ही बातमी भीमाला दिली. भीम त्यांना युधिष्ठिराकडे घेऊन गेला. त्याने पारध्यांना चांगले ईनाम दिले. आपलेकाही मोजके सैनिक घेऊन पांडव ‘द्वैपायन’ सरोवराकडे निघाले. कृष्ण, धृष्टद्युम्न, सात्यकी, द्रौपदीचे पुत्र, युद्धमन्यु, उत्तमौज आणि शिखंडी त्यांच्या सोबत होते. ही बातमी अश्वत्थामा व इतरांना कळली. त्यांनी दुर्योधनाला लपून राहण्यास सांगितले व ते तेथून दुसरीकडे एका वटवृक्षाखाली गेले. त्यांची मने काळजीने पोखरून गेली होती. आता पुढे काय होणार याची चिंता त्यांना लागली !



(क्रमश:)

- सुरेश कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@