‘माकडीचा माळ’ पुन्हा माणुसकीच्या प्रवाहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |


अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघ



अण्णा भाऊ साठेंची ‘माकडीचा माळ’ कादंबरी समाजाच्या जातीय स्तरीकरणाचे विदारक आणि सत्य स्वरूप मांडते. तो ‘माकडीचा माळ’ मुंबईच्या इंडियन ऑईल नगरच्या समोर विस्तारलेला... आजही तेच जगणे. भटक्या-विमुक्त समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विविध जातीसमूह त्या वस्तीत राहतात. पारधी, वडार आणि अशाच प्रकारचे समाजबांधव. हातावरती पोट, पाणी नाही, शौचालय नाही. स्वच्छता म्हणजे काय? अशा या वस्तीत ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ आणि ‘अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघया सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वस्तीचा कायापालट करण्याचे ठरवले. तो कायपालट या वस्तीच्या शेकडो लोकांचा ‘माणूस’ म्हणून जगण्याचा आरंभबिंदूच होता.

 

अण्णा भाऊ साठेंचे आत्मचरित्र वाचले. मोठ्या कष्टाने त्यांनी समाजाला घडवले. काय नाही सोसले त्यांनी? पण, त्यांचा शेवट वाचून काळजाचा थरकाप उडाला. एवढ्या मोठ्या माणसाने आयुष्यभर संघर्ष केला, शेवटही भयंकर जगण्या-मरण्याच्या संघर्षात झाला. अण्णा भाऊ समाजपुरुष होते, त्यांच्यात सगळे सहन करण्याची ताकद होती. पण, मी एक साधा अल्पशिक्षित माणूस, पोटी सहा मुलं. मी आयुष्यभर संघर्षाची मशाल पेटवू शकत नाही. कुठेतरी थांबावेच लागेल. हा विचार मी केला आणि सगळी आंदोलने-मोर्चे थांबवले आणि ‘अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघ’ संस्थेची स्थापना केली,” असे ‘अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघसंस्थेचे अध्यक्ष संतोष थोरात सांगत होते.

 

अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघ’ जिथे काम करतो ती घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील इंडियन ऑईल नगरच्या समोर कशीबशी उभारलेली एक वस्ती. १९९५ सालापासूनची. पण, या वस्तीमध्ये राहणारे सगळेच भटके-विमुक्त समाजातले. त्यांच्याकडे स्वत:च्या ओळखीचा एकही सरकारी कागद नाही वा पुरावा नाही. या वस्तीतील मुलं समोरच्या रस्त्यावर भीक मागायची. कितीतरी वेळा पोलीस या मुलांना पकडून ‘बेगर होम’मध्येही टाकतात. या मुलांना तेथून सोडवणे ही त्रासदायक गोष्ट. वस्तीतील लोक संतोष यांच्याकडे नेहमी ही समस्या घेऊन जात. मुलांना न्यायालयातून सोडवून आणण्यासाठी जामीनदार उभा करावा लागे. या लोकांसाठी जामीनदार कोण देणार? संतोष यांनी विचार केला की, या मुलांचे शाळा शिकण्याचे वय. पण, परिस्थितीमुळे ते शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांनी शाळेत जावे असे त्यांच्या आई-वडिलांच्या खिजगणीतही नाही. किंबहुना, यापेक्षा मुलांना काही वेगळे जगवायचे असते, याची कल्पनाही त्या आई-वडिलांना नाही.

 

दीडशेहून अधिक कुटुंबाचे जगणे असेच. या मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यावेळी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’चे (टीस) अनेक सामाजिक अभ्यासवर्ग अण्णा भाऊ साठेनगरमध्ये चालत. त्यामुळे या शिक्षण संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी संतोष यांच्या अगदी परिचयाचे. संतोषची तळमळ त्यांना माहिती होती. त्यामुळे ‘टीस’च्या प्रा. अमिता भिडे यांनी ‘टीस’च्या माध्यमातून सहकार्य करण्याचे ठरवले. या वस्तीमध्ये साधीशी पत्र्याची एक अभ्यासिका तयार केली. या अभ्यासिकेमध्ये शिकवणार्‍या तीन शिक्षकांना ‘टीस’च्या माध्यमातून मानधान दिले जाऊ लागले. १२० मुलांची अभ्यासिका. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत चालते. विविध वयोगटातील मुलांची बौद्धिक परीक्षा घेतली जाते. त्यानुसार मुलाला कोणत्या इयत्तेत प्रवेश द्यावा, याचा निर्णय घेतला जातो. बरं मुलं जरी आली तरी पालकांचे काय? बहुसंख्य पालकांचे मत असेच की लहान मुलांनी कामाला जाण्यापेक्षा भीक मागितलेली बरी. वारंवार सातत्याने या पालकांना भेटून, चर्चा करून अगदी भावनिक आवाहन करूनच पालक तयार होत. अशा प्रकारे १२० मुलांचे पालक आज आपल्या मुलांना या अभ्यासिकेत पाठवत आहेत.

 

या अभ्यासिकेची पूर्ण जबाबदारी संस्थेची आहे. मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करणे, त्यांना सकारात्मक जीवनाच्या संधी उपलब्ध करून देणे, यासाठी संस्था काम करते. यासाठी संतोष थोरात नवनवीन कल्पना अंमलात आणतात, जेणेकरून या मुलांना विकासाचे सर्व दरवाजे खुले होतील. पण संतोष यांना ही जाणीव का असावी? त्यांना या मुलांसाठी काम करावे असे का वाटले असेल? तर त्याचे उत्तर आहे की, संतोष यांनी या मुलांसारखेच जगणे भोगले आहे. सामाजिक आणि सर्वच स्तरात वंचित असलेल्या समाजामध्ये जन्म घेतलेल्या संतोष यांचे जगणे म्हणजे ‘रहने को घर नहीं, सोने को बिस्तर नही.’ त्यांचे वडील मोलमजुरी करायचे. समाजात देवीच्या नावाने काही पुरुष केस वाढवायचे, जटा व्हायच्या. त्यावेळी याबाबत समाजजागृती सुरू होती. पुरुषांनी केसाच्या जटा करून मागते बनू नये, यासाठी त्यांचे काम सुरू होते.

 

बाबासाहेब गोपले यांच्या विचारजागृतीने केस कापले. पण, तरीही त्यांच्या मनावर एक दबाव कायम राहिला की देवी कोपेल. त्यामुळे वर्षातून एकदा तरी त्यांना निराशेचा झटका येई. कामधंदे न करता महिनोन्महिने ते एका जागी विमनस्क बसून राहत. या काळात घरात एकावेळची भाकरीही मिळेनाशी होई. या काळात लहानगे संतोषही बिगारीच्या कामाला जात. सातवी शिकल्यानंतर परिसरातील संघ स्वयंसेवक शिवाजी सानप यांच्या मार्गदर्शनामुळे मग त्यांनी आठवीला रात्रशाळेत शिक्षण घेतले. पण, दिवसा मोलमजुरी, कष्टाची कामे आणि रात्री पुन्हा शाळेत जाणे हे संतोष यांना जमेनासे झाले. त्यांचे शिक्षण तिथेच थांबले. शिक्षण थांबले, पण आयुष्य थोडेच थांबते? ते कष्टाने का होईना, मरत, झिजत जगायचेच असते. यातूनच मग संतोष यांचा अखंड जीवनसंघर्ष सुरू झाला. तो संघर्ष करत ते होमगार्डमध्ये नोकरीला लागले. पण, नोकरी करताना एकवेळ अशी आली की, त्यांच्या वस्तीतील घरे तोडण्यासाठी होमगार्ड म्हणून त्यांनाच अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत जावे लागले. त्यात त्यांचेही घर होते. संतोष हतबल झाले, काय करावे? नोकरीचा हुकूम पाळावाच लागणार. स्वत:चे घर तोडताना डोळ्यासमोर पाहावे लागले. मात्र, उघड्यावरचा संसार त्यांना स्वस्थ बसू देईना. ते ‘घर बचाओ’ आंदोलनामध्ये सामील झाले.

 

त्या दिवसापासून त्यांचे आणि आंदोलनांचे नाते पक्के झाले. मनात एक विद्रोह भरला गेला. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ विभागणी मनात भरून गेली. त्यातूनच मग ते अगदी २४ तास संघर्ष, आंदोलने करू लागले. सुदैवाने त्यांच्या वस्तीला न्याय मिळाला. त्यांना हक्काची जागा मिळाली. पण, एक वेळ अशी आली की, त्यांचे डोळे उघडले. त्यांना कळले की, सुस्थितीत असलेली लोकं आपल्याला मोर्चा-आंदोलने करण्यास भाग पाडतात. आपण प्राणपणाने तन-मन-धन अर्पून ती आंदोलने करतो. काही संस्था आपल्याला सगळी मदत उभी करतात, पण या लोकांचा उद्देश आपल्यासारख्या गरिबांना घर मिळवून देण्याचा नसतो, तर त्यांचे काही स्वत:चे उद्देश असतात. ज्याबद्दल आपण विचारही करू शकत नाही. यामुळे संतोष यांचे मन पूर्ण बदलले. गोरगरीब, शोषित-वंचितांचे शोषण केवळ समोर शत्रुत्व उभे करूनच लोक करत नाहीत. गोड बोलून, साथ दाखवून, गरिबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:चे पोट भरणारे तर त्याहून भयंकर. संतोष यांनी या आपल्या समाजबांधवांसाठी काम करण्याचा संकल्प केला. समाजाला ग्रासलेल्या अंधश्रद्धा, अज्ञान दूर करायलाच हवे, असे त्यांनी ठरवले.

 

दर रविवारी इथे संस्था पालकांची बैठक घेते. यामध्ये त्यांचे प्रश्न समजून घेतले जातात. त्यांच्या मुलांची प्रगती त्यांना सांगितली जाते. पालकांशी बोलताना मुख्यत: पाणी आणि शौचालयाची मागणी वारंवार केली जाते. संस्था पालक, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी इतर सामाजिक कार्यकर्त्यांचीही मदत घेते. डॉ. राहुल जैनल, राहुल बल्लाळ, प्रवीण रूपवते वगैरे उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्ते आता संतोष यांच्यासोबत या वस्तीसाठी काम करत आहेत. नि:स्वार्थी आणि कसलीही अपेक्षा न ठेवता, हे तरुण कार्यकर्ते तिथे मुलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहेत. विविध प्रशिक्षण देत आहेत. याच वस्तीत पारधी समाजाच्या पाच मुली पहिल्यांदा दहावीच्या परीक्षा देत आहेत. राहुल जैनल यांनी ध्येय ठरवले आहे की, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याएवढी या मुलींकडून परीक्षेची तयारी करून घ्यायची. राहुल बल्लाळही मुलांना दैनंदिन आरोग्य, आयुष्याबाबत प्रशिक्षित करतात, तर प्रवीण रूपवते मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देतात. या वस्तीत संस्थेतर्फे दर सोमवारी ‘सत्यसाई सेवा संस्थे’च्या माध्यमातून नि:शुल्क आरोग्य शिबीर राबवले जाते. संस्थेच्या माध्यमातून वस्तीला नळजोडणीही मिळाली आहे. इतकेच काय, त्रिरत्न प्रेरणा मंडळाच्या दयानंद जाधव आणि सहकार्‍यांच्या मदतीने थोड्याच कालावधीत येथे शौचालयही उभे राहणार आहे.

 

या वस्तीमध्ये गेल्यावर्षी एक बालक कुपोषणाने दगावले. तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून हेसुद्धा संस्थेला कळले की, येथील मुलांमध्ये अशक्तपणा आणि त्याअनुषंगाने येणारे आजार जास्त आहेत. कारण, खाण्यापिण्याची आबाळ. मुलांना दररोज सकस आहार देणे गरजेचे होते. संतोष सांगतात, “संस्थेच्या पदाधिकारी ज्योती साठे यांच्या ओळखीतून ‘रोटी बॅक’ने मदत केली. दररोज २०० मुलांसाठी इथे दुपारी ४ वाजता अन्न पुरवले जाते. गरम आणि सकस अन्न. त्यामुळे मुलांना दररोज अन्न मिळू लागले. मुलांना एकवेळचे जेवण मिळत असल्यामुळे पालकही मुलांना अभ्यासिकेत पाठवायला आता नाखूष नसतात. ‘अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघाच्या माध्यमातून इथे एक अभ्यासिका सुरू झाली आणि त्या अभ्यासिकेने वस्तीचे जगणेच बदलले. ही ताकद या संस्थेत काम करणार्‍या पदाधिकार्‍यांची आहे, संस्थेला मानवी भावनेतून सहकार्य करणार्‍या अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींची आहे. या सर्वांच्या सहकार्याने आज आधुनिक ‘माकडीचा माळ’ माणुसकीच्या प्रवाहात येत आहे.

 



संपर्क - संतोष थोरात (७९७७४८७२७१)

@@AUTHORINFO_V1@@