निर्भीड भ्रमंती करणारी 'दुर्गा'...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |





समाजाने तिच्यावर टाकलेली बंधने झुगारण्याचा उंबरठा तिने केव्हाच ओलांडला
. आज कोणत्याही क्षेत्रात एक पाऊल पुढे असणारी ती खूप स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि जगाचे आव्हान पेलणारी आहे. भ्रमंती करण्यातही स्त्री आज मागे नाही. अशीच भारतभ्रमंतीसाठी एकटीच निघालेली राखी कुलकर्णी आणि तिच्या धैर्याविषयी...



आज आपण अनेक लेखांमधून भारताविषयी
, भारताच्या सौंदर्याविषयी, विविधतेविषयी वाचतो. आजपर्यंतच्या जगभरातील सर्वच लेखकांना भारताचे सौंदर्य कागदावर उतरविण्याचा मोह आवरलेला नाही. अशाच वाचनातून देशाचे हे सौंदर्य अनुभवण्याचा निश्चय बाळगून भारताच्या सफरीवर निघालेली ‘राखी कुलकर्णी’. मूळची कोल्हापूरची असलेली राखी सध्या पुण्यात असते. वकिलीचे शिक्षण घेत तिने आपली प्रवासाची आवडही जपली. अशा या प्रवासवेड्या मुलीचे संपूर्ण जगभर फिरण्याचे स्वप्न आहे. त्याचीच सुरुवात तिने भारतभ्रमंतीने केली. जग आपण बघू तेव्हा बघू पण, आधी आपला देश प्रत्येकानेच एकदा फिरून अनुभवावा, असे आवाहन राखी देशवासीयांना करते. विशेष म्हणजे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीही तिने केली.



राखीने यापूर्वी अनेक ठिकाणे पाहिली होती परंतु
, संपूर्ण देश पाहायचा निश्चय करून तिने पुन्हा तब्बल ३६५ दिवस संपूर्ण भारत पिंजून काढला. फिरायला आवडणे आणि तयारी करून फिरायला निघणे यातील सीमारेषा राखीने खोडून काढली. या संपूर्ण सफरीची तयारी राखीने एक वर्ष आधीपासूनच तयारी सुरू केली होती. यासाठी येणारा संपूर्ण खर्च तिने स्वकमाईतून केला. एका वर्षात तिने दोन ते अडीच लाख रुपये जमविले. आपले वकिलीचे काम सांभाळत संपूर्ण देशाचा अभ्यास तिने केला. कोणत्या राज्याची काय वैशिष्ट्ये आहेत, कोणती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत, त्या राज्यांच्या वेगळेपणाची बारकाईने माहिती घेत पूर्वनियोजन केले. सण, उत्सव, साहित्याचा आढावा घेत स्थानिकांच्या मदतीने आपला प्रवास तिने सुरू केला.



राखीने प्रवासाची सुरुवात कर्नाटकपासून केली
. ती यापूर्वीही कर्नाटकात काही वर्षे वास्तव्यास होती. त्यामुळे तिला कानडी भाषाही येत असल्याने स्थानिकांशी संवाद साधणे सोपे गेले. गुजरातमधेही तिने काही गावांना भेट दिली. राखीच्या प्रवासाचे वेगळेपण म्हणजे ती प्रत्येक राज्यात जाऊन कोणत्याही हॉटेलमध्ये न राहता गावातीलच एखाद्याकडे राहणे पसंत करायची. त्या भागातील शाळांना भेटी देऊन तिने ‘प्लास्टिकमुक्ती’, ‘संरक्षण’ यांसारख्या गोष्टींचे धडे शाळेतील मुलांना दिले. यामुळे एकतर तिला ओळखी वाढवायला मदत झाली आणि त्याचबरोबर गावातील लोकांशी संवाद साधणे सोपे गेले. उत्तरेकडील राज्यांचा अनुभव सांगताना राखीला त्या भागात बर्‍याच सुधारणा होणे गरजेचे असल्याचे जाणवले. एक मुलगी म्हणून फिरत असताना त्या राज्यातील महिलांना तितकेसे कौटुंबिक स्वातंत्र्य नसल्याचे तिला आढळले. सरकारने महिलांसाठी कितीही योजना राबविल्या, हुंडा प्रतिबंधक कायदे राबविले, तरीही पिढीजात चालत आलेल्या परंपरा या खूप जाचक आहेत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही या भागात प्रकर्षाने जाणवला असल्याचे ती सांगते. “देशात असुरक्षित वाटेल, असा एकही वाईट अनुभव मला आला नाही परंतु जितकी बिंदास मी सिक्कीममध्ये फिरू शकत होते, तितकी मी उत्तरेकडील राज्यांमध्ये फिरू शकत नव्हते आणि ते दिसून येत नसले तरी त्याची जाणीव मात्र आपल्याला पावलापावलावर होत होती,” असे राखी सांगते.



काश्मीरविषयी बोलताना ती सांगते
, “काश्मीरमधील कुपवाडा म्हणजे पाकव्याप्त काश्मीर सीमेवरील भारतातील शेवटचे गाव. या ठिकाणी तिने जायचे ठरविले. श्रीनगर, कारगिल, जम्मू यातील बराच भाग तिने यापूर्वी पहिला होता, त्यामुळे यावेळेस तिने कुपवाडा येथे जायचे ठरविले. कुपवाडापासून ३० किलोमीटर अंतरावर असणार्‍या ‘मणी’ या गावातील एका शाळेला राखीने भेट दिली. काश्मीरमधील लोक अगदी शांत, मनमिळावू आणि प्रेमळ असल्याचे ती सांगते. ईशान्य भारतातील निसर्गसौंदर्य पाहून ती म्हणते, “आपण विचारही करू शकत नाही, इतके भरभरून दान निसर्गाने या राज्यांना दिले आहे. भूगोलातही जी राज्ये आपण नीट पाहू शकत नाही, असे वेगळेपण तिला या राज्यांमध्ये पाहायला मिळाले. त्यांचा पेहराव, त्यांची बोलीभाषा, त्यांचे खाद्यपदार्थ यामध्ये खूप वेगळेपण आहे. आसाम - मेघालयात फिरत असताना उंच डोंगरावर एक शाळा आहे. ज्या भागात भविष्यात काम करण्याची इच्छा राखीची आहे. त्या भागातील लोकांना दवाखाना, औषधे या गोष्टी माहीतच नाही. कारण कधीच त्यांना याची गरज भासत नाही. जंगलातील झाडांची, फुलांची माहिती असणारे हे स्थानिक आपल्या भाषेत ‘आयुर्वेदा’च्या बाबतीत मास्टर असल्याचे ती सांगते.



संपूर्ण भारताचे वेगळेपण टिपताना राखी सांगते
, “आंध्र प्रदेशातील गंडीकोटा ही तीव्र उताराची दरी, पश्चिम बंगालमधील बुद्धिस्ट वसाहती, ज्यांचे अजून उत्खननही पूर्ण झालेले नाही, ही सर्व भारताचा इतिहास सांगणारी ठिकाणे आहेत, ज्यांचे संरक्षण झाले पाहिजे. आसाम-मेघालय सीमेवरील ‘चांदुबी’ हे तळे भूकंपामुळे तयार झालेले आहे. पाच डोंगर कोसळल्यामुळे हे मोठे आणि सुंदर तळे निर्माण झाले. याभोवती असणारे जंगल हत्तींसाठी संरक्षित आहे. ‘जंगली हत्ती’ या भागात बघायला मिळतात. फक्त ३० ते ३५ घरं असणार्‍या या गावात ‘राभा’ नावाचा समुदाय राहतो. हत्तीच्या झुंडीच्या झुंडी या तळ्यातील पाण्यात खेळताना पाहायला मिळतात. आपल्याला देशात इतर कुठेही पाहायला मिळणार नाही, अशी वेगवेगळी कमळाची फुले या तळ्यात पाहायला राखीला मिळाली. या संपूर्ण प्रवासाविषयी बोलताना राखी म्हणते,“आपण माध्यमातून अनेक गोष्टी पाहतो, वाचतो आणि त्यावर आपले मत व्यक्त करतो. मग तिथे एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा प्रदेश असेल.



त्या भागात जाऊन तिथले जीवनमान बघितल्याशिवाय आपल्याला वास्तवाची जाणीव होऊ शकत नाही
. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने अगदी भारतभ्रमंती जमली नाही तरी देशातील काही राज्ये नक्की फिरावी.” मला संपूर्ण देशाने भरभरून प्रेम दिले. यातील बरेच लोक अजूनही माझ्या संपर्कात आहेत, आपुलकीने माझी अजूनही चौकशी करत आहेत. देशातील अनेक मुलींना अजूनही बंधनात जगावं लागतं, याचं राखीला खूप दुःख वाटतं. संपूर्ण देशाला प्रदक्षिणा घालून आल्यावर राखी इतकंच सांगते की, “मुलींनी घरातून बाहेर पडलं पाहिजे. स्वतःची ओळख बनवली पाहिजे. त्यांच्यामध्येही ती क्षमता आहे. फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची. अशा ३६५ दिवस भारताच्या सफरीवर एकट्याच गेलेल्या धाडसी राखीला सलाम!”

-गायत्री श्रीगोंदेकर
@@AUTHORINFO_V1@@