या ‘गांधीं’ना कोण समजावणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019   
Total Views |





आज दुर्देवाने याच राष्ट्रपिता
‘गांधी’ यांचे आडनाव लावून मिरवणार्‍यांमध्ये या मूल्यांचा साधा लवलेशही दिसत नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधींप्रमाणेच सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधीही त्याला अपवाद नाहीत.


काल महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशातच नाही, तर जगभरातून त्यांच्या विचारांचे स्मरण, चिंतन झाले. सत्य, अहिंसा, करुणेची त्यांची शिकवण ही सर्वार्थाने शाश्वतच. पण, आज दुर्देवाने याच राष्ट्रपिता ‘गांधी’ यांचे आडनाव लावून मिरवणार्‍यांमध्ये या मूल्यांचा साधा लवलेशही दिसत नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधींप्रमाणेच सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधीही त्याला अपवाद नाहीत. गांधी जयंतीनिमित्ताने आयोजित पदयात्रेच्या कार्यक्रमात बोलताना सोनिया गांधींनी मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. काय तर म्हणे, आज गांधीजी असते, तर असत्याचं राजकारण करणार्‍यांना, सत्तेचा हव्यास असणार्‍यांना पाहून ते दु:खी झाले असते. देशातील पाच वर्षांतील तथाकथित बिकट परिस्थितीवर सोनिया गांधींनी केलेले हे विधानच मुळी सत्य, अहिंसा आणि करुणेच्या मूल्यांना पायदळी तुडवणारे! कारण, सोनिया गांधीच काय, त्यांच्या सासूबाई, पतीने आणि संपूर्ण गांधी परिवाराने कधीही गांधीविचार, गांधींची मूल्ये काँग्रेसमध्ये रुजवली नाहीत. ती वरकरणी फक्त भाषणापुरतीच मर्यादित राहिली. कारण, आजची काँग्रेस ही गांधीविचारांच्या पावलांवर पाऊल टाकणारी, गांधींच्या मूल्यांना शिरसावंद्य मानणारी असती तर आज या पक्षावर इतकी विदारक परिस्थिती ओढवली नसती.



कदाचित
, गांधींनाही तेव्हाच काँग्रेसचे अंधकारमय भविष्य डोळ्यासमोर दिसले असावे; अन्यथा त्याच काँग्रेसला विसर्जित करण्याचा सल्ला या महात्म्याने का दिला असता? इंदिरा गांधींची काँग्रेस गांधीविचार मानणारी असती तर आणीबाणीचा काळा डाग कधीही भारतीय लोकशाहीवर बसला नसता. राजीव गांधींनी गांधीविचारांना सर्वोपरी मानले असते, तर न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवून अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाचे धोरण अवलंबले नसते. सोनिया गांधींनी ‘अंतरात्म्याचा आवाजऐकून पंतप्रधानपदापासून दूर राहून मनमोहन सरकार चालवले नसते आणि राहुल गांधींनी ‘राफेल’वरून असत्याचा असा पोरखेळ मांडला नसता. पण, या गांधींना हे कधी समजलेही नाही आणि उमजणारही नाही. कारण, यांची वाणी आणि करणी कधीही समकक्ष नव्हतीच. त्यामुळे इतरांना ‘गांधी कळले नाहीत’ असा टोला लगावण्यापेक्षा सत्तेत राहून आणि सत्तेबाहेरही गांधींनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललो का, हेच सोनिया गांधींनी आपल्या अंतरात्म्याला विचारावे.




पदयात्रांचा फाफट पसारा

पदयात्रांच्या माध्यमातून गावगाव, शहरशहर महात्मा गांधी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी देशप्रेमाची मशाल धगधगत ठेवली. या यात्रा केवळ सामूहिक संघटनांच्या माध्यम ठरल्या नाहीत, तर या यात्रांमधून जनआक्रोश, जनआकांक्षा आणि जनस्वातंत्र्यच प्रतिबिंबित झालं. पदयात्रांमधून ब्रिटिशांच्या अत्याचाराविरोधी ढवळून निघालेले समाजमन आणि असंख्य स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानातूनच १९४७ साली स्वातंत्र्याचा सूर्य भारतीय क्षितिजावर उगवला. पण, काल पदयात्रांच्या नावाखाली काँग्रेसने देशभर आयोजित केलेल्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न पाहिल्यावर आज गांधीजी असते तर व्यथित झाले असते, असेच खेदाने म्हणावे लागेल. हल्लीच्या काळात सामाजिक उद्देशांसाठी पदयात्रा सध्या तशा नगण्यच. चर्चा असते ती केवळ राजकीय पदयात्रांची. काँग्रेसनेही गांधी जयंतीनिमित्त अशाच पदयात्रांचा देशभरात घाट घातला. पण, या पदयात्रांचा उद्देश गांधीविचारांचा प्रचार-प्रसार कमी आणि मोदी सरकारवर तोफ डागण्याचा अधिक असाच दिसून आला. म्हणा, तेही अगदी स्वाभाविक. विरोध करण्याचे तेवढेच एक नाममात्र निमित्त. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींनीही तेच केले. पण, महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांनी चालणारा पक्ष म्हणून मिरवणार्‍या काँग्रेसने पक्षांतर्गत कुठलाही ठोस कार्यक्रम राबविला नाही.



ज्यांचे पक्षाकडेच इतके दुर्लक्ष, ते १३० कोटी भारतीयांच्या आशाआकांक्षांना काय समजून घेणार? त्यामुळे सर्वार्थाने काँग्रेसने केवळ पदयात्रांचा फाफट पसारा रचून पक्षांतर्गत नवचेतना जागृत करण्याचे एक मोठे निमित्तच गमावले. याउलट मोदींनी सत्तेत आल्यापासूनच गांधींची मूल्ये आणि विचार यांची जनमोहिमांशी सांगड घातली. स्वच्छ भारत अभियान, शौचालयांची निर्मिती, शुद्ध पाण्याचा संकल्प, ग्रामस्वराज्य अभियान, बेटी पढाओ-बेटी बचाओ आणि इतर योजना, धोरणांतून मोदी सरकारने सर्वार्थाने ‘गांधी’ भारतामध्ये पुन्हा रुजवले. हागणदारीमुक्त, प्लास्टिकमुक्त भारताचा त्यांनी संकल्प केला. केवळ वचनातूनच नव्हे, तर आपल्या प्रत्येक कृतीतून मोदींनी ‘महात्मा गांधी’ भारतीयांमध्ये या निमित्ताने जागवले. पण, काँग्रेसच्या पदयात्रांच्या राजकीय फाफट पसार्‍यात गांधीजी, त्यांचे विचार, मूल्ये मात्र शोधूनही सापडली नाहीत.

@@AUTHORINFO_V1@@