फादर, जरा त्यांनाही सांगा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |




फादर बोलत बरोबर असले तरी राँग नंबर डायल करून संवाद साधणार्‍या इसमासारखे ते भासतात
. म्हणूनच त्यांनी ज्यांना त्यांच्या शब्दांची अधिक गरज आहे, तिथे बोलले पाहिजे, त्यांनाही याबद्दल सांगितले पाहिजे.



नुकतीच धाराशिव येथे होऊ घातलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य महामंडळाने निवड केली. फादर दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय निवडीनंतर त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल अनेक स्तरांतून अनेक तर्‍हेच्या चर्चाही होत आहेत. फादर व साहित्य महामंडळावर ज्या शब्दांत टीका होत आहे, त्याबद्दल आम्ही तटस्थ आहोत, पण जसा आम्ही फादरच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करतो, तसाच या निवडीच्या विरोधात मत मांडणार्‍यांच्या अभिव्यक्तीचाही आदर समोरच्या बाजूने व्हायला हवा, असे आम्हाला वाटते. तसेच टीका करणार्‍यांना दूषणे देऊन वा हलकी विशेषणे लावून हिणवण्याचा प्रकारही स्वतःला विचारवंत, बुद्धीवंत, अभ्यासक म्हणविणार्‍यांकडून सुरू आहे, पण हे प्रकार लोकशाहीच्या कुठल्या तत्त्वात बसतात, याचेही उत्तर एकदाचे मिळाले पाहिजे. खरेतर फादर दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय निवडीचे स्वागत करत, त्यांना शुभेच्छा देणारा आणि काही अपेक्षा व्यक्त करणारा अग्रलेखही आम्ही लिहिला होता, त्यामुळे या विषयातली आमची भूमिका स्फटिकासारखी शुभ्र व स्पष्ट आहे. अग्रलेख लिहून तो मागे घेण्याची किंवा त्याच विषयावर वारंवार चौकटी छापण्याची, खुलासे, स्पष्टोक्ती देण्याची आमची सवयही नाही. मात्र, फादर दिब्रिटो यांनी अध्यक्षीय निवडीनंतर तर्‍हेतर्‍हेच्या विषयांवर जी पोपटपंची सुरू केली आणि त्यांच्या मागे ज्या कावळ्यांच्या शाळा गोळा होऊ लागल्या, ते पाहता अभिव्यक्तिस्वातंत्र्याची कौतुके गाणार्‍यांना व फादरनाही काही प्रश्न विचारले पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे.





गेल्या काही दिवसांपासून फादर दिब्रिटो निरनिराळ्या वृत्तपत्रांना मुलाखती देताना दिसत आहेत. अर्थात, संविधानाचे पालन करणार्‍या देशात त्यांना तसे करायला कोणी थांबवूही शकत नाही, कारण ते लोकशाही मूल्यांना धरून असणार नाही. तसेच आम्ही लोकशाही मानणारे असल्याने आणि आणीबाणीत लोकशाही मूल्यांसाठी झगडणार्‍या परंपरांचे पाईक असल्याने फादर दिब्रिटो यांच्या मुलाखतींवर आमचा आक्षेपही नाही. ‘हरित वसई’साठी फादरनी जे काम केले, त्याविषयीदेखील आम्हाला आदरच वाटतो. पण, फादर दिब्रिटो आपल्या मुलाखतीतून सध्या दोन-तीन गोष्टी मोठ्या हिरीरीने मांडत असल्याचे दिसते. त्यातली पहिली म्हणजे धार्मिक सुसंवाद आणि दुसरी म्हणजे धर्म व राजकारणाची सरमिसळ नको ही. वस्तुतः सक्तीने किंवा बळजबरीने किंवा अडल्या-नडल्यांच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन सेवेच्या नावाखाली त्यांच्यापर्यंत पोहोचणारा, धर्मांतरे करणारा धर्म, असा ख्रिश्चन धर्माबद्दल जगाचा आक्षेप असल्याचे दिसते. हे अनेक ऐतिहासिक दस्तावेजांतून त्या त्या काळातल्या समाजधुरिणांनी सप्रमाण लिहूनही ठेवल्याचेही आढळते. लांबचे कशाला, आपल्या गोव्यातल्या पोर्तुगीज ख्रिश्चनांनी तिथल्या हिंदूंवर केलेल्या अन्याय-अत्याचाराची व सक्तीच्या धर्मांतराची साक्ष देणारा इन्क्विझिशन पोल आजही उभा आहे. ख्रिश्चन व अन्य धर्मविचार यांच्यातील विसंवादाचे किंवा संघर्षाचे मुख्य कारण धर्मांतरच आहे. धर्मांतराबरोबरच ख्रिश्चन धर्माबाहेरची मुक्तीची कल्पना नाकारणे, हेही विसंवादाचे कारण आहे. फादर दिब्रिटो यांनी यावरही आपले मतप्रदर्शन करायला हवे. कारण, जोपर्यंत इतर शब्दोच्चाराबरोबर फादर याही विषयांवर परखड भूमिका मांडत नाही, तोपर्यंत त्यांच्या शब्दांना वजन येणार नाही.





राजकारण व धर्माची सरमिसळ अतिशय धोकादायक असल्याचे वक्तव्यही फादर दिब्रिटो यांनी केले. फादर यांच्या विधानापूर्वी एक लक्षात घ्यायला हवे की, धर्म व राजकारणाच्या एकत्रीकरणाबद्दल ते जे आता बोलत आहेत, तो विचार चर्चमधून आलेला नाही. उलट युरोपातील प्रबोधन चळवळीतले विचारवंत, लोकशाहीवादी नेते आणि चर्चमधील संघर्षातून धर्म व राजकारणाच्या फारकतीचा विचार पुढे आलेला आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांची पोपटपंची व त्यांच्यामागे गोळा होणार्‍या कावळ्यांच्या शाळेच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर प्रबोधनकाळातील विचारवंतांना सर्वाधिक संघर्ष चर्चमधील धर्ममार्तंड, धर्मगुरू यांच्याशी व त्यांनी ताब्यात ठेवलेल्या राजसत्तांशीच करावा लागल्याचे दिसते. उल्लेखनीय म्हणजे, संघर्षातून आलेले हे बदलही सहजासहजी अजिबात झालेले नाही, तर त्यासाठी विचारवंतांनी, प्रबोधनकारांनी प्रसंगी रक्त सांडले, यातना सोसल्या, प्राणही गमावले. युरोपात अशाप्रकारच्या संघर्षकथा वाटेल तेवढ्या सापडू शकतील, पण फादर दिब्रिटोंच्या सर्वच तत्त्वचिंतनातली एक ग्यानबाची मेख म्हणजे, ते या सगळ्या कथा हिंदूंच्या व्यासपीठावर सांगतात. मात्र, धर्म व राजकारणाची सरमिसळ नेमकी विरुद्ध बाजूकडेच अधिक होत असल्याचे नजीकच्या काळात भारतात घडलेल्या घटनांवरूनच दिसते, त्याकडेही फादरनी लक्ष द्यायला हवे व बोलायला हवे.



२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीआधी मुंबईतल्या सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य फादर फ्रेझर मास्करेन्हास यांनीमोदींना मतदान करू नका,’ असे ईमेल आपल्या विद्यार्थ्यांना पाठवले होते. नंतर त्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. २०१७ सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी गांधीनगरच्या थॉमस मॅकवान या आर्चबिशपने पत्र लिहून राष्ट्रवादी शक्तींना (भाजपला) रोखण्यासाठी मतदान करा, असे सांगितले होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही गोव्याच्या फादर कॉन्सिको दसिल्वा यांनी मनोहर पर्रिकरांसारख्या प्रामाणिक, गुणी व कर्तृत्ववान नेत्याबद्दल गरळ ओकत ‘सैतान’ अमित शाह यांच्या पक्षाला मते न देण्याचे आवाहन केले होते. तसेच गोव्याच्याच फिलिप नेरी फेराओ या आर्चबिशपनी चर्चच्या अधिकृत नियतकालिकांतून लेख लिहित भाजपविरोधात मते द्या, असे म्हटले होते. पूर्वोत्तर व ईशान्य भारतात तर चर्च आणि फादर, आर्चबिशप वगैरे मंडळींकडून असले उद्योग वारंवार होताना आढळतात आणि ते लक्षातही येतात. आता पुरोगामी पोप (पोप फ्रान्सिस) म्हणून ज्यांचे गोडवे फादर गातात, त्यांनीही स्वतःला राष्ट्राध्यक्षाचा दर्जा घेऊन ठेवलेला आहे. एखाद्या राष्ट्रप्रमुखाला दुसर्‍या राष्ट्रात गेल्यानंतर राजशिष्टाचारानुसार मिळणार्‍या सुख-सुविधा हे पोपही उपभोगत असतात. आता अशाप्रकारे राजकारण व धर्माचा सरळसरळ संबंध दिसत असलेल्या प्रकरणात फादर दिब्रिटो यांचे काय मत आहे? त्यांनी ते नक्कीच व्यक्त करावे, ते जाणून घ्यायला आम्हालाही आवडेल.



सेमेटिक धर्म हे नेहमीच नवे विचारप्रवाह न आल्याने डबक्याचे स्वरूप धारण करत असल्याचे अनेक ऐतिहासिक व वर्तमानकाली तथ्यांवरून अधोरेखित होते. पर्यायाने सर्वप्रकारची सत्ताकेंद्रे ताब्यात ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. नव्याने येणारे सांस्कृतिक प्रवाह एखाद्या धर्मविषयक तत्त्वज्ञानाचा पाया व डोलारा अधिक समृद्ध करत असतो, पण सेमेटिक धर्मांत ही शक्यता नसते. त्यामुळे राजसत्तेची गरज ही धर्म व कसेही करून अनुयायांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सेमेटिक धर्मांना अधिक असते. आता फादर दिब्रिटो जिथे जिथे जाता येईल, तिथे ज्या ज्या गोष्टी सांगत आहेत आणि बंडखोर धर्मगुरू म्हणून त्यांनी जो लौकिक ख्रिस्त्यांमध्ये मिळवलेला आहे, त्याबद्दल आम्हाला कौतुक आहेच.




पण, वर उल्लेखलेल्या सगळ्या गोष्टी पाहता, फादरनी आपल्या धर्मबांधवांमध्ये जाऊन अधिक प्रबोधन करणे मानवतेच्या दृष्टीने हिताचे ठरेल, असे वाटते. सोबतच नेहमी नेहमी केल्या जाणार्‍या विधानांमुळे फादर थोडेसे मजेशीर दिसत असल्याचेही लक्षात येते. कारण ते बोलत बरोबर असले तरी राँग नंबर डायल करून संवाद साधणार्‍या इसमासारखे ते भासतात. म्हणूनच त्यांनी ज्यांना त्यांच्या शब्दांची अधिक गरज आहे, तिथे बोलले पाहिजे, त्यांनाही याबद्दल सांगितले पाहिजे. इतकेच नव्हे तर गर्भपात, समलैंगिकता, नन्स आणि कोवळ्या मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, चर्चमधील दलितांचे प्रवेश, वनवासी बांधवांच्या जमिनी हडपणे व धर्मांतरासारख्या मुद्द्यांवरही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी कोरडे ओढावे, सडेतोड भाष्य करावे आणि परखड भूमिकाही घ्यावी. त्या परिस्थितीत विवेकाच्या पालखीचे भोई म्हणून आम्हीदेखील त्यांच्यासोबत असू!

@@AUTHORINFO_V1@@