विक्रमी मताधिक्क्याने निवडून येणार! : किसन कथोरे

    19-Oct-2019
Total Views |



मुंबईला लागून असलेले पण जवळपास ८० किमी. दूर असलेले ग्रामीण भाग आजवर नेहमी विकासकामांपासून दूर राहिलेले. मुंबईच्या ईशान्येला असलेला मुरबाड मतदारसंघ तर बोलून चालून आदिवासी-वनवासीबहुल मतदारसंघ.


मुंबईला लागून असलेले पण जवळपास ८० किमी. दूर असलेले ग्रामीण भाग आजवर नेहमी विकासकामांपासून दूर राहिलेले. मुंबईच्या ईशान्येला असलेला मुरबाड मतदारसंघ तर बोलून चालून आदिवासी-वनवासीबहुल मतदारसंघ. त्यात येणारा प्रमुख शहरी भाग म्हणजे बदलापूर. काही वर्षांपूर्वी बदलापूरदेखील टुमदार गावच होते. पूर्वेच्या कुळगावसह त्याची नगरपालिका झाली आणि गेल्या काही वर्षांपासून मोठ्या इमारती, सोसायट्या यांसह वाढत्या लोकसंख्येने बदलापूरचे रूप पालटू लागले. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे हे एक अतिशय कार्यमग्न आणि प्रचंड जनसंपर्क असलेले कार्यकर्ते. 'मुंबई तरुण भारत'ने त्यांची भेट घेतली, तेव्हाही ते विविध गाठीभेटीत व्यस्तच होते. "वाढत्या लोकसंख्येच्या बदलापूर मतदारसंघाच्या विकासाचा काय दृष्टिकोन आहे?," असे विचारता किसन कथोरे म्हणाले की,"बदलापूरचा नियोजन आराखडा यावर्षी म्हणजे नियोजित कालावधीच्या दोन वर्षे आधीच पूर्ण झाला आहे. आता नवीन आराखडा करण्याची गरज आहे. या भागातील जनता या विकासाशी जोडली गेली आहे. संपूर्ण बदलापूर आज डांबरी रस्तेमुक्त आहे. प्रत्येक रस्ता काँक्रीटचा केला आहे. राज्यातील सर्वात उत्तम रस्ते माझ्या मतदारसंघात आहेत, याचा मला अभिमान आहे आणि या भागातील विकासासाठी जनता मुख्यमंत्री फडणवीस यांची ऋणी आहे." किसन कथोरे पुढे म्हणाले की, "आता आमची गरज आहे ती बदलापूर नगरपालिकेत नवीन गावे जोडून हद्द वाढविण्याची."

 

"कल्याणचा काही भाग, बदलापूर, मुरबाड नगर पंचायत, मुरबाडचा आदिवासी भाग, औद्योगिक वसाहती असा हा सर्व प्रकारची सरमिसळ असलेला मतदारसंघ आहे," असे सांगून कथोरे म्हणाले की,''बराचसा भाग एमएमआरडीएमध्ये येतो. आमची मागणी आहे की, हा संपूर्ण मतदारसंघ एमएमआरडीएमध्ये घ्यावा. ती लवकरच पूर्ण होईल, असे दिसते." "पुढील पाच वर्षे विकासाच्या काय योजना मतदारसंघासाठी आहेत?," असे विचारता ते म्हणाले की,"नदीचे संवर्धन करून नदी व उपनद्यांचे खोलीकरण, नाल्यांचे रुंदीकरण यातून पूर नियंत्रण करण्याची योजना राबवायची आहे. गेली दोन वर्षे या भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे. यापुढे ती परिस्थिती येऊ नये म्हणून उपाय आखले आहेत." "बदलापूरकर पूर्णपणे रेल्वेवर अवलंबून आहेत. त्यांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे बदलापूरला मेट्रो हवी, ही आमची मागणी होती, ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. अंधेरी-कांजूरमार्ग - ऐरोली - शीळफाटा - बदलापूर असा मेट्रो मार्ग मंजूर झाला असून अंधेरी ते कांजूरमार्ग या मार्गाचे काम सुरूही झाले आहे. पुढील मार्गाच्या निविदा २०२० च्या सुरुवातीस जारी होतील आणि येत्या दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन आहे."

 

"याशिवाय, या मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा म्हणून अनेक धरणे प्रस्तावित आहेत. मुरबाडमध्ये अर्धवट पडलेले बारवी धरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील ५० दशलक्ष लिटर पाणी हे बदलापूरसाठी राखीव ठेवलेले आहे. आता ते पाणी साठवण्यासाठी बदलापूरमध्ये पुरेसे जलकुंभच नाहीत. नऊ जलकुंभ आहेत. आणखी नऊ जलकुंभ नव्याने बांधत आहोत. या बारवी धरणामुळे विस्थापित झालेल्या सर्व १२०४ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखली आहे. त्या कुटुंबांना घरटी एक नोकरी देण्यासाठी एमआयडीसी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. ज्यांना नोकरी देणे शक्य नाही, त्यांना एकरकमी दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. भोज धरण, चिंचवली धरण, इंदगाव धरण ही धरणे येत्या काळात वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत. नळयोजना पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाला पुढील शंभर वर्षे पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, अशी तयारी आम्ही करत आहोत." "ग्रामीण भागासाठी काय योजना आहेत?", असे विचारता कथोरे म्हणाले की, "मुरबाड तालुका जो मानवी विकास निर्देशांकात १२५ व्या क्रमांकावर होता, तो विकासाच्या कामांमुळे क्रमांक एकवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. आता मुरबाड नगर पंचायत क्रमांक एकवर आहे. काँक्रीटचे रस्ते, स्वत:चे प्रशासकीय भवन, स्वत:चे अग्निशामक दल ही कामे पूर्ण झाली आहेत. यापुढे सर्व जुनी सरकारी कार्यालये, पोलीस ठाणी, न्यायालये यांच्या इमारती नवीन आराखड्यानुसार बनवायच्या आहेत. मी बनवलेल्या पोलीस स्थानकाचा आराखडा मुख्यमंत्र्यांना इतका आवडला की, आता राज्यातील सर्व पोलीस ठाणी त्याच आराखड्यानुसार बनविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत."

 

"मुरबाडची भेंडी जगभर निर्यात होते. त्यासाठी मुरबाडच्या अगदी अंतर्गत भागापर्यंत उत्तम रस्त्यांचे जाळे प्रस्तावित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगात माल विमानतळापर्यंत पोहोचविणे शक्य होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. मुरबाडमध्ये रेल्वे हवी, ही जुनी मागणी होती. मी खासदार कपिल पाटील यांच्या मदतीने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा पाठपुरावा करून या भागात रेल्वेची गरज त्यांना पटवून दिली. त्यांनी रेल्वेलाईन मंजूर केली. निविदा निघाल्या आहेत. आता २०२४ पर्यंत मुरबाडमध्ये रेल्वे पोहोचेल. या मतदारसंघातून समृद्धी महामार्ग, मुंबई बडोदा एक्सप्रेस वे यांच्यासोबत अनेक महत्त्वाचे रस्ते जात आहेत. कल्याण नगर रस्ता आहे. त्याच बरोबरीने नवीन शहापूर-मुरबाड म्हसामार्गे कर्जत खोपोली हा १०० किमी. चा राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. नवीन शाीळफाटा-बदलापूर-बोराटपाडा-म्हसा मार्गे म्हाळशेज असा एक राष्ट्रीय महामार्ग बनत आहे. रस्त्यांच्या या जाळ्यामुळे या भागातील नागरिक सहजपणे सर्व बाजारपेठांशी जोडला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना चांगला रोजगार मिळेल.

 

कथोरे यांचे आरेाग्य क्षेत्रातील कामही मोठे आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "१९९२ पासून मी माझ्या वाढदिवसाला मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. वर्षात दहा महिने उन्हाळा सोडून दरवर्षी दोन ते अडीच हजार शस्त्रक्रिया होतात. आजवर लाखांच्या आसपास ऑपरेशन्स झाली आहेत. दरवर्षी वीस हजार चश्मे वाटतोय. कुणाच्या कुटुंंबात कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी 'आमदार कन्यादान योजना' राबवली आहे. तीन वर्षांत माझे ४७५ च्या आसपास जावई झाले आहेत," असे किसन कथोरे हसत हसत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "ग्रामीण महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण प्रचंड आहे. त्यांच्यासाठी एक विशेष योजना राबवली आहे. त्यात त्यांना दर पंधरा दिवसांनी असा एकूण शंभर दिवसांचा औषधांचा उपचार दिला जातो. या महिलांचा एकूण १ लाख, १७ हजार महिलांचा डाटा माझ्याकडे तयार झाला आहे. दरवर्षी ठराविक कालावधीत या महिलांना कार्यकर्त्यांकडून गोळ्यांचे वाटप केले जाते. "तुमच्यासमोर कोणाचे राजकीय आव्हान आहे," असे विचारता किसन कथोरे म्हणाले की, "माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच २५ हजार लोक जमले होते. गावागावातून ग्रामीण महिलांनी निवडणूक निधी कुणीही न सांगता स्वत:चे पैसे खर्च करून स्वत:च्या गावातील निवडणुकीचे जमेल तसे काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे माझ्यासमोर कोणाचेच राजकीय आव्हान या घडीला तरी नाही." किसन कथोरे यांना विक्रमी मतांनी निवडून येण्याची खात्री आहे. राज्यातील सर्वाधिक मताधिक्क्य यावेळी आपले असेल, असे ते आत्मविश्वासाने सांगतात, तेव्हा त्यांच्यामागे त्यांच्या प्रचंड कार्याची पुण्याई उभी असते. बकालीकरण होत असलेल्या नागरी भागात सोयीसुविधांची, पायाभूत सुविधांची, नागरी व्यवस्थांची वेळेत उभारणी करण्याची दूरदृष्टी या साध्या माणसाने दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्यात तथ्य असावेसे वाटते.

- राजेश प्रभु-साळगांवकर