चला करू मतदान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2019
Total Views |



विधानसभेची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. मीच कसा योग्य, हे सांगण्याची अहमहमिका लागली आहे. सभांमध्ये उपस्थितांकडून टाळ्यांचा प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे उमेदवार खुश होत आहेत. प्रत्येकाला वाटते मीच निवडून येणार आहे. त्यामुळे तो खुशीत गाजरे खात आहे. अर्थात काहींचे वेगळे हिशेब सोडले तर प्रत्येकजण विजयी होण्यासाठी झटत असतो. परीक्षेचा दिवस जवळ आला की दहावी-बारावीचे विद्यार्थी जसे रात्रंदिवस अभ्यास करतात, त्याप्रमाणे उमेदवारही रात्रंदिवस प्रचार करत आहेत. विद्यार्थी एकदा नापास झाला की, त्याला त्याच वर्षात पुन्हा एकदा संधी मिळते. मात्र, मतदारांच्या नजरेतून उमेदवार एकदा उतरला की, त्याला त्याच निवडणूकरूपी परीक्षेला बसायला पुन्हा पाच वर्षे वाट पाहावी लागते. म्हणून उमेदवारांनी एकतर न पेलणारी आश्वासने देऊ नयेत किंवा दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी खटाटोप तरी करायला हवा. शिवाय मतदाररूपी शाळेत महिन्यातून एकदा तरी हजेरी लावायला हवी. म्हणजे पुढची परीक्षा कठीण जात नाही. मतदारांनीही यासाठी जागृत राहिले पाहिजे. आपले प्रतिनिधी पाच वर्षे राजासारखे वावरत आणि वागत असले तरी त्यांना त्या पदापर्यंत पोहोचविणारे आपणच असतो. म्हणून निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायलाच हवे. पुढील पाच वर्षे राजा कोण, हे ठरवणारे एक दिवसाचे आपणच राजे असतो. त्यामुळे आपल्या भूमिकेचा विसर पडू देता कामा नये. राज्यात ४ कोटी, ६८ लाख, ७५ हजार, ७५० पुरुष मतदार आणि ४ कोटी, २८ लाख, ४३ हजार, ६३५ महिला मतदार आहेत. त्यांच्यामध्ये आपल्या कर्तव्याविषयी जाणीव असावी म्हणून लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी प्रसारमाध्यमांमार्फत जागृती करण्यात येत आहे. अशा प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटांत हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. अशा वेळी मतदारांनी मागे राहून चालणार नाही. निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे.

 

चिंता नको!

 

मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे सर्वसाधारण मतदारांना सहजशक्य असते. ते रांगेत ताटकळत राहतात, पण आपला मतदानाचा हक्क बजावणे हे कर्तव्य मानतात. असे कर्तव्य अनेकांना पार पाडायचे असते. पण त्यांना शक्य होत नाही. उदा. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्हुल्यांच्या माता वगैरे. मात्र, निवडणूक आणि मतदान यांचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने अशा असाधारण मतदारांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन त्यांनी मतदानाचे परमकर्तव्य पार पाडायला पाहिजे. त्याबाबत त्यांच्या घरच्या सदस्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी ३५२ 'सखी मतदान केंद्रे' स्थापन करण्यात येतातच, शिवाय दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता सोपे व्हावे म्हणून व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदानासाठी त्यांना ताटकळत राहण्याची आवश्यकता नाही. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे ५४०० मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेथे मतदान केंद्रे स्थलांतरित करणे शक्य नाही, त्या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. अंध मतदारही कोणाच्याही मदतीशिवाय मतदान करू शकणार आहेत. मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यात अडचण येते ती तान्हुल्या मुलांच्या मातांना. मात्र, त्यांच्यासाठीही आता मतदान करणे सोईचे झाले आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय तान्हुल्यांच्या संगोपनासाठी अंगणवाडी सेविकांची व्यवस्था करण्यात येणार असून लहानग्यांसाठी काही खेळणी, कोरडा खाऊ आणि पाण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अनोख्या सुविधेमुळे माता त्यांच्या तान्हुल्यांना पाळणाघरात ठेऊन निश्चिंतपणे मतदानाचा अधिकार बजावू शकणार आहेत. येणाऱ्या प्रत्येक बालकाची नोंद ठेवणार असून, पाळणाघराबाहेर पोलीस दलातील सुरक्षारक्षकही तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे चिंता न बाळगता मतदान करता येणार आहे.

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@