ओरबाडणारे बारामतीसम्राट नकोच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2019
Total Views |


 


शरद पवारांच्या तोंडी गरीब आणि स्वाभिमानी बापाची भाषा येणे, हाच मोठा विनोद. कारण, सत्तेच्या लालसेपायी पवारांनी कोणाकोणापुढे लोटांगणे घातलीत, ते सर्वांना माहिती आहे. स्वतःच्या पदांच्या परिपूर्तीसाठी त्यांनी स्वाभिमान शब्द बारामतीच्या वेशीवर टांगून दिल्लीपर्यंत आणि तिथून बारामतीपर्यंत उड्या मारल्या. त्यामुळे त्यांनी स्वाभिमान शब्द उच्चारला तरी कीव वाटते.


"आम्हाला गरीब बाप हवा, पण स्वाभिमानी हवा" आणि "मला ईडीची भीती दाखवू नका. मी मेल्या आईचे दूध प्यायलो नाही. मी तुमच्या ईडीलाच 'येडी' करून टाकीन," अशा शब्दांत सदा पंतप्रधानेच्छुक उमेदवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. वस्तुतः चालू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांची अवस्था अतिशय केविलवाणी झाल्याचे दिसते. शोलेतल्या जेलरप्रमाणे पाठीमागे उभ्या असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांची अख्खी फळीच्या फळी त्यांना सोडून निघून गेली. परिणामी, राजकारणात अर्धशतक घालवणाऱ्या पवारांवरच उरल्यासुरलेल्यांना घेऊन प्रचारासाठी राज्यभर वणवण भटकण्याची वेळ आली. सुरुवातीला त्यांनी आपल्या दोन 'अमोल' रत्नांवर निवडणुकीचा भार टाकायचा, रथयात्रा वगैरे काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण त्यांच्या हातून पक्षाची माती होण्यापेक्षा आपल्याच हातून झालेली बरी, असा विचार करून पवारांनी सगळीच धुरा स्वतःकडे घेतली. आटलेला जनतेचा प्रतिसाद, सर्वांनीच फिरवलेली पाठ आणि असल्याच प्रकारांमुळे त्यांना पक्षाचे नेमके भवितव्यही दिसू लागले. येत्या निवडणुकीनंतर पक्ष उरेल की नाही, या चिंतेने ग्रासलेल्या शरद पवारांनी कोपरखळ्यांपासून ते निरनिराळे चाळेही करून दाखवले. अर्थात पवारांच्या अंगविक्षेपादी हालचालींमुळे जनतेचेही चांगलेच मनोरंजन झाले. तसेच हा विझता दिवा अखेरची फडफड करत असल्याचेही पटले. आता त्याच फडफडीतून शरद पवार राज्यातील जनतेला गरीब पण स्वाभिमानी बापाची (मायबाप सरकारची) गरज असल्याचे बोलू लागले.

 

खरे म्हणजे शरद पवारांच्या तोंडी गरीब आणि स्वाभिमानी बापाची भाषा येणे, हाच मोठा विनोद. कारण, शरद पवार इथे स्वतःला गरीब स्वाभिमानी बाप तर भाजपला श्रीमंती थाट म्हणताना दिसतात. पण पवारांच्या आजपर्यंतच्या कृत्यांकडे एक एक करून पाहता ती त्यांच्या आताच्या शब्दांनाच लाजवणारी असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच पवारांनी, भोळ्याभाबड्या वनवासींच्या जमिनीवर धनाढ्यांच्या सुट्ट्यांची सोय होण्यासाठी लवासासारखी वसाहत उभी करणारा गरीब बाप कोण होता? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विधानभवनावर न्यायाच्या आशेने आलेल्या गोवारी समाजाच्या लोकांवर गोळीबार करणारे कोणाच्या हाताखालचे पोलीस होते? मावळमधल्या शेतकरी आंदोलनावेळी बंदुकीच्या फैरी झाडणारे सरकार कोणाचे होते? दुष्काळामुळे सुकून चाललेल्या पिकांसाठी, भेगाळलेल्या काळ्या आईसाठी पाण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या अंगातल्या टगेगिरीची मस्ती दाखवणारे अजित पवार शरद पवारांचे कोण होते?, याची उत्तरे जरूर द्यावीत. स्वतःला गरीब बाप म्हणवून घेणारे पवारच या प्रत्येकवेळी सत्तेच्या केंद्रस्थानी होते आणि याच गरीब बापाने सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात तिडीक जाईल, असे कारनामे सत्तासंधीचा फायदा घेत केले होते. तसेच पवारांनी स्वतःला स्वाभिमानी म्हणण्यातून त्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ होत असल्याचेच दिसते. कारण, सत्तेच्या लालसेपायी कोणाकोणापुढे पवारांनी लोटांगणे घातलीत, ते राज्याला आणि देशालाही माहिती आहे. स्वतःच्या पद-प्रतिष्ठेच्या परिपूर्तीसाठी शरद पवारांनी स्वाभिमान शब्द बारामतीच्या वेशीवर टांगून थेट दिल्लीपर्यंत आणि तिथून पुन्हा बारामतीपर्यंत उड्या मारल्या. परदेशी नागरिकत्वाच्या नावाखाली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना विरोध करताना पवार फारफार स्वाभिमानी असल्याचे त्यांच्या अनुयायांना अन् झांजा वाजवणाऱ्यांना वाटले होते. नंतर मात्र वर्षा दोन वर्षातच स्वाभिमानाला तिलांजली देत, त्याचे श्राद्ध घालत पवारांनी सोनियांच्याच शेजारी झुकोजीरावाचा वेष घेत सत्तेचे सर्वच फायदे मनमुराद लुटले. तेच आज जर स्वतःला स्वाभिमानी म्हणत असतील तर त्यांची कीव करावी तेवढी थोडीच अन् अशाप्रकारे सत्तेसाठी स्वतःचेच शब्द खोटे ठरविणाऱ्या व्यक्तीवर विश्वास तरी कसा ठेवायचा? म्हणूनच पवारांकडे स्वाभिमान वगैरे शब्दांचा भुलभुलैय्या असून त्यांचा बाणा एकच, तो म्हणजे सत्ता, सत्ता आणि सत्ता. अर्थात आता राज्यातली जनता पवारांना कोणत्याही प्रकारची खरीखुरी सत्ता देणार नसल्याने ते बदामचा सत्ता वा इस्पिकचा सत्ता घेऊन पुढचा डाव नक्कीच रंगवू शकतात. तेवढी उसंत आणि सवड त्यांना निवडणुकीनंतर नक्कीच मिळेल.

 

"ईडीची भीती दाखवू नका, मी ईडीलाच येडी करून टाकीन," असेही शरद पवार म्हणाले. सोबतच माजी केंद्रीय मंत्री आणि पवारांचे सहकारी पी. चिदंबरम आणि कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना गजाआड टाकण्यावरूनही आगपाखड केली. मुळात पी. चिदंबरम वा जी. परमेश्वरा यांना तुरुंगाची हवा खायला लागली ती, त्यांनी केलेल्या कृत्यांमुळेच. तसेच त्यांना काही कोणी मनात आले म्हणून उचलबांगडी करून नेले नाही तर न्यायालयीन आदेशानुसार, संवैधानिक पद्धतीनेच कारवाई झाली. पण पवार स्वतःला न्यायालये आणि संविधानापेक्षाही वरचढ समजत असावेत, म्हणून ते त्यालाही विरोध करताना दिसतात. सोबतच 'कर नाही त्याला डर कशाला,' अशी एक म्हण आपल्याकडे वापरली जाते. म्हणूनच पवारांनी काही भ्रष्ट कृत्ये केलीच नसतील तर त्यांनी घाबरण्याचे वा गांगरण्याचे काहीही कारण नाही, पण शरद पवारांना वरच्या म्हणीऐवजी 'चोराच्या मनात चांदणे' हीच म्हण आठवत असेल. आताचे त्यांचे सैरभैर होणे, वेडेवाकडे हातवारे करणे हा सगळा त्याचाच परिपाक. तसेच ईडीला येडी करेल म्हणणाऱ्या पवारांनी शिखर बँकेच्या घोटाळ्यात नाव आले नाही तोच ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात जाण्यासाठी मांडलेला तमाशा नेमका कशासाठी होता? आज ईडीला येडी करेन म्हणणाऱ्या पवारांना तेव्हा कोणी येडे केले होते? पराभवाच्या भयाने की सहानुभूतीच्या आशेने? याचा खुलासा त्यांनी नक्कीच करावा. दुसऱ्या बाजूला भाजपने सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच जबाबदारीचे भान दाखवले. शेतकरी, कष्टकरी आणि वनवासी समाजाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी अनेकानेक योजना आखल्या. 'मागेल त्याला शेततळे' आणि 'जलयुक्त शिवार' ही त्यातली महत्त्वाची उदाहरणे. भाजपने खुद्द पवारांचा वा त्यांच्या पुतण्याचा आदर्श समोर ठेवत कारभार हाकला नाही, तर श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या विचाराने वाटचाल केली. म्हणूनच आताही जनतेला हाच काळजी घेणारा, बळ देणारा आणि उत्तरदायित्वाचे भान असणारा श्रीमंत बाप हवाय, गरिबीचे नाटक करून सगळेच ओरबाडणारे बारामतीसम्राट नव्हे!

@@AUTHORINFO_V1@@