दिंडोरी मतदारसंघात झिरवाळ विरुद्ध गावित

    18-Oct-2019
Total Views |




नाशिक जिल्ह्यातील पाच वनवासी भागापैकी दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा वनवासीबहुल मतदारसंघ समजला जातो
. २००९ ते २०१४ या काळात लोकसभा निवडणुकांमध्ये खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या रुपाने, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. भारती पवार यांच्या रुपाने भाजपचे ‘कमळ’ येथे फुलले आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदाची विधानसभा निवडणूक ही भाजप आणि महायुतीसाठी जड जाण्याची शक्यता दिसून येत नाही.



 या मतदारसंघात तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने पाच उमेदवार सध्या रिंगणात उतरले आहेत
. त्यातील काँग्रेस आघाडीचे नरहरी झिरवाळ आणि भाजप-शिवसेना युतीचे भास्कर गावित यांच्यात सरळ सामना होणार, असे चित्र सध्या येथे दिसून येत आहे. अर्ज माघारीनंतर सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचारास सुरुवात केली असली तरी मतदारांचा कौल युतीच्या उमेदवारास प्राप्त होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. आता मतदानासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने उमेदवारांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्यावतीने माजी आमदार रामदास चारोस्कर व माजी आमदार धनराज महाले यांनीदेखील अर्ज दाखल केले होते. त्यांचे अर्ज छाननीत बाद झाले. तथापि अपक्ष म्हणूनदेखील दोघांचे अर्ज होते. शिवसेना नेत्यांच्या शिष्टाईनंतर दोघा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भास्कर गावित यांच्यासमोरील घरातील आव्हान संपुष्टात आले आहे. विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांचा चिरंजीव दीपक झिरवाळ यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनीही अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात आता पाच उमेदवार राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून आ. नरहरी झिरवाळ, शिवसेना-भाजप-रिपाइंकडून भास्कर गावित, वंचित बहुजन आघाडीकडून अरुण गायकवाड, मनसेकडून के. टी. बागुल, बसपाच्यावतीने जना वतार हे आता निवडणूक रिंगणात उभे राहिले आहे. मात्र, प्रमुख सामना झिरवाळ-गावित असाच रंगणार आहे.




 पेठ तालुक्याला या निवडणुकीत प्रथमच उमेदवारांची संधी मिळाली असली तरी त्यांची सर्व मदार दिंडोरी तालुक्यातील शिवसेना
-भाजपच्या नेत्यांवर अवलंबून आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय नेतृत्वाचेसुद्धा मूल्यांकन होणार असल्याने शेटे-पाटील, झिरवाळ व डोखळे, कावळे, देशमुख, चारोस्कर, महाले या गटांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती-आघाडी तुटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना भाजपसह दहा उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसमध्ये झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. यंदा राष्ट्रवादीला शिवसेनेचे आव्हान होते. मात्र, शिवसेनेत इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी होती. त्यातच लोकसभेत राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेले धनराज महाले यांनी घरवापसी करत शिवसेनेची उमेदवारी मिळवली. पण उमेदवारीचा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण, रामदास चारोस्कर, भास्कर गावित यांच्यासह संघटनेतील नाराजी नाट्यानंतर उमेदवारीत बदल करत भास्कर गावित यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर धनराज महाले व रामदास चारोस्कर यांनी अपक्ष अर्ज दाखल करत आपले आव्हान कायम ठेवले होते. मात्र, दोन्ही माजी आमदारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे गावित यांना काहीसा दिलासा मिळाला. त्यांना आता आ. नरहरी झिरवाळ यांच्याशी सरळ सामना करावा लागणार आहे. वंचित आघाडीचे अरुण गायकवाड यांचेही काही अंशी आव्हान राहणार आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसचे आ
. नरहरी झिरवाळ यांना काहीसा धक्का पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पेठ आणि दिंडोरी दोन्ही तालुक्यातील शिवसैनिकांनी एक निष्ठेने काम केल्यास नरहरी झिरवाळ यांच्यापुढे आव्हान वाढू शकते. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे त्यांच्या बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादीला होईल, अशी काहीशी राजकीय गणिते सुरू असतानाच दोघांच्या माघारीने राजकीय वातावरण बदलले आहे. तसेच, भाजपच्या खासदारांनी या मतदारसंघात चांगले काम करत येथील शेतीशी संबंधित प्रश्न, विविध विकास योजनांची कार्यवाही करत इतर प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे येथील मतदार हा युती उमेदवारास पसंती देण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी पाणी प्रश्न, खराब रस्ते, दुष्काळ या प्रश्नांची सोडवणूक उमेदवारांनी करावी, अशी अपेक्षा मतदार बाळगून आहेत.

-समीर पठाण