देशसेवेची 'मार्गदर्शिका'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |



लष्करात नोकरीसाठी उपलब्ध असलेल्या संधी सर्वसामान्य मुलांपर्यंत पोहोचवून देशसेवेसारख्याक्षेत्रात काम करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या गुरू मीनल पवार यांच्याविषयी जाणून घेऊया...


देशप्रेमासाठी स्वतःच्या नोकरीचा त्याग करून सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना प्रेरणा देणाऱ्या मीनल पवार यांचे काम नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. मुंबई विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकी आणि आयआयटीतून एमटेक झालेल्या मीनल पवार सैनिक प्रशिक्षण संस्था चालवितात. त्यांच्या संस्थेचे नाव 'सेंटर फॉर डिफेन्स करिअर' असे असून ही संस्था मुलुंडमध्ये कार्यरत आहे. येथे अनेक तरुण-तरुणींना सैन्य दलात जाण्याविषयी मार्गदर्शन केले जाते. आज अनेक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. मुलुंडमधीलच उच्चशिक्षित मीनल पवार यांनी एका नामांकित कंपनीतील भरपूर पगाराची नोकरी सोडून देशसेवेचा मार्ग निवडला. त्यांच्या या निर्णयानंतर काही लोकांकडून त्यांची खिल्लीही उडवली गेली. मात्र, या सगळ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत त्यांनी आपला प्रवास सुरूच ठेवला. या प्रवासाची सुरुवात त्यांच्या घरातूनच झाली. मीनल पवार यांच्या घरी घरकाम करणाऱ्या बाईंचा मुलगा दहावी उत्तीर्ण झाला. त्याला त्याच्या पुढील शिक्षणाविषयी विचारले असता त्याच्याकडून कोणतेच योग्य उत्तर त्यांना मिळाले नाही. अनेक मुलांना दहावी-बारावी नंतर काय करायचे याची माहितीच नसते. मग पदवीचे शिक्षण घेऊन छोट्या-मोठ्या नोकरीच्या मागे फिरण्यात ते आपले आयुष्य घालवितात. या मुलाचेही तसेच होईल, असे मीनल यांना वाटले. तसेच त्याला मार्गदर्शनाची खूप आवश्यकता आहे, हे त्यांनी ओळखले आणि लष्करी भरतीच्या जाहिरातीविषयी सांगितले. मात्र, मीनलना लष्करात भरती होण्यासाठी काय करावे लागते, याची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी ही सर्व माहिती गोळा करून प्रथम स्वतः अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी घरकाम करणाऱ्या बाईच्या मुलाला लष्कराच्या परीक्षेचे मार्गदर्शन करुन त्याची तयारी करून घेतली. २००८ मध्ये लष्करी भरतीच्या परीक्षेत त्याची निवड झाली व तो भूदलात रुजू झाला.

 

या एका गोष्टीने मीनल पवार यांचा आत्मविश्वास वाढला. भारतीय लष्करात अनेक प्रकारच्या नोकऱ्या आणि करिअरच्या संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, याविषयी माहिती नसल्याने तरुण त्या मार्गाकडे वळत नाहीत. मीनलनी त्यांचे ध्येय ठरवले होते. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देऊन 'सेंटर फॉर डिफेन्स करिअर्स' ही संस्था २००९ मध्ये सुरू केली. यासाठी त्यांनी आपल्या नोकरीतून मिळालेल्या पैशांतूनच मुलुंड येथे सर्वप्रथम शाळेचे वर्ग भाड्याने घेऊन मुलांना शिकविण्यास सुरुवात केली. संस्थेची प्रसिद्धी झाल्यानंतर अनेक मुले येथे प्रवेश घेऊ लागली. यामुळे मीनल पवार यांना अजून बळ मिळाले. त्यांनी मुलुंडमध्येच जागा विकत घेऊन पूर्णवेळ काम सुरू केले. हा प्रकार अनेकांच्या मस्करीचा विषय होता. अगदी घरच्यांनीसुद्धा त्यांना वेड्यात काढले. आरामदायी जीवन जगताना हा प्रकार नक्कीच घरच्यांच्या पचनी पडला नाही. त्यातच अनेक प्रतिस्पर्धकांनी एक महिला या क्षेत्रात कशी येऊ शकते, म्हणून खूप त्रासही दिला. मात्र, मीनल यांचा निर्णय ठाम होता. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.

 

लष्करात तरुणांना अनेक संधी असूनही या विषयी कमी लोकांना माहिती आहे. लष्करात फक्त सीमेवर किंवा लढाईच्यावेळी गोळ्या झाडणे हेच एकमेव काम नसून यात अनेक पदांसाठी तरुणांची गरज असते. भूदल, नौदल आणि वायुदल यांच्यात दरवर्षी भरती करण्यात येते. या भरती परीक्षेची संपूर्ण तयारी या संस्थेत करून घेतली जाते. सुरुवातीला अगदी बोटावर मोजता येतील इतकी मुले असणाऱ्या या संस्थेने आता ३०० पेक्षा जास्त मुलांचा आकडा पार केला आहे. यासाठी मीनल पवार यांनी प्रचंड मेहनत घेतली असून जिद्द आणि सकारात्मक विचारांमुळेच त्या इथपर्यंत येऊ शकल्या आहेत. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी माफक शुल्क घेऊन तिथे मुलांना शिकविले जाते. अगदी पुस्तकांपासून ते परीक्षा अर्ज भरण्यापर्यंत संस्था मदत करते. तसेच ज्या मुलांची शुल्क भरण्याची परिस्थिती नसते त्यांना मोफत शिक्षण दिले जाते. कारण, पैसे कमावण्यापेक्षा समाजसेवा हाच संस्थेचा मूळ हेतू आहे. या विषयी मीनल पवार सांगतात की, "हा प्रवास माझ्यासाठी खूपच कठीण होता. सुरुवातील अनेक अडचणी, अडथळे आले पण प्रत्येकवेळी मी खंबीरपणे त्याचा सामना केला व वाटचाल सुरु ठेवली. कारण, मला समाजातील तरुण पिढीसाठी काहीतरी करायचे होते. आमच्या येथे अनेक मुलांची अगदीच बेताची परिस्थिती आहे. मात्र, त्यांच्यात जिद्द आणि सातत्य असल्याने ते यश मिळवितात. मी फक्त त्यांना मार्गदर्शन करते. कारण, आजच्या काळात तरुणांना लष्करात असणाऱ्या संधीविषयी फारच कमी माहिती आहे. त्यामुळे शिकूनही योग्य करिअर करू शकत नाहीत. मला माझी संस्था अजून विस्तारीत करायची असून सर्व तरुणांपर्यंत या गोष्टी पोहोचवायच्या आहेत." 'सेंटर फॉर डिफेन्स करिअर्स' या संस्थेला आता ११ वर्षे झाली असून आतापर्यंत या संस्थेतून शिक्षण घेतलेले ३५० तरुण-तरुणी लष्करात अनेक पदांवर कार्यरत आहेत. आज मीनल यांच्या परिवारालाही त्यांच्या कामाचे महत्त्व समजले आहे. मीनल पवार यांच्या या देशसेवेबद्दल दै. 'मुंबई तरुण भारत'कडून अनेक शुभेच्छा...!

@@AUTHORINFO_V1@@