राज ठाकरेंना 'वास्तवाचे भान?'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |



राज ठाकरेंनी फक्त यावेळी एकच शहाणपण केला की, त्या दोन पक्षांना आपला उपयोग करून घेण्यापासून रोखले आणि त्याचबरोबर त्यांची संभाव्य जागाही स्वत:कडे घेण्याचा इरादा जाहीर केला. परंतु, त्यांचे दुर्दैव एवढेच की, त्यांच्याजवळ हवे तितके कार्यकर्तेच नाहीत. त्यांच्या १२१ उमेदवारांपैकी दहाबारा उमेदवारच असे असतील की, जे स्वत: निवडून आले नाही तरी इतर उमेदवारांच्या विजयासाठी कारणीभूत ठरतील.


महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत कोणाला बहुमत मिळेल?, कोण मुख्यमंत्री होईल?, कोणाकोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल?, या सर्व प्रश्नांची उत्तरे २४ ऑक्टोबरला मिळणार असली तरी एका प्रश्नाचे उत्तर मात्र निवडणुकीपूर्वीच मिळाले आहे व तो प्रश्न आहे, मनसेनेते राज ठाकरे यांना 'वास्तवाचे भान' आले आहे का? लोकांच्या मनात असलेला हाच प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या संपादकांनी थेट राज यांनाच विचारला आणि आश्चर्य म्हणजे सुंभ जळूनही पीळ कायम असल्याचे दृश्य निर्माण करणारे राज ठाकरे यांनी त्याला 'होय' असे उत्तर दिले. अगदी त्याच शब्दात की, "त्यांना आता वस्तुस्थितीचे भान आले आहे." पण खरोखरच त्यांना तसे भान आले आहे काय? हा प्रश्न नंतरच्या उत्तरांमध्ये कायम राहिला. एवढे मात्र खरे की, लोकसभा निवडणुकीच्या वेळचे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या काळात दिसत तेवढे आक्रमक मात्र दिसत नाहीत. एवढेच नाही तर त्यांनी त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे शस्त्रही म्यान करून टाकले आहे. आणि ते दिसणार तरी कसे? लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांना अक्षरश: वापरूनच नव्हे तर धोपटून घेतले होते आणि आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर त्यांना अस्पृश्यच ठरविले आहे. त्यामुळेच ही निवडणूक लढवायचीच नाही, या निष्कर्षाप्रत ते आले होते. ५ ऑगस्ट, २०१९ ला जेव्हा जम्मू-काश्मीरचे संपूर्ण विलीनीकरण करण्यात आले, तेव्हा तर त्यांना आधी त्यांनीच उच्चारलेला 'अनाकलनीय' शब्द नक्कीच आठवला असेल व त्यांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जवळजवळ पक्का झाला होता. पण खरोखरच तसे झाले तर आपल्या समर्थकांना वाऱ्यावर सोडण्यासारखे होऊ शकते, शिवाय आपले उपद्रवमूल्य शून्यावर येऊ शकते, असा विचार त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या गळी उतरविलेला दिसतो. शिवाय 'रेल्वे इंजिन' सुरक्षित राखण्याचा प्रश्न होताच. त्यामुळे जिथे जिथे शक्य होते, तिथे तिथे त्यांनी २८८ पैकी सुमारे १२१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

 

याच संदर्भात त्यांना प्रश्न विचारला होता. कारण, निवडणुकीत प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठीच लढत असतो आणि प्रत्येक पक्ष सरकार स्थापन करण्यासाठीच निवडणूक लढत असतो. ते लक्षात घेऊन 'आम्ही मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू,' असा दावा राज ठाकरेंना सहज करता आला असता. पण त्यांनी ते टाळले आणि बहुधा निवडणुकींच्या इतिहासात प्रथमच 'आम्हाला विरोधी पक्ष बनण्यासाठी मतदान करा,' असे जाहीर आवाहन करण्याची पाळी त्यांच्यावर आली. त्या मुद्द्यावरच ते प्रचारही करीत आहेत. प्रश्नकर्त्याला ही विसंगती वाटली आणि तिचे निराकरण करण्यासाठीच त्यांनी राज यांना प्रश्न विचारला, ज्याचे 'वास्तवाचे भान आल्याचा' उल्लेख राज ठाकरेंना करावा लागला. या पहिल्याच उत्तरानंतर त्यांच्या मुलाखतीची गाडी जी उतरणीवर लागली ती 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भला माणूस आहे,' या उद्गारानंतरच थांबली. तसे पाहिले तर गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांच्या जाहीर सभांचा भरपूर उपयोग करून घेतला. स्वत:च्या पक्षाचा एकही उमेदवार मैदानात नसताना, विरोधी पक्षांनी अधिकृतपणे पाठिंबाही दिला नसताना केवळ भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या द्वेषापोटी त्यांनी विरोधी पक्षांची संपूर्ण पोकळी स्वत:च्या अभ्यास आणि त्वेषपूर्ण सभांनी भरुन काढली होती. पण त्याबद्दल कोणताही कृतज्ञभाव प्रकट न करता जेव्हा त्या दोन्ही पक्षांनी यावेळी त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यात नैराश्य येणे स्वाभाविक होते. लोकसभेच्या वेळी तरी काँग्रेसला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मते हवी होती व मनसेच्या संपर्काने ती कमी होण्याची शक्यता होती, पण विधानसभेच्या वेळी तोही प्रश्न नव्हता. पण काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी टोलवाटोलवी करून त्यांना गारद करण्याचा प्रयत्न केलाच. राज ठाकरेंनी फक्त यावेळी एकच शहाणपण केला की, त्या दोन पक्षांना आपला उपयोग करून घेण्यापासून रोखले आणि त्याचबरोबर त्यांची संभाव्य जागाही स्वत:कडे घेण्याचा इरादा जाहीर केला. हे त्यांचे राजनीतीकौशल्यच म्हणावे लागेल. त्यांचे दुर्दैव एवढेच की, त्यांच्याजवळ हवे तितके कार्यकर्तेच नाहीत. त्यांच्या १२१ उमेदवारांपैकी दहाबारा उमेदवारच असे असतील की, जे स्वत: निवडून आले नाही तरी इतर उमेदवारांच्या विजयासाठी कारणीभूत ठरतील. त्यामुळे ते अस्तित्वाची शेवटची लढाई लढत आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

 

सत्ताप्राप्ती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल राज यांचा भ्रमनिरास जरी झाला असला तरी त्यांचा इव्हीएमचा विरोध मात्र कायमच आहे. वस्तुत: त्या संदर्भात ते एकाकीच पडले आहेत. विरोधी पक्षांनी इव्हीएमवरच विधानसभा निवडणुकीत बहिष्कार घालावा, अशी भूमिका त्यांनी आग्रहपूर्वक मांडली होती. वेळ आली तर एकटी मनसे बहिष्कार घालील, असेही त्यांनी सूचित केले होते. पण आता त्यांना नाईलाजास्तव जशी निवडणूक लढवावी लागत आहे, तसाच त्यासाठी इव्हीएमचा वापरही करावा लागणार आहे. मतदानासाठी मतपत्रिकाच वापराव्यात, असा आग्रह ते करीत असले तरी इव्हीएममध्ये काय खोटे आहे, हे सिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारायला मात्र तयार नाहीत. आरेतील वृक्षतोडीला विरोध करताना मतपत्रिकांचा वापर करण्यासाठी किती झाडे तोडावी लागतील, याचा मात्र त्यांना का सोयीस्कर विसर पडतो, हे लक्षात येत नाही. खरे तर राज ठाकरे उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यासाठी ते प्रचंड अभ्यासही करतात. निसर्गाने त्यांना कणखर आवाज दिला आहे. काकांनी व्यंगकला शिकविली आहे. राजकीय नेत्याला साजेसे जवळपास सगळे गुण त्यांच्याकडे आहेत, पण पक्ष उभारणीच्या तंत्रात मात्र ते खूप मागे पडतात. किंबहुना पक्षाची उभारणी करावी लागते. यावर त्यांचा विश्वासच नाही, असे सूचित होते. या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांची उदाहरणे देऊन त्यांना मुलाखतीत छेडले असताना त्या पक्षांनाही सत्तेपर्यंत पोहोचायला पन्नास-पन्नास वर्षे लागली, याकडे लक्ष वेधून त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनांच्या माध्यमातून आपण पक्षबांधणी करीत असल्याचा दावाही केला पण पक्षबांधणी करताना सभासद नोंदणी करावी लागते. पक्षांतर्गत निवडणुका घेऊन पदाधिकारी निवडावे लागतात. वेळोवेळी स्थानिक समस्यांच्या बाबतीत आंदोलने करावी लागतात, कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी लागते, सामूहिक नेतृत्व उभे करावे लागते, हे काही त्यांच्या गळी उतरत नाही, असे दिसते. 'पक्षबांधणीसाठी सकाळी लवकर उठावे लागते' असे कुणी म्हटले तर त्यांना राग येतो पण गेल्या सत्तर वर्षांच्या काळात पक्षबांधणी कशी करावी, याचे काही मापदंड तयार झाले आहेत व त्यावर कुणाचाही कॉपीराईट नाही, हे काही त्यांना उमजत नाही, असे दिसते.

 

वास्तविक, आज मनसे ही राज्यव्यापी संघटना बनली आहे पण ती काही विशिष्ट क्षेत्रामध्येच. पण तेथेही त्यांना आपले महत्त्व कायम ठेवता आलेले नाही. डोंबिवली, नाशिक, मुंबई ही त्याची उदाहरणे. एवढेच काय पण महाराष्ट्र विधानसभेतही त्यांनी २००९ मध्ये तेरा आमदार निवडून आणले होते पण २०१४ मध्ये ती संख्या एकवर कशी आली, हे त्यांनाही कळले नाही. जो एक निवडून आला होता, तोही मनसेच्या नव्हे तर स्वत:च्या बळावर निवडून आला होता आणि तोही आता शिवसेनेत गेला. नाशिक व डोंबिवली महापालिकांमध्ये त्यांच्या पक्षाला लागलेली उतरती कळा वेगळीच. विशेषत: नाशिककडे त्यांनी मनसेची प्रयोगभूमी म्हणून पाहिले होते पण केवळ हवेच्या राजकारणावर विश्वास असणाऱ्या राज ठाकरेंना तेही करता आलेले नाही. ते कधी महाराष्ट्रव्यापी सघन दौरे करीत नाहीत, शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्ग यांच्या समस्यांवर बोलत नाहीत. आंदोलन करायला निघाले तरी तेथे हिंसाचार ठरलेला असतो. त्यामुळे त्यांची लढाऊ नेता म्हणून प्रतिमा जरूर तयार झाली पण पक्षाची पाळेमुळे मात्र कुठेही खोलवर नेता आली नाहीत. एवढेच काय पण मनसेच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्यासोबत 'उजवे हात' म्हणून वावरणारे किती नेते त्यांच्यासोबत आहेत, हा प्रश्नच आहे. त्यामुळे मनसे म्हणजे बिनभरवशाचा पक्ष आणि राज ठाकरे म्हणजे बिनभरवशाचे नेते अशी त्यांची अवस्था झाली असेल तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल. वास्तविक 'टोल हटाव' आंदोलनात त्यांनी नेत्रदीपक यश मिळविले होते पण त्यांना ते टिकविता आले नाही, ही कटु वस्तुस्थिती त्यांनाही नाकारता येणार नाही.

 

नेतृत्वाचे सर्व गुण अंगी असताना एखाद्या नेत्याची वा पक्षाची संघटनकौशल्याअभावी काय स्थिती होऊ शकते, याचे उदाहरण म्हणून राज ठाकरे व त्यांची मनसे यांचाच उल्लेख करावा लागेल. त्यांच्या धरसोड वृत्तीची दोन उदाहरणे अतिशय स्पष्ट आहेत. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते त्यांचे चाहते होते. ते स्वत: गुजरातमध्ये जाऊन तेथील परिस्थिती पाहून अतिशय प्रभावित झाले होते. नंतर मोदींमध्ये कोणतेही परिवर्तन झाले नसताना त्यांच्यात मात्र मोदींविषयी प्रचंड परिवर्तन झाले. इतके की, ते मोदींचे सर्वात कठोर टीकाकार बनले. मोदींनी घेतलेला एकही निर्णय त्यांना पसंत पडला नाही. नोटाबंदीनंतर ते अक्षरश: बिथरलेच. शरद पवारांबद्दल तेवढे तीव्र नाही पण त्यांचे मत बदललेच; अन्यथा पवारांना त्यांच्याशी आघाडीबाह्य युती करणे अशक्य नव्हते. पण त्यांचे शत्रू-मित्र संबंध एवढे वेगाने बदलतात की, कालचा शत्रू त्यांना मित्र वाटायला लागतो आणि कालचा मित्र शत्रू. राजकारणात सातत्य राखणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमची विश्वासनीयता वाढत असते. पण राज ठाकरेंना अद्याप ती प्राप्त करता आलेली नाही, ही वस्तुस्थिती कुणाला नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर त्यांना 'वास्तवाचे भान' आले, असे कसे म्हणता येईल?

 

- ल. त्र्यं. जोशी

@@AUTHORINFO_V1@@