युवा पिढी रोजगारक्षम बनविण्याला प्राधान्य

    16-Oct-2019
Total Views |




 बोरिवली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील राणे यांचा निर्धार

 



बोरिवली विधानसभा मतदारसंघात १९८० पासून भाजपचे वर्चस्व आहे. माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक, हेमेंद्र मेहता, खासदार गोपाळ शेट्टी, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाजपचा हा गड अभेद्य राखला आहे. आता ती जबाबदारी सुनील राणे यांच्यावर आहे. पूर्वसुरींच्या कामाचा उंचावलेला आलेख त्यांच्या फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे सुनील राणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

 

"गेले आठ दिवस बोरिवली मतदारसंघातील गल्लीबोळातून प्रचारानिमित्त पदयात्रा काढल्या. वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी जे स्वागत झाले आणि रहिवाशांचा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे बोरिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास मिळाला," असे येथील उमेदवार सुनील राणे यांनी सांगितले.

 

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण असते. सुनील राणे यांची भेट घेतली तेव्हा ते सुद्धा अगदी साध्या पेहेरावात होते. मागील आठ दिवसांत प्रचाराचा धूमधडाका लावल्याने पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत असताना ‘ऑक्टोबर हीट’मुळे त्रास नक्कीच झाला होता, पण त्याचा ताण चेहर्‍यावर जाणवत नव्हता. चेहरा तजेलदार वाटत होता. विजयाची शंभर टक्के खात्री, हेच त्यामागचे कारण होते.
 

"समाजसेवा करत असताना राजकारणात यावे असे का वाटले?," असे विचारता ते सहज सांगून गेले की, "समाजसेवा हा माझ्या घराण्याचा वसा आहे. काहीही झाले तरी समाजसेवेचा वसा आम्ही बाजूला सारणार नाही आणि राजकारण म्हणाल तर तो वारसा आहे. वडिलांकडून तो मिळाला आहे."

 

"वडील दत्तात्रय राणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी लढा उभारला. तेथून समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले. मात्र, समाजसेवा करत असताना राजकारणाचा साधन म्हणून आधार लागतो. त्याने समाजसेवेला बळ मिळते. वडील दत्तात्रय राणे हेसुद्धा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. त्या माध्यमातून त्यांनी केलेले काम पाहिले आहे. त्यामुळे शिक्षण चालू असतानाच सामाजिक कामे करू लागलो. अर्थात मित्र व हितचिंतकांचा मोठा पाठिंबा मिळाल्यानेच ते शक्य झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून एअर इंडियाच्या सेवेत नोकरी केली. मात्र २००० साली नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे समाजकारणात सक्रिय झालो."

"राजकारणाच्या दिशेने वाटचाल कशी केली?," यावर उत्तर देताना ते म्हणतात, "१९९७ ते २००० या काळात भाजपचा महाराष्ट्र युवा मोर्चा उपाध्यक्ष होतो. २००० ते २००३ या काळात मध्य दक्षिण मुंबईचा जिल्हा सरचिटणीस होतो. २००३ पासून २००६ पर्यंत भाजपचा मध्य-दक्षिण मुंबई अध्यक्ष आणि २००६ पासून भाजपचा मुंबई सरचिटणीस आहे. त्यामुळे विविध कामांनिमित्त मुंबईसह उपनगरभर फिरणे झाले आहे. विविध पदांवर काम करत असताना तळागाळातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना माझी कामामागची तळमळ पाहून त्यांनी नकळतपणे ‘पुढे चला, पुढे चला’चा संदेश दिला आणि आता बोरीवलीतून विधानसभेचा भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. प्रचारादरम्यान जनतेचा भरभरून आशीर्वादही मिळत आहे."

 

"बोरीवलीतून आपण शंभर टक्के विजयी व्हाल याबाबत खात्री कशी देऊ शकता?," असे विचारता ते आत्मविश्वासपूर्वक म्हणाले की, "माजी खासदार रामभाऊ नाईक, खासदार गोपाळ शेट्टी आणि विद्यमान शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या मतदारसंघात असे काम केले आहे की, येथील मतदारसंघ दुसर्‍या कोणत्या उमेदवाराचा विचारच करू शकणार नाही. त्यांनी बोरीवलीच्या जनतेचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी विकासकामांचा आलेख उंंचावत नेला आहे. माझे यापूर्वीचे काम लक्षात घेता पक्षाचे वरिष्ठ नेते, सहकारी, कार्यकर्ते आणि सुजाण नागरिकांच्या सहकार्याच्या बळावर तो विकासाचा आलेख तसाच उंचावत नेईन," असे त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.

 

"आपल्याला तुल्यबळ उमेदवार कोण वाटतो?," यावर गंभीर होत ते म्हणाले की, "निवडणुकीला उभा राहणारा प्रत्येक उमेदवार विजयी होण्यासाठी लढत असतो. त्यामुळे अमुक उमेदवार कमजोर वगैरे मी मानत नाही आणि तुल्यबळ म्हणून त्याचा धसकाही घेत नाही. मात्र, येथे विरोधक पराभूत मनोवृत्तीने मैदानात उतरलेले आहेत आणि आपण मात्र विजयी होण्यासाठीच निवडणूक लढवतोय. त्यासाठीच प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. माझ्या पूर्वसुरींनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून मतदार माझ्याच पारड्यात मतांचे दान टाकतील आणि विजयाच्या आनंदाची दिवाळी नक्कीच साजरी करतील," असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

"निवडून आल्यानंतर तुमचे खास ध्येय काय असेल?," या प्रश्नावर गंभीर होत ते म्हणतात की, "माझ्या डोळ्यांसमोर सतत तरुण पिढी असते. ती सुविद्य, कार्यमग्न आणि रोजगारक्षम बनविणे याला मी प्राधान्य देतो. आमदाराला त्याच्या मतदारसंघात करता येण्यासारखी अनेक कामे असतात. निवडून आल्यानंतर मी ती करणारच आहे, पण देशाचा आधारस्तंभ असलेली युवा पिढी रोजगारक्षम बनविणे याला मी प्राधान्य देणार आहे, " असे ते आत्मविश्वासाने सांगतात.

                                                         - अरविंद सुर्वे