द्विशतकवीर मयांक अग्रवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |



आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनण्याचे स्वप्न आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण करत द्विशतकाद्वारे विक्रम रचणाऱ्या भारताचा सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल याच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


'क्रिकेट' हा खेळ भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा. कसोटी असो एकदिवसीय अथवा टी-२० असे कुठल्याही प्रकारातले क्रिकेट सामने हे भारतीयांना अगदी खिजवून ठेवतात. तमाम भारतीयांमध्ये या खेळाला पसंती असल्यानेच भारतातील प्रत्येक गल्ली-बोळांत हा खेळ अनेकांकडून खेळला जातो. लहानपणी हा खेळ अनेकजण खेळतात. या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनण्याचे स्वप्न अनेकांकडून पाहिले जाते. काहीजण हे स्वप्न पाहतात आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर ते पूर्णही करतात. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत नुकतेच द्विशतक करणारा भारताचा सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल त्यांच्यापैकीच एक असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नुकतेच द्विशतक ठोकले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. कोहलीने या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात हे विक्रम रचण्याआधी पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवालने द्विशतक करण्याचा पराक्रम केला. मयांक याची ही खेळी फार महत्त्वपूर्ण मानली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मयांक अग्रवालने अवघ्या सहाव्या सामन्यातच केलेले हे द्विशतक. आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा मयांकचा अनुभव दांडगा नाही. मात्र सुरुवातीच्या सामन्यांमध्येच त्याने प्रत्येक खेळीमध्ये साकारलेल्या धावा या भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या ठरल्या आहेत. मयांकने केलेल्या या द्विशतकामुळे एखाद्या भारतीय सलामीवर फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याचा दहा वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाविरूद्ध पहिल्या सामन्यात द्विशतक आणि दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी साकारण्याचीकामगिरी करणाऱ्या या मयांक अग्रवालच्या आयुष्याचा प्रवासही काही संघर्षपूर्ण राहिला आहे.

 

मयांक याचा जन्म १६ फेब्रुवारी, १९९१ साली बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील अनुराग अग्रवाल यांना मुळात क्रिकेटची फार आवड. क्रिकेटचे सामने पाहण्यात त्यांना फार रस असे. प्रत्येक सामने ते आवर्जून पाहत. त्यामुळे मयांक यालाही अगदी लहानपणीच क्रिकेटचा छंद जडला. लहानपणापासूनच मयांकला क्रिकेटचा छंद असल्याने वडिलांनी अभ्यासासोबतच त्याला या खेळाचेही धडे देण्यास सुरुवात केली. बंगळुरुतील प्रख्यात क्रिकेट कोचिंग क्लबमध्ये त्यांनी मयांकला प्रशिक्षणासाठी पाठवले. एकीकडे शालेय शिक्षण सुरू असताना मयांकचे क्रिकेटचे प्रशिक्षणही सुरूच होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू बनण्याच्या दृष्टीने त्याचा सराव सुरू होता. आपल्या वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने क्रिकेट खेळण्याच्या त्याच्या शैलीमुळे अनेक प्रशिक्षकांकडून त्याची प्रशंसा केली जात असे. बंगळुरु येथील 'बिशप बॉयज स्कूल'मधून मयांकने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. आंतरशालेय क्रिकेट संघातील सामन्यांमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. यानंतर मयांकने जैन युनिव्हर्सिटी, बंगळुरु येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. एकीकडे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच २०१० साली त्याला भारताच्या 'अंडर-१९' क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी चालून आली. या संधीचे सोने करण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या मयांकने 'अंडर-१९' विश्वचषकांतील सामन्यांमध्ये चोख कामगिरी बजावत टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम आपल्या नावावर रचला. आंतरराष्ट्रीयस्तरावर त्याने केलेल्या या कामगिरीनंतर तो प्रकाशझोतात आला. विश्वचषक सामन्यानंतर झालेल्या 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील सामन्यांसाठी त्याची नियुक्ती झाली. 'धडाकेबाज सलामीवीर फलंदाज' म्हणून ओळख असल्याने प्रत्येक वर्षी विविध आयपीएलच्या संघाकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमध्ये संधी मिळाली असली तरी राष्ट्रीय संघात 'आंतरराष्ट्रीय खेळाडू' म्हणून संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत मयांक होता. यासाठी त्याने रणजी सामने खेळण्यास सुरुवात केली. येथेही त्याची धडाकेबाज कामगिरी सुरूच राहिली. २०१७ साली एका वर्षात सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. जो यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर राहिला होता. तो मयांक याने अनेक वर्षांनंतर मोडीत काढला. अनेक वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी करूनही भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने मयांकला नैराश्याने ग्रासले. मात्र, जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते. अखेर गेल्या वर्षी कर्णधार विराट कोहलीच्या 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू' संघामधून खेळल्यानंतर त्याच्या खेळाची कोहलीने दखल घेतली आणि त्याला कसोटी सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणून संधी दिली. मयांकने या संधीचे सोने करत स्वतःला सिद्ध केले आणि तो आता 'भारताचा नवा द्विशतकवीर' म्हणून क्रिकेटविश्वात ओळखला जात आहे.

 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@