सांगे पणजोबांची कीर्ती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |


 


'सांगे वडिलांची कीर्ती, तो येक मूर्ख' या म्हणीसारखाच प्रकार. फक्त इथे वडिलांऐवजी पणजोबांचे नाव टाकायचे, बाकी पुढचे जसेच्या तसे आणि हे एकच तुषार गांधींचे कर्तृत्व!


'भारत-पाकिस्तानच्या फाळणीला रा. स्व. संघाने विरोध केला नव्हता.' - तुषार गांधी

 

रस्त्याने जाता-येता, फुटपाथवर, चौकात वा मंदिर-मशिदीपुढे बसून राम-कृष्णाच्या, अल्ला-अलीच्या नावाने दोन पैसे मागणारे अनेकदा दिसतात. तसेच समोरच्या व्यक्तीने घेतलेल्या देवाच्या नावाने-पुण्याच्या आशेने त्यांच्या थाळीत चार-दोन रुपये टाकणारेही कितीतरी असतात. अर्थात येणाऱ्या-जाणाऱ्यांपुढे हात पसरणारे हे लोक अन्नासाठी मोताद झालेले व केवळ त्यासाठीच कोणाच्याही पाया पडणारे असतात. पण, असाच काहीसा प्रकार स्वतःला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, विचारवंत, अभ्यासक म्हणविणाऱ्या मंडळींकडूनही चालू असतो. फक्त इथे त्याचे स्वरूप वेगळे असते आणि त्यामागचे त्यांचे हेतूही निराळे असतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडात अशा लोकांचे भारतात भरपूर पेव फुटले व काँग्रेसच्या कृपेने त्यांच्या माथ्यावर विविध पदांचे मुकुटही ठेवले गेले. दरम्यानच्या काळात या मंडळींनी केवळ एका घराण्याच्या व एकाच पक्षाच्या नावाने उदो उदो करण्याचा कार्यक्रम चालवला. गांधी घराण्याची व काँग्रेस पक्षाची खुशामत केली की, तुकड्यांची चिंता मिटेल तसेच पुढच्या पिढ्यांचीही सोय होईल, असा त्यामागचा त्यांचा एकूणच उद्देश. गांधी घराण्याला व काँग्रेस पक्षालाही अशा लाळघोट्यांची गरज असल्याने त्यांनीही या लोकांना पुरेपूर मोकळीक दिली. परंतु, सारे काही सुखासुखी सुरू असतानाच २०१४ साली घात झाला व वर उल्लेख केलेल्या लोकांना जबर दणका बसला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता प्राप्त केली व नंतरच्या कितीतरी राज्य विधानसभा निवडणुकाही जिंकल्या. आतापर्यंत आपण ज्यांच्या नावाने खडे फोडले, त्यांनाच जनतेने डोक्यावर घेतल्याचे पाहून पित्त न खवळले तर ते पुरोगामी विचारवंत कसले? म्हणूनच गेल्या पाच-साडेपाच वर्षांत या सर्वांच्याच उरातला द्वेष, राग, चीड वेळोवेळी व्यक्त होऊ लागली व त्यांच्याच गोतावळ्यातल्यांनी त्यांना उचलूनही घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, नरेंद्र मोदी आणि हिंदुत्ववाद्यांच्या नावाने विषवमन करण्याचा एककलमी कार्यक्रम मग या लोकांनी ठिकठिकाणी आयोजिण्यास सुरुवात केली. हे जसे १६व्या लोकसभा निवडणुकीनंतर झाले, तसेच आताच्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतरही सुरूच आहे. कदाचित या गळेकाढू लोकांचे उर्वरित आयुष्यही असल्याच कार्यक्रम-उपक्रमांत जाईल.

 

आताही 'लोकयात्रा' नावाच्या संस्थेने असाच एक कार्यक्रम आयोजित केला व त्यात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना आमंत्रित केले. भिक्षेकरी जसे राम-कृष्णाच्या वा अल्ला-अलीच्या नावाने दान मागत असतात, तसेच काम तुषार गांधीही गेल्या काही वर्षांपासून हिरीरीने करू लागले आहेत. इथे फक्त ते संघ, भाजप, मोदी व हिंदुत्ववाद्यांच्या नावाने ठणाणा करतात आणि त्यातून जे मिळेल त्यावर गुजराण करतात. जणू काही त्यांचा हा नित्य उद्योगच झाला असून त्यांना व्याख्यानाला, भाषणाला बोलावणाऱ्यांचे हेतूही तसलेच असतात. म्हणजे तुषार गांधींनी आपल्या कार्यक्रमाला यावे, संघाविरोधात टकळी चालवावी आणि त्यांच्या पदरात आपणही टाळ्यांचे म्हणा वा इतर कसलेतरी दान टाकावे, असा हा सगळा प्रकार, तर परवाच्या कार्यक्रमातही त्यांनी असेच कंपूवाल्यांनी आनंदाने उड्या माराव्या छापाचे विधान केले व ते माध्यमांतही छापून आणले. तुषार गांधी यांच्या म्हणण्यानुसार, "भारताच्या फाळणीला महात्मा गांधी कारणीभूत असल्याचा अपप्रचार संघ व हिंदुत्ववाद्यांकडून केला जातो. परंतु, महात्मा गांधींना फाळणी मान्य नव्हती, उलट संघ व हिंदू महासभेलाच हिंदूराष्ट्र हवे असल्याने त्यांनी फाळणीला विरोध केला नाही." इथे दोन मुद्दे आहेत.

 

महात्मा गांधी व फाळणी आणि संघ व फाळणी. 'महात्मा गांधी व फाळणी' या विषयावर विपुल लेखन उपलब्ध असल्याने त्या विषयावर आणखी काही लिहिण्या-बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु, संघ व फाळणीबद्दल मात्र तसे नाही. संघाला व हिंदुत्ववाद्यांना पाण्यात पाहणाऱ्यांकडून सातत्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल नकारात्मक, खोटी व दुष्प्रचार करणारी माहिती पसरवली गेली. अर्थात एकाच डोळ्याने पाहण्याची सवय असलेल्या आणि एकाच डोळ्याने वाचण्याची सवय असलेल्यांनीही गैरसमजाने भरलेल्या या माहितीलाच सत्य मानले. मात्र, संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जंगल सत्याग्रहापासून ते १९४७ पर्यंत स्वयंसेवकांच्या आंदोलन-चळवळीतून संघ स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होता. तसेच संघाने तेव्हाही फाळणीला विरोध केला व आजही अखंड भारताचे ध्येय संघ बाळगतोच! फक्त एकाच घराण्याची व एकाच पक्षाची तळी उचलणाऱ्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. हे दुर्लक्ष जसे संघाबद्दल केले, तसेच क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे शेतकरी आंदोलन, सद्गुरू रामसिंह यांचे कुका आंदोलन, अनुशीलन समिती, हिंदुस्तान समाजवादी लोकतांत्रिक सेना, गदर पार्टी, अभिनव भारत, सशस्त्र क्रांतिकारी गट, हिंदू महासभा, आर्य समाज, आझाद हिंद सेना इत्यादींचे योगदानही नाकारण्याचा कृतघ्नपणा केला. पण म्हणून वास्तव लपत नसते, ते वर येतेच, कधी लवकर तर कधी उशिरा. आता तेच समोर येऊ लागल्याने गांधी-नेहरू घराणे व काँग्रेसच्या नावाने घर भरणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसते. तुषार गांधी यांचेही तसेच काहीसे झाले व ते संघ व हिंदुत्ववाद्यांविरोधात बोंबा ठोकू लागले.

 

वस्तुतः महात्मा गांधी यांचे पणतू आणि गांधी आडनावाव्यतिरिक्त तुषार गांधी यांचे कर्तृत्व ते काय? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे इतर सगळे रिकामे-बिनकामे व आम्ही म्हणतो तेच काम करणारे, असा तुषार गांधींचा आविर्भाव असतो. पण तुषार गांधींनी असे कोणते दिवे लावलेत की, ज्यामुळे ते संघ वा हिंदुत्ववाद्यांवर आरोप करत फिरत असतात? उलट महात्मा गांधींचा वारसा सांगणाऱ्या या पणतूने २००१ साली आपल्या पणजोबांच्या एका विशेष छायाचित्राचा धनराशी ओरबाडण्यासाठी उपयोग केला होता. पण जनतेने तुषार गांधींचे कुटील कारस्थान ओळखले व त्यांचा हा डाव हाणून पाडला. याव्यतिरिक्तही तुषार गांधींचे आणखी काही कर्तृत्व आहे. ते म्हणजे मोदीद्वेषाचा कंडू शमवण्यासाठी २०१७ साली तुषार गांधी यांनी तोंडाची वाफ दवडली होती. खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर नरेंद्र मोदींचे चरखा चालवतानाचे छायाचित्र लावल्याने तुषार गांधींनी 'चरखा ले गया चोर', अशा भावना व्यक्त केल्या होत्या. पण, गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने महात्मा गांधींच्या चरखा आणि अन्य तत्त्वांनाच हरताळ फासल्याचे तुषार गांधींना आठवले नव्हते. गांधीजींच्या विचारांवरून पथभ्रष्ट झालेल्यांना दोन शब्द सुनावण्याची ताकद नसणे, हेही तुषार गांधींचे कर्तृत्वच. उलट तुषार गांधींच्याच आयुष्यात महात्माजींच्या व्रतस्थ जीवनाचा मागमूस असेल का, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती. आणखी एक म्हणजे सरकारी पैशात वा कुठूनतरी पैसे जमवून केलेल्या डॉक्युमेंटरीत रडका चेहरा करून ज्ञान पाजळण्याचे कर्तृत्वही तुषार गांधी गाजवत असतात. तसेच आपली संघविरोधाची खाज भागवण्यासाठी निरनिराळ्या मंचावर जाण्याच्या त्यांच्या उठाठेवी तर नित्याच्याच. पण, हा 'सांगे वडिलांची कीर्ती, तो येक मूर्ख' या म्हणीसारखाच प्रकार. फक्त इथे वडिलांऐवजी पणजोबांचे नाव टाकायचे, बाकी पुढचे जसेच्या तसे आणि हे एकच तुषार गांधींचे कर्तृत्व!

@@AUTHORINFO_V1@@