'दादा' योग्यच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |



सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या (बीसीसीआय) निवडणुकीत उतरल्यानंतर त्याला देशभरातील अनेक क्रिकेट संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात पार पडलेल्या बैठकीत विविध क्रिकेट संघटनांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीसाठी गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब केले.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या (बीसीसीआय) निवडीसाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे नाव पुढे आले. क्रिकेटमध्ये अनेक वर्षे 'दादा' म्हणून अधिराज्य गाजविणाऱ्या गांगुलीची या पदासाठी निवड झाल्यास याचे स्वागतच करायला हवे. बीसीसीआयच्या कार्यकारी मंडळात गांगुलीचा समावेश झाल्यानंतर भारतीय क्रिकेटचे भवितव्य नक्कीच उजळून निघेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू राहिला आहे. संघातील खेळाडूंना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हे एक खेळाडूच चांगले ओळखू शकतो. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे एका माजी खेळाडूच्या हातात असणे, अशी गरज अनेक क्रिकेटतज्ज्ञांनी यापूर्वीच बोलून दाखवली आहे. मात्र दुर्देव हेच की, आत्तापर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेकवेळा राजकारण्यांनीच बाजी मारली असून खेळाच्या मैदानावर आपले अधिराज्य गाजवले आहे. केवळ क्रिकेटतज्ज्ञच नव्हे, तर इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) घोटाळा उघडकीस आल्यानंतर तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही या पदावर खेळाडूंची वर्णी लागण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या शिफारशींमध्येही याचा उल्लेख होता. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी खेळाडूची वर्णी लागल्यास त्याचा क्रिकेट संघाला नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही. सौरव गांगुली भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला सातवा खेळाडू असून ३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे. कर्णधारपदी त्याचे नेतृत्व यशस्वी ठरले असून २००३ साली संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. कर्णधारपदी असताना गांगुली याने केलेले अनेक प्रयोग यशस्वी झाले असून अनेक दिग्गज खेळाडूंचे करिअर घडविण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या नवीन इनिंगमध्येही गांगुली सेंच्युरी ठोकणार, यात शंका नाहीच.

 

हे कितपत खरे?

 

सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या (बीसीसीआय) निवडणुकीत उतरल्यानंतर त्याला देशभरातील अनेक क्रिकेट संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात पार पडलेल्या बैठकीत विविध क्रिकेट संघटनांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीसाठी गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीत गांगुली याच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे नवे सचिव, तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होण्याची शक्यता आहे. गांगुली याच्यासोबतच भाजप नेत्यांशी संबंधित नावेही चर्चेत येताच काही प्रसारमाध्यमांनी याबाबत शंका उपस्थित करत गांगुली याचे भाजपसोबत छुपे संबंध असल्याचे वृत्त प्रकाशित करण्यास सुरुवात केली. काहींनी तर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित नेत्यांच्या संघटनांनी पाठिंबा दिल्याच्या बदल्यात गांगुली आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये त्यांचा प्रचार करणार असल्याच्याही वावड्या उठवल्या. मात्र, गांगुली याचे भाजपशी खरेच संबंध आहेत की नाही याची कसलीही शाश्वती न करताच, याबाबत शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियुक्ती झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गांगुलीने यात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा केला. असे काहीही प्रकार होणार नसून मला कोणत्याही भाजप नेत्याने निवडणुकीचा प्रचार करण्याचा आग्रह केला नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे भाजपशी त्याचा संबंध जोडणे, हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे तेव्हाच सिद्ध झाले. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या. ममता बॅनर्जी यांच्यासह क्रिकेट आणि राजकीय विश्वातील अनेकांनी त्याला याबाबत शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राजकारण्याचे नव्हे तर एका चांगल्या क्रिकेटपटूची आहे, हे ही नसे थोडके...

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@